Skip to content

सततचं चांगलं वागणं थांबविण्यासाठी काहीवेळेस त्रास हा गरजेचा असतो.

सततचं चांगलं वागणं थांबविण्यासाठी काहीवेळेस त्रास हा गरजेचा असतो.


पूजा सातपुते


प्रत्येक व्यक्ती मध्ये गुण व अवगूण हे दोघेही असतात. काही लोकं ही खूप साफ मनाची असतात. त्यांना समोरच्याचं वागणं किव्हा हेतू पटकन कळत नसतो. आता साफ मन असणं म्हणजे गुण व अवगूण दोन्ही असणं. अशी लोकं मनानी हळवी असतात, समजूतदार असतात आणि नेहमी चांगलं वागण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना कोणाचही मन दुखवायचं नसतं.

भांडण करणं, उगीच वाद घालणं, धोका देणं, कधी कोणी काही बोललं तर उलटं उत्तर न देणं हे त्यांच्या स्वभावातच असतं आणि या चांगुलपणाचा बरेचदा फायदा घेतला जातो. जेवढं आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेवढं जास्त ग्रांटेड घेतलं जातं आणि मग एक दिवशी मनात दाबून ठेवून आपल्या मनावरचा ताबा सुटतो. कुठेतरी आपल्या चांगुलपणाचा आपल्याला राग यायला लागतो.

खरंच! सतत चांगलं वागणं थांबवण्यासाठी काहीवेळेस त्रास हा गरजेचा असतो. कारण त्रास जेव्हा होतो तेव्हा आपण सगळ्या दृष्टीने विचार करायला लागतो. आपण कोणाशी चांगले वागलो, ते खरंच त्या लायक होते का, कुठे आपलं चुकलं या सगळ्यांचा विचार केल्यावर आपण सुधारतो व शिकतो. आपला चांगुलपणा आपण कोणाबरोबर, किती आणि कसा वापरायचा ते आपल्याला कळतं!

चांगलं वागणं, कोणाचं मन न दुखावणं, उलट न बोलणं ही चांगली गोष्ट आहे पण जेव्हा आपल्या चांगुलपणाचा, शांतपणाचा गैरफायदा घेतला जातो तेव्हा आपली बाजू मांडणं ही तेवढच महत्वाचं असतं. काही विपरीत गोष्टी जर आपल्या आयुष्यात घडल्या नाहीत तर आपण स्वतः मध्ये कधीच बदल आणू शकणार नाही आणि जर बदल नाही आला तर आपण लोकं व त्यांचा हेतू हे कधीच ओळखू शकणार नाही.

आपल्या आयुष्यात कधी कोणा व्यक्तीमुळे किव्हा परिस्तिथीमुळे त्रास झाला तर आपलं मन दुखावणं हे साहजिक आहे. आपण चांगले वागून सुद्धा आपल्याबरोबर असं का झालं हा विचार मनात नक्कीच येतो पण जरा विचार करा, हा त्रास तुमच्या आयुष्यात झाला नसता तर सत्य तुमच्यासमोर कधीच बाहेर आलं नसतं. आयुष्यात अडकून राहिले असते. कन्फयुज राहण्यापेक्षा त्रास होऊन त्याचं उत्तर मिळणं कधीही चांगलं!

चुका सगळ्यांकडून होतात, कधी कधी आपले डिसीशन चुकतात, आपला कुठेतरी चांगुलपणा नडतो पण त्यातनच आपण प्रगती करतो.

आपलं वागणं समतोल असलं पाहिजे म्हणजे जश्यास तसं! अती चांगुलपणाही चांगला नसतो आणि अती वाईट वागणंही हानिकारक असतं.

आयुष्यात जर प्रत्ये्यक गोष्टी समतोल ठेवल्या तर विनाकारण आपल्याला त्रास होत नाही. म्हणून कधी जर कुठल्या गोष्टीमुळे त्रास झाला तर डिप्रेस होऊ नका, त्यातनं शिका आणि स्वतः मध्ये बदल आणा. चांगलं नक्कीच वागा कारण कशावरूनही आपण आपला स्वभाव बदलायचा नसतो किव्हा वाईट वागायचं नसतं. असं वागल्याने आपल्या आयुष्यात कटुता निर्माण होते आणि नकळत त्यात आपण आपल्या सारख्या चांगल्या लोकांचं मन दुखावतो. जर हेच करत राहिलो तर जगातनं चांगुलपणा कायमचा संपेल.

आपल्याला स्वतः मध्ये बदल नक्कीच आणायचा आहे पण त्याबरोबर आपलं आयुष्य सुंदरही ठेवायचं आहे. म्हणून जर काही विपरीत घडलं तर विचार करायला थोडा वेळ घ्या. योग्य वेळी योग्य घटना घडत असतात, का तर आपल्यामध्ये आणि आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल होण्यासाठी. आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. त्रास झाला म्हणून निराश होऊ नका. माणसं ओळखून वागा म्हणजे तुमच्या चांगुलपणाचा तुम्हाला कधीच त्रास होणार नाही.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सततचं चांगलं वागणं थांबविण्यासाठी काहीवेळेस त्रास हा गरजेचा असतो.”

  1. vijay pandurang patil

    फारच छान परंतु आपल्या जवळील लोकच असे वागले तर फारच वाईट वाटते

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!