सतत उत्साह घालवणाऱ्या माणसांसोबत रहायला हवं की नको??
पुजा सातपुते
व्यक्ती तितक्या प्रकृती. आपण आपल्या आयुष्यात खूप साऱ्या लोकांच्या संपर्कात येत असतो आणि आपण बघितलं असेल आपल्या माहितीतले जितकेही जण आहेत ते भिन्न स्वभावाचे आहेत. प्रत्येकाचे विचार, वागणं, व्यक्तिमहत्व हे वेगळं असतं.
काही लोकांशी आपलं कनेकशन जुळतं, त्यांचे विचार आपल्याला पटतात कारण कुठे तरी आपल्याला त्या विचारांची, मोटिवेशन ची गरज असते. तर काही लोकांशी आपलं तितकसं जमत नाही. खासकरून त्या लोकांशी जे आपल्या विरुद्ध स्वभावाचे असतात. पण तरी सुद्धा आपल्याला त्यांच्या संपर्कात राहावं लागतं.
आपण खूप साऱ्या लोकांबरोबर वावरत असतो. कळत नकळत त्यांच्या विचारांचा आपल्यावरही परिणाम होत राहतो. लगेच जरी परिणाम नाही झाला तरी संगतीने तो होतो. कोणी खूप उत्साही असतात, कोणी खूप शांतं असतात, कोणी खूप बोलके असतात तर कोणी नेहमी निरुत्साही असतात. त्यांचं असं असण्यात ती व्यक्ती कुठल्या वातावरणात वावरली आहे या वर खूप अवलंबून असतं.
आपल्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे हे खूप महत्वाचं आहे. आपण जर हसऱ्या, नेहमी खुश राहण्याऱ्या व्यक्तींच्या संगतीत राहिलो तर आपल्याला पण धीर वाटायला लागतो आणि जगण्याची एक नवीन उमेद मिळते. असं नाही कि त्यांच्या आयुष्यात दुःख नसतं, पण त्यांना दुःखातनं बाहेर पडून आनंदात कसं राहायचं याची कला अवगत झालेली असते.
कुटुंबातही बघा, प्रत्ये्यक सदस्यांचा स्वभाव वेगळा असतो. आपलं सगळ्यांशी पटतच असं नाही, पण कोणी तरी असतं ज्याच्यावर आपला भरवसा असतो, माहिती असतं आपल्या बरोबर काही वाईट झालं तर ती व्यक्ती आपल्याला सांभाळूण घेणार. त्या लोकांकडे बघून नवीन उत्साह, उमेद मिळते.
पण काही जण असतात जे सतत नकारात्मक विचार करत असतात. त्यांच्या वागणुकीमुळे घरातल्या इतर लोकांवर ही नकळत परिणाम होत राहतो. चांगलं काही ठरवलं, कुठल्या गोष्टीचा अनंद साजरा करायचं म्हंटलं तर या लोकांचं काही तिसरंच असतं. त्यामुळे बाकीच्यांचा पण मूड ऑफ होतो आणि मग कुठल्याही गोष्टीत रस वाटत नाही.
कुठलाही माणूस हा मुळात वाईट नसतो. परिस्थिती किव्हा वाईट अनुभवामुळे त्यांचा असा अटीट्युड झालेला असू शकतो. सतत जर आपण वाईट सांगतीत राहिलो, दुसऱ्याचं दुःख ऐकत बसलो तर आपोआपच त्याचा आपल्या मनावर परिणाम व्हायला सुरुवात होते आणि नकळत नेगेटिव्ह विचार यायला लागतात आणि मग निरुत्साही वाटू शकतं. म्हणून म्हणतात ना आपला वेळ कुठे, कशावर आणि कोणावर खर्च करतोय हे खूप महत्वाचं आहे.
आत्ता काही लोकांना आपण टाळू शकतो तर काही लोकांना नाही. आपल्या बाहेरच्या जगात जर निरुत्साही लोकं असली तर तितकासा फरक पडत नाही. पण आपल्या घरातच तशी लोकं असली तर कठीण होऊन जातं. मग सतत नकारात्मक ऐकून आपल्याला डिप्रेशन यायला लागतं.
ती व्यक्ती जर मुळातच तशी असेल तर काही करू शकत नाही पण परिस्तिथीने त्यांना जर असं बनवलं असेल तर हळू हळू का होईना त्यांच्यात बदल आणू शकतो. पण स्वतःमध्ये बदल आणायचा कि नाही हे सर्वस्वी त्या व्यक्तीवर अवलंबून आहे कारण स्वतः व्यतिरिक्त कोणीही आपल्यात बदल आणू शकत नाही.
तुम्हाला जर असं वाटत असेल कि कोणामुळे तुमचा उत्साह कमी होतोय तर त्यांच्यावर डिपेंड राहणं सोडून द्या. स्वतःला स्वतः मध्ये गुंतवा. तुमचं जे काही स्वप्न आहे ते स्वतः पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना तुमच्या बरोबर अनंद घ्यायचा असेल ते येतील पण कोणामुळेही स्वतःचा मूड खराब होऊ देऊ नका. प्रत्येकाचं लाईफ वेगळं असतं. म्हणून तुम्ही तुमचं लाईफ जगा आणि त्यांना त्यांचं लाईफ जगू द्या. जेव्हा तुम्ही स्वतःला, स्वतःच्या आयुष्याला महत्व द्यायला शिकाल तर नक्कीच तुमच्या मध्ये वं तुमच्या आसपासच्या वातावरणात उत्साह निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि आपोआप इतर लोकांमधेही उत्साह निर्माण होईल.
जर आयुष्य कर्तव्य म्हणून जगत राहिलात तर तुम्ही कधीच आनंदी राहू शकणार नाही. पण जर आयुष्याच्या प्रत्ये्यक क्षणाचा अनंद घ्यायला शिकलात तर कोणामुळेही कधीही तुमचा उत्साह कमी होऊ शकणार नाही. कोणाचा स्वभाव आपण बदलू शकत नाही पण स्वतः मध्ये नक्कीच बदल आणू शकतो. प्रत्ये्यक अनुभव हा महत्वाचा असतो. मग तो कामाचा असो किव्हा कुठल्या व्यक्तीबरोबरचा.
तुमचं आयुष्य हे तुमचं आहे आणि तुम्ही कसं जगायचं हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे. कोणामुळे जर तुम्ही तुमचा मूड खराब करत बसलात तर तुमच्या आयुष्यातला मौल्यवान वेळ असाच निघून जाईल. आयुष्य खूप सुंदर आहे, सगळ्यांना त्यात नक्कीच सामावून घ्या पण कोणामुळे तुमचा आयुष्यातला उत्साह कमी होऊ देऊ नका.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
