Skip to content

सर्वच काही डोक्यात साठवून ठेवू नका, तुम्हाला एखाद्याशी बोलायला हवं.

सर्वच काही डोक्यात साठवून ठेवू नका, तुम्हाला एखाद्याशी बोलायला हवं.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


“Welcome to our little world aai!” तारा जवळजवळ ओरडलीच. तारा शिक्षणासाठी म्हणून बाहेर राहत होती. तिथेच तिने आणि तिच्या काही मैत्रिणींनी मिळून एक घर घेतले होते व त्या एकत्र रहात होत्या. सुट्टी मिळाली की सर्व जणी घरी जात. घर पहायच्या वेळी ताराचे बाबा तिच्यासोबत होते. पण आईने मात्र अजून त्यांचे घर पाहिले नव्हते. त्यांचं बोलणं व्हायचं ते एकतर फोनवर किंवा मग ती घरी जायची तेव्हाच. ताराने कितीतरी वेळा आईला आग्रह केला होता, की एकदा येऊन जा, घर बघ. बाबांनी पण कित्येकदा सांगितल होत. पण काही ना काही कारणाने ते राहून जात असे. तिची आई घरातूनच व्यवसाय करायची. सर्व जबाबदारी तिच्यावर असल्याने तिला बाहेर कुठे जाऊन चालायचे नाही.

तरी आज कसातरी वेळ काढून ताराची आई तिला भेटायला आली होती. यायच्या आधी तिने तसे ताराला कळवले देखील होते. म्हणूनच तारा खूप एक्साईट झाली होती. आईसाठी तिने खायला पण काही काही आणून ठेवले होते. तिच्या मैत्रणींमध्ये देखील तिची आई खूप प्रसिद्ध होती. त्या सारखं त्यांच्याबद्दल काही ना काही ऐकत. त्यामुळे त्या देखील भेटायला उत्सुक होत्या. सर्वांनी मिळून त्यांच्या पद्धतीने घर आवरून वैगरे ठेवलं होत. पण शेवटी स्टुडंट्स च घर. ते कसं असणार हे सर्वांना ठाऊकच असेल. स्टँडवर ताराच आईला आणायला गेली. अखंड रस्त्यात तिची बडबड चालू होती. तिचा स्वभावच मुळी बोलका होता. आईला पण तीच कौतुक वाटत होता आणि तिला अस पाहून आनंद देखील होत होता. शेवटी कोणत्याही आई वडिलांना आपलं मुल जिथे कुठे असेल तिथे सुखी असावं अस वाटत असत. तारा नक्कीच आनंदी दिसत होती.

घरी आल्यावर ताराने आणि तिच्या मैत्रिणींनी आईचे मस्त स्वागत केले. चहा पाणी झालं. थोडावेळ बसल्यावर तारा आईला घर दाखवू लागली. खरतर ते तीनच खोल्यांचं घर होत. पण स्वतःच्या हाताने सजवलेले ते घर दाखवताना ताराचा उत्साह नुसता ओसंडून वाहत होता. सोबत किलबिल करणाऱ्या मैत्रिणी होत्याच. गप्पा मारत मारत त्या या खोलीतून त्या खोलीत जात होत्या. त्या घराला दोन बाल्कनी होत्या. या मुलींनी तिथे बसायची व्यवस्था तसच काही ज्यादाच सामान वगैरे तिथं ठेवलं होत. एक बाल्कनी किचनला लागून होती. जेव्हा ती सर्व जण किचनकडे आली तेव्हा अचानक एक दुर्गंध नाकात शिरला. आईने पटकन विचारले, “अग हा कसला घाण वास येतोय इतका? बाकी घर स्वच्छ ठेवलय आणि इथेच असा वास का येतोय?” अस म्हणत त्यांनी नाकाला पदर लावला.

त्यांना अस पाहून सर्व मुली ओशाळल्या. त्यातली एक म्हणाली, “काकू अहो ते actually इथे बाल्कनी मध्ये डस्टबीन ठेवला आहे. त्यातूनच तो वास येतोय.” त्यावर आई म्हणाली, “अग मग तो टाकलात का नाही? इतके दिवस कचरा साठून राहिला घाण नाही का पसरणार? कचरेवाला आला की वेळच्या वेळी टाकून द्यायचा बाळांनो तो कचरा. असा साठवून ठेवून कश्याला घाण करायची?” त्यावर तारा लगबगीने म्हणाली, “अग आई तेच तर ना! तो कचरेवाला बघ ना! आठवडा झाला तरी फिरकला नाही इथे!

मग आम्ही काय करायचं?” यावर आई हसुन म्हणाली, “धन्य आहात बाई पोरी तुम्ही! अग तो आला नाही म्हणून कचरा कोण घरात तसाच साठवून ठेवत का? आणि हे अस साठवून ठेवून उद्या तुम्ही आजारी पडलात तर कोण पाहायला येणार आहे? महत्वाचं काय आहे? तो कचरेवाला की आपलं आरोग्य?” त्यावर सर्व एकसुरात आरोग्य अस म्हणाल्या. “मग जर आरोग्य महत्त्वाचं आहे तर हे अस करून चालणार नाही. आपलं आरोग्य आपल्या हातात आहे. त्याची काळजी घ्यायची असेल तर ती आपणच घेतली पाहिजे. दुसऱ्यावर अवलंबून चालणार नाही. समजलं का काही?” अस म्हणत आईने ताराचा कान हलकेच पिरगळला. आई अस म्हणून तारा ओरडली व सर्व मुली हसू लागल्या. त्यानंतर त्यांनी तो कचरा नेऊन टाकला सर्व घर परत नीट नेटक केल. आईपण मस्त दोन तीन दिवस त्यांच्यासोबत राहून नंतर घरी गेली. पण जाताना चांगली शिकवण देऊन गेली.

आपल्या डोक्यातील नकारात्मक विचार, वाईट आठवणी, त्रास हे सर्व देखील या कचऱ्यासारखं आहे. कोणतरी कधीतरी यातून आपल्याला बाहेर काढेल या आशेने आपण या साऱ्या गोष्टी तश्याच मनात साठवून ठेवतो. पण जसं कचरा खूप जास्त साठवला की त्यातून दुर्गंधी येते तसच याच आहे. आपण जितकं जास्त साठवणार तितका आपल्यालाच त्याचा त्रास होतो.

आपलं बाकी कुठे लक्ष लागत नाही, झोप, भूक सर्व गोष्टींवर याचा परीणाम होतो. आणि एका मर्यादे नंतर या सर्व दाबून ठेवलेल्या गोष्टी चुकीच्या पद्धतीने मार्गाने बाहेर पडतात. म्हणून योग्य वेळी योग्य त्या माणसाकडे आपल्याला आपलं मन स्वतःहून मोकळं केल पाहिजे. आपल्याला जो काही त्रास होत असेल त्यासाठी मदत घेतली पाहिजे. मदत घेण्यात काही कमीपणा नसतो. समोरून मदतीचा हात द्यायला खूप जण येतील. पण पुढाकार आपल्यालाच घेतला पाहिजे आणि यातून बाहेर पडल पाहिजे.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “सर्वच काही डोक्यात साठवून ठेवू नका, तुम्हाला एखाद्याशी बोलायला हवं.”

  1. हा लेख वाचून मला एक नविन मार्ग दिसला स्वतःच्या अडचणी आपण स्वतःच दूर केल्या पाहिजेत त्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केला पाहिजे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *