सर्वात जवळच्या व्यक्तीने विश्वासघात केल्याशिवाय जाग येत नाही.
अपर्णा कुलकर्णी
निहिरा खूपच गोड आणि लाघवी स्वभावाची होती. त्यात श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी. पण तिच्या वागण्याबोलण्यात कधीच श्रीमंतीचा माज दिसला नाही. कारण पैसा आणि नाती या दोन्ही गोष्टी नीहिरा कधीच मिक्स करत नसे. तिच्या याच स्वभावावर अक्षयने खूप प्रेम केले होते. म्हणूनच निहीराने त्याचा पैसा न बघता त्याच्यातला माणूस पाहून बाबांच्या विरोधात जाऊन लग्न केले होते.
अक्षय हा निहिराच्या ऑफिसमध्ये काम करत होता. नीहीरा छान शिकलेली होती, खरतर तीला नोकरीची गरज नव्हती पण घरात उगाच बसून रहाणे तिला कधीच आवडले नव्हते म्हणूनच कथ्थक, भरतनाट्यम् तिने शिकून घेतले होते शिवाय शिक्षणही पूर्ण केले होते. अक्षय आणि नीहिरा एकाच ऑफिसमध्ये काम करत असल्याने त्यांचे बोलणे होत असे, हळु हळू मैत्री झाली. त्यामुळे शेअरिंग वाढले आणि मैत्रीचे रुपांतर कधी प्रेमात झाले ते निहिराला समजले पण नाही.
त्यात नीहीरा पहिल्यापासूनच लाघवी आणि प्रेमळ असल्यामुळे कोणीही तिच्या पटकन प्रेमात पडणे स्वाभाविक होते. त्यामुळेच अक्षय तिच्या प्रेमात पडला होता. अक्षय त्याच्या आई बाबांसोबत रहात नसे. कारण त्याचे आई बाबा गावाकडे मोकळ्या वातावरणात रहीलेले त्यांना मुंबईचे वातावरण अजिबात आवडत नसे. त्यामुळे अक्षयने सांगूनही ते कधीच मुंबईत राहिले नाहीत.
शिवाय त्यांचे गाव सातारा त्यामुळे जाणे येणे लांबच पडत होते, त्यामुळे अक्षयपण कित्येक महिने तिकडे जात नसे. लग्न झाल्यावर इथेच त्याने एक छोटा फ्लॅट विकत घेतला होता आणि पगारातून त्याचे हप्ते तो भरत होता. एवढ्या मोठ्या घरात राहिलेली निहिर इतक्या छोट्या घरात कशी राहील हा प्रश्न त्याला होताच पण निहिराने खूपच कमी वेळात स्वतःला त्या घरात आणि अक्षयच्या आयुष्यात सामावून घेतले होते.
कारण निहिराचे अक्षयवर खूप प्रेम होते त्याहीपेक्षा होता तो विश्वास. तिला नेहमीच वाटे अक्षयची परिस्थिती कशी ही असली तरीही तो एक व्यक्ती म्हणून, नवरा म्हणून खूप उत्तम आहे. नाहीतर पैशासाठी कित्येक मित्र, मैत्रिणी आपल्या आयुष्यात होतेच की. पैसा पाहिजे म्हणून पुढे मागे करणारे, उगाच तिला इंप्रेस करायचा प्रयत्न करणारे मित्र होतेच पण तिला तिच्या स्वभावाला समजून घेणारा आणि तिच्या पैशावर नाही तर तिच्यावर प्रेम करणारे कोणीतरी हवे होते आणि अक्षयच्या रुपात तो मित्र, सखा, साथीदार तिला मिळाला होता. त्याने कधीच नीहिराच्या प्रॉपर्टीमध्ये किंवा इन्कममध्ये इंटरेस्ट दाखवला नव्हता. तिचा स्वभाव, वागणं बोलणं त्याला आवडले होते म्हणूनच तर बाबांच्या विरोधात जाऊन तिने अक्षयशी लग्न केले होते.
दोघांचा संसार अगदी सुरळीत चालू होता. रोज ऑफिस,काम आणि तिथून घरी आल्यावर कुठेतरी भटकंती ठरलेली असायची. बघता बघता संसाराला एक वर्ष पूर्ण झाले होते. दरम्यान निहिराच्या बाबांनी एक दोन वेळा तिची चौकशी केली होती. शेवटी त्यांची एकुलती एक मुलगी होती ना निहिरा. तिचे ही बाबांवर खूप प्रेम होते. तिचा थाटलेला संसार बघायला तिने बोलावले होते तिच्या बाबांना पण त्यांना अक्षय आवडत नव्हता त्यामुळे ते काही आले नाहीत. त्याचे नीहिराला वाईट वाटले खरे पण तिच्याशी सगळेच संबंध तोडून न टाकता बाबांनी नाते कायम ठेवले यातच तिला समाधान होते.
निहिरा ऑफिसमध्ये काम करत असताना तिच्या बाबांची तब्येत बिघडली असल्याचा फोन आला आणि तशीच ती धावत घरी गेली, सोबत अक्षयपण होताच. तिच्या बाबांना हार्ट अटॅक आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. निहिरा खूप अस्वस्थ झाली होती. तिची आई लहानपणीच तिला सोडून गेली होती त्यानंतर बाबांनीच तिचे पालनपोषण केले होते. कधी आई होऊन तर कधी बाबा होऊन. तिला हवी ती प्रत्येक गोष्ट त्यांनी तिच्या पुढे हजर केली होती त्यामुळे सगळ्या आठवणी ताज्या होऊन डोळ्यावाटे वहात होत्या. अक्षय तिला आधार देऊन घरी आला होता तर बाबांची काळजी घ्यायला निहिरा तिथेच थांबली होती.
थोड्याच दिवसात नीहिराच्या बाबांना बरं वाटायला लागले आणि नीहीरा घरी आली. हार्ट अटॅक आल्यामुळे तिच्या बाबांनी सगळी प्रॉपर्टी निहिरच्या नावे केली होती आणि सगळेच डॉक्युमेंट घेऊन ती घरी आली होती. याची कल्पना तिने अक्षयला पण दिली होती. नीहिर आता अधून मधून बाबांकडे जात होती. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करून येत होती. संध्याकाळी निहिरा काम करत बसली होती तेंव्हा अक्षय तिच्याकडे काही कागदपत्रे घेऊन आला आणि याच्यावर तुझी सही हवी आहे , सही कर असे म्हणाला.
कसले पेपर आहेत अक्षय आणि माझी सही कशासाठी हवी आहे तुला ?? तिने विचारले त्यावर अक्षय म्हणाला अग घराचे कागदपत्र आहेत आणि वारस म्हणून मी तुझे नाव लावले आहे त्यासाठी सह्या हव्यात. अरे पण तू हे घर माझ्या नावे का करत आहेस ?? आई बाबांच्या नावे करायचे ना ?? निहिरा म्हणाली, तसा अक्षय म्हणाला अग आई बाबा फक्त एकदा हे घर पाहण्यासाठी आले. ते ही फक्त दोन दिवस थांबले, त्यांना मुंबईचे वातावरण आवडत नाही आणि सूट पण होत नाही त्यामुळे ते इथे राहणारच नाही.
मग कशाला त्यांच्या नावे करू म्हणून तुझ्या नावे करत आहे. असे म्हटल्यावर निहिराने सह्या केल्या. तिने पेपर अक्षयकडे दिले आणि तेवढ्यात तिचे बाबा घरी आले. निहिराला खूपच आनंद झाला. इतक्या वेळा बोलावून ही बाबा कधी तिच्याकडे आले नव्हते आणि आज न बोलवताच समोर उभे होते. तिने पटकन त्यांना मिठी मारली.
