सतत समस्येविषयी बोलणारी व्यक्ती स्वतःसकट इतरांच्या आयुष्यातही समस्यांची निर्मिती करते.
पुजा सातपुते
सुखः आणि दुःखाची सांगड म्हणजेच आयुष्य!
प्रत्ये्क व्यक्तीच्या जीवनात शंभर टक्के सुखः नसतं तसच दुःखही नसतं. कधी आपल्याला आनंद होतो तर कधी काही समस्यांमुळे दुःख होतं आणि यातच आयुष्याची खरी मज्जा. समजा जर आयुष्यात फक्त आनंदच असेल किव्हा फक्त समस्याच असतील तर आपलं लाईफ किती बोर होऊन जाईल. आपण आपल्या आयुष्यात काहीच शिकू शकणार नाही, नवीन गोष्टी अनुभवू शकणार नाही. दुःखा शिवाय सुखाची कदर कळणार नाही आणि सुखा शिवाय दुःखातनं कधी बाहेर पडू शकणार नाही.
समस्या कितीही असू देत त्याचं निवारण हे असतंच. फक्त आपल्याला शांतंपणे ते शोधायचं असतं. पण काही व्यक्ती असतात ज्यांना फक्त समस्याच दिसत असतात आणि स्वतः सकट अशी लोकं इतरांच्याही आयुष्यात समस्यांची निर्मिती करत असतात.
हिंदी मध्ये एक म्हण आहे जी अशा लोकांना बरोबर लागू होते, ‘आ बैल मुझे मार’. अशी लोकं स्वतः च्या हट्टापाई स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतात आणि मग गावभर सांगत सुटतात आणि दुसऱ्यांच्या आयुष्यातही समस्या निर्माण करतात. अशी लोकं आपल्या जास्त जवळचे नसले तर एवढा फरक पडत नाही पण जर ते आपले खास असले तर आपल्याला त्यांची मदत ही करावीच लागते.
मग त्यांची मदत करता करता आपल्यात नकारात्मक विचार यायला लागतात. आपल्याला आपलं आयुष्य कठीण वाटायला लागतं. कधी कधी आपण आपला आनंद सोडून यांचं दुःख सोडवण्यात इतके बीझी होऊन जातो कि आपल्याला असं वाटतं कि आपल्या आयुष्यात चांगलं काहीच नाही आहे. माझ्याबरोबरही असच काहीतरी होईल, नको काही प्रयत्न करायला, उगीच अजून त्रास. असे विचार करून आपण आपली प्रगती थांबवतो आणि आपल्या आयुष्यात नसलेली समस्या निर्माण करतो, करण्यापेक्षा ती होते कारण अशा लोकांमुळे आपला दृष्टीकोन तसा बनतो.
खरं म्हंटलं तर आपलं आयुष्य खूप सोप्पं आहे पण आपण विनाकारण त्यात समस्यांची निर्मिती करत राहतो. आता काही समस्या असतात ज्या आपोआप उद्भवतात आणि त्या समस्यांचं येणं आपल्या हातात नसतं पण अश्या समस्या फार क्वचित असतात. आपल्या आयुष्यातील खूप साऱ्या समस्यांची निर्मिती आपण स्वतःच करत असतो. कधी आपल्या मुर्खपणामुळे तर कधी अहंकारामुळे.
आता इतरांच्या समस्या ऐकून जर आपण आपल्या आयुष्याला खराब करत बसलो तर त्याला मूर्खपणाच म्हणणार. प्रत्येकाचं आयुष्य हे वेगळं असतं. जी गोष्ट कोणा दुसऱ्याबरोबर झाली ती गोष्ट आपल्याबरोबर होईल असं नाही. जर आपल्या ओळखीतल्या कोणाचा डिवोर्स झालं असेल, किव्हा कोणी परीक्षेत नापास झालं असेल तर ती गोष्ट तुमच्या बरोबर होईलच असं नाही. कारण नक्की त्या व्यक्तीच्या जीवनात काय झालं आहे आणि ती व्यक्ती ते कसं सगळ्यांना सांगते, यातलं खरं आणि खोटं हे आपल्याला माहित नसतं म्हणून दुसऱ्यांची समस्या स्वतःवर कधीच ओढवून घ्यायची नसते.
तुम्हाला जर कोणाची समस्या ऐकल्यावर नेगेटिव्ह विचार येत असतील तर त्या वेळीस स्वतःला थोडा टाइम द्या आणि अशा लोकांचं उदाहरण समोर ठेवा ज्यांनी खूप साऱ्या समस्येतून जाऊनही आपलं लाईफ यशस्वी बनवलं आहे. अशी माणसं आपल्या जवळच असतात, जे आपल्याला प्रत्ये्क समस्येतून बाहेर पडण्यासाठी इन्स्पिरेशन देतात. आपले आई-वडील, घरातले कोणी मोठे, आपले मित्र मैत्रिणी. अशा चांगल्या लोकांकडे जर तुम्ही बघितलत तर तुम्ही तुमच्या आयुष्यात नसलेली समस्या कधीच निर्माण करू शकणार नाही आणि जरी काही कारणास्तव निर्माण झाली तरी त्याचा तोडगा नक्कीच तुम्हाला सापडेल.
सतत समस्यांविषयी बोलणाऱ्या व्यक्तींपासून जेवढे तुम्ही लांब राहीचा प्रयत्न कराल तेवढं तुमच्यासाठी ते चांगलं होईल. अशा लोकांचं ऐकून जरूर घ्या, जर खरंच समस्या असेल आणि तुमच्याकडे त्याचा तोडगा असेल तर नक्कीच त्यांची मदत करा पण त्यांचं ऐकून स्वतःच्या लाईफ मध्ये समस्या निर्माण करू नका कारण ह्याचा परिणाम तुमच्यावर तर होईलच पण जे तुमचे खास लोकं असतात ना त्यांचं मन जास्त दुखावलं जातं आणि त्यातनं काहीच निष्पन्न होत नाही.
आपलं आयुष्य खूप सुंदर आहे. समस्या येतात आणि जातात आणि त्यातनं आपल्याला बरच शिकायलाही मिळतं पण नसलेल्या समस्यांचा तोडगा काढण्यात आणि त्या निर्माण करण्यात आपला मौल्यवान वेळ वाया नका घालवू. एवढं सिम्पल आणि चांगलं आयुष्य कॉम्प्लिकेट नका बनवू. नेहमी खुश राहा, हसत राहा, नवीन गोष्टी शिकत राहा, वाचन करा, फिरायला जा, चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा, नाकारत्मक लोकांपासून, वस्तूंपासून आणि विचारांपासून लांब राहा, असे विचार करा जे तुम्हाला आनंदी ठेवतील आणि काही दिवसात तुम्हाला जाणीव होईल कि तुमच्या आयुष्यात समस्या ही नव्हतीच, ती तुम्ही क्रीएट केलेलीत. कारण तुम्ही जो विचार करता तेच अट्ट्रॅक्ट करत असता.
समस्यांचा नाही तर त्यांच्या सोलुशन्सचा विचार करा आणि नसलेली समस्या येऊ देऊ नका. असं केल्याने तुम्हाला कधीच डिप्रेशन येणार नाही आणि स्वतःसकट तुम्ही दुसऱ्यांच्या आयुष्यात समस्या नाही तर आनंद निर्माण कराल. प्रयत्न करून बघा आणि आपलं आणि आपल्या जवळच्या लोकांचं आयुष्य सोप्पं बनवा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
