Skip to content

सतत वाईटच होणार आहे हा विचार असा काढून टाका.

सतत वाईटच होणार आहे हा विचार असा काढून टाका.


आज एक विनोदी चित्रपट पाहिला.. काही अनोखा नाही पण तोच आपला लाडका चित्रपट अशी ही बनवाबनवी.. खरचं तो चित्रपट एक वेगळाच आनंद देतो.. त्यातले विनोद कानावर पडले तरी खळखळून हसू येते.. नेहमी पाहत असलो तरी ते हसू मात्र नेहमीसारखच असते.. सगळ्या गोष्टी विसरायला होतात.. त्यावेळी आपल्याला असलेल्या अडचणी.. दुःख.. चिंता या सगळ्याचा पूर्ण विसरच पडतो हे म्हणायला सुद्धा हरकत नाही…

हे सांगण्याच कारण एवढंच की का बरं त्यावेळी आपण इतकं टेन्शन फ्री राहतो कारण आपल्या समोर त्यावेळी फक्त विनोद आणि हसणं असते.. आणि त्यामुळेच आपल्या मनात सुद्धा त्यावेळी त्याचीच सकारात्मकता पसरलेली असते..

आणि मग इतरवेळी कुठे जाते ते हसणं.. कुठे हरवतो हा आनंद.. कुठे गायब होते ही सकारात्मकता…. याच उत्तर मात्र आपण स्वतःलाच विचारायचं विसरतो.. कारण आपल्या मनात आपल्या विचारात नकारात्मकता घर करून बसते… आणि त्याचाच परिणाम होतो तो आपल्या वर्तमान.. तसेच भविष्याच्या सर्वच बाबतीत.

माझं सतत वाईटच होते.. माझ्या बाबतीत नेहमीच चुकीचं घडते.. आता काय वेगळं घडणार माझ्या आयुष्यात नेहमीसारखा काहीतरी वाईटच अनुभव मिळेल मला.. हे असे विचार मनाचा घेराव घेतात तेव्हा त्याचे परिणाम चांगले कसे असणार..

चिंता.. भीती.. दडपण.. निरुत्साह.. यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक आणि मानसिक तक्रारी.. कधी याच प्रमाण अगदीच वाढल तर कोणी घर सोडून निघून जाते.. कोणाचे संसार मोडतात.. तर कोणी शिक्षण, नोकरी, व्यवसाय यांचा कंटाळा करू लागते.. कोणाच्या घरच्यांवर याचा परिणाम होतो तर कोणाचं बालपण यात हरवून जाते… तर कोणी आयुष्याला कंटाळून जीव देण्याचा प्रयत्न करतो..

आता यातून बाहेर पडायचं असेल तर काय करायचं.. मुळात असे विचार मनात येतातच का कारण आपण कुठल्या वातावरणात राहतो याची आपण काळजी घेतली पाहिजे.. आपल्या अवतीभवती असलेली माणसं.. त्यांचे स्वभाव.. त्यांचं वागणं बोलणं..त्यांचे विचार या सगळ्याचा परिणाम आपल्या वागण्यावर.. आपल्या विचारांवर होत असतो..म्हणून आजूबाजूला जास्तीत जास्त सकारात्मक माणसं असतील तिथेच आपण जास्तवेळ घालवावा.. नकारात्मक लोकांपासून नेहमीच लांब राहिलेलं बर..

एखादा वाईट अनुभव आपल्याला आला असेल.. कुठे अपयश मिळालं असेल तर पुढे सुद्धा तेच होणार हा विचार मनातून काढून टाका.. कारण आपण नेहमी जो आणि जसा विचार करतो तसच घडत असते कारण आपली एनर्जी त्याच ठिकाणी वापरली जाते.. समजा तुम्ही म्हणत असाल की हा जॉब मला नाही मिळणार कारण मुलाखत देताना विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं मला येतीलच याची खात्री नाही.. आणि जर उत्तर नाही आली की माझ्या हातातली संधी मी गमावणार..तर याकडेच आपल लक्ष राहते.. मनातील भीती वाढते.. आणि अशावेळी माहीत असलेली उत्तर सुद्धा विसरायला होतात.. म्हणून जास्तीत जास्त हाच विचार करा की जे झालं ते झालं आता मात्र मी स्वतःला सिद्ध करणार.. मला कायम पुढे जायचं आहे म्हणून मागे घडलेलं मी तिथेच सोडून पुढे जाणार.

आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे self talk स्वतःचा स्वतःशी असलेला संवाद.. हा संवाद इतका महत्वाचा आहे की ज्यामुळे कितीही मोठ संकट असल तरी आपण सहज बाहेर पडू शकतो.. पण तो संवाद असणं आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे तो संवाद सकारात्मक असणं गरजेचं आहे.. काहीही झालं .. समोर कितीही प्रश्न आले तरी त्यांची चांगली वाईट बाजू पडताळून.. स्वतःलाच नेहमी प्रश्न विचारून त्यांची उत्तर मिळवून त्यातून आपण सहज बाहेर पडू शकतो..

म्हणतात ना ऐकावं जणाच आणि करावं मनाचं.. तर जेव्हा आपण मनाचं करू त्यावेळी आपल्या मनात नेहमीच सकारात्मकता असणे आवश्यक आहे.. हे होणार का.. होईल की नाही.. मला जमेल की नाही.. नाही झालं तर.. हे सगळे नकारात्मक विचार बाजूला सारून नेहमी सकारात्मकतेने विचार केला तर हे मला जमेलच.. मी प्रयत्न करणार.. मला हे शक्य आहे.. माझ्यासाठी हे अगदी सोप आहे.. मी पुढे जाणार.. मी सगळ सांभाळणार.. मी माघार घेणार नाही.. मी यश मिळवणारच यासारख्या विचारांना कायम आपल्या मनात.. आपल्या स्वतः शीच असलेल्या संवादात..आपल्या विचारांत नेहमीच जागा द्या.. मग बघा माझ्यासोबत नेहमीच वाईट होते असे चुकीचे विचार आपल्यापासून किती दूर राहतील…

लेखिका – मिनल वरपे 


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!