अक्षय हे कसले पेपर आहेत ?? निहीराच्या बाबांनी अक्षयला विचारले. त्यावर अक्षय जरा चपापला आणि म्हणाला हे माझ्या घराचे पेपर आहेत, वारस म्हणून मी निहीराचे नाव लावले आहे त्यासाठी तिच्या सह्या घेण्यासाठी मी पेपर आणले होते. अच्छा,दाखव मला म्हणून निहिराच्या बाबांनी हात पुढे केला पण अक्षय काही पेपर दाखवायला तयार होईना. शेवटी निहीरा म्हणाली अरे अक्षय, दाखव ना पेपर त्यात काय लपवण्यासारखे आहे ?? आता आपली चोरी पकडली जाणार या भीतीने अक्षय तिथून पळाला पण तेवढ्यात नीहिरच्या बाबांनी त्याला पकडले.
हा काय प्रकार सुरू आहे ते निहिराला समजेचना. तिने विचारले तर नीहिराच्या बाबांनी ते पेपर नीहीरासमोर धरले आणि म्हणाले वाच हे पेपर आणि नीट बघ तू कशावर सह्या केल्यात ते. निहीराने पेपर पाहिले तर, त्यात तिच्या नावे असलेली सगळी प्रॉपर्टी ती स्वखुशीने अक्षयच्या नावे करत असल्याचा मजकूर होता आणि त्यावर नीहिराने सह्या केल्या होत्या. ते पाहून निहिराची अवस्था खूप वाईट झाली, मटकन खाली बसली ती. तिने रागाने लाल होत अक्षयकडे पाहिले आणि विचारले काय आहे हे अक्षय ?? आता खरे बोलण्यापलीकडे काही पर्याय नव्हता कारण अक्षयची कॉलर अजूनही निहिराच्या बाबांच्या हातात होती.
अक्षय म्हणाला, तू श्रीमंत बापाची एकुलती एक मुलगी आहे हे मला माहीत होते. मी आजवर खूप गरिबी परिस्थितीत दिवस काढले आणि आयुष्यभर गरिबीत राहण्याची माझी इच्छा नव्हती. त्यामुळे पटकन श्रीमंत होण्यासाठी मी तुझा विश्वास मिळवला, लग्न केले आणि तुझी प्रॉपर्टी कधी मिळते याची वाट पहात होतो. त्यात तुझ्या बाबांनी विल बनवली आहे सगळी प्रॉपर्टी तुला दिली हे तू सांगितले आणि तेच मिळवण्यासाठी मी पेपर मध्ये फेरफार केले आणि इस्टेट माझ्या नावे करून घेतली. हे अक्षयचे बोलणे ऐकून निहिरा चाट पडली. ज्याच्यावर प्रेम केलं, आंधळा विश्वास ठेवला त्यानेच असा घात करावा हे तिला पचवता येईना. तिने उठून सणसणीत थोबाडीत दिल्या अक्षयच्या आणि सरळ पोलिसांच्या ताब्यात दिले.
मला माफ करा बाबा, तुम्ही सांगत असूनही मी तुमचे ऐकले नाही त्याचीच शिक्षा मला मिळाली म्हणत त्यांच्या कुशीत शिरून ती धाय मोकलून रडायला लागली. मला कळतंय बेटा,तुला काय वाटत असेल ते, मी एक व्यापारी माणूस आहे आणि मला माणसांची खूप चांगली पारख आहे बेटा. म्हणूनच तुला याच्याशी लग्न करायला मी विरोध करत होतो पण तुला पटत नव्हते. त्यासाठी मला प्रॉपर्टीचे खोटे पेपर मी तुझ्याकडे दिले कारण पेपर पाहून अक्षय मला अपेक्षित तेच करणार याची खात्री होती आणि त्याने तेच केले. आपल्याच वकिलाकडे तो गेला त्यामुळे मला ते लक्षात आले. पण माझ्यापेक्षा तोच तुला जवळचा आणि विश्वासू वाटत होता आणि कसय सर्वात जवळच्या व्यक्तीने विश्वासघात केल्याशिवाय जाग येत नाही. त्यामुळे मला हे करावे लागले.
म्हणजे बाबा तुम्ही हे ठरवून केलत ?? म्हणजे आपली प्रॉपर्टी सेफ आहे ?? अर्थात ती सेफ आहे आणि सेफच राहील, तिच्याकडे पाहून हसत तिचे बाबा म्हणाले.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
