जे घडत आहे ते मनासारखंच आहे.. हा आपला संकुचितपणा की विकसितपणा??
मेराज बागवान
प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही, हे आपण सर्वजण जाणतो.कारण काही गोष्टी आपल्या हातात नसतात.पण आपण प्रयत्न मात्र नक्की करू शकतो.पण आपल्याला जसे वाटते तसे होईलच याची शाश्वती नसते.मग अशा वेळी एक मानसिकता समोर येते ती म्हणजे ,’जे घडत आहे ते मनासारखंच आहे’.पण ही मानसिकता कितपत योग्य ठरते? आणि वास्तविक जीवनात याचा किती उपयोग होतो? यावरूनच आपली ही मानसिकता संकुचितपणाचे लक्षण आहे की विकसितपणाचे लक्षण आहे हे लक्षात येते.
अनेक चांगले-वाईट प्रसंग घडत असतात.कधी तरी आपण ठरवितो एक, पण होते दुसरेच.जसे की , करिअर च्या बाबतीत घेऊयात.’स्नेहा’ ने ठरविले होते की ,डॉक्टर व्हायचे पण तिला तिथे प्रवेश मिळाला नाही, पण फार्मसी शाखेत तिला लगेच प्रवेश मिळाला.आणि आज ती एक यशस्वी ‘फार्मासिस्ट’ म्हणून नाव कमवत आहे.स्नेहा देखील खूप समाधानी आहे आणि डॉक्टर होता आले नाही याची खंत देखील तिच्या मनातून कायमची निघून गेली आहे.ही मानसिकता म्हणजे ‘विकसितपणा’ होय.ह्यात संकुचितपणा कुठेच नाही आणि जर तो असता तर आज स्नेहा इतकी यशस्वी झाली नसती.
पण कधी कधी मन हे वास्तव स्वीकारायला काही केल्या तयार नसते.’आरव’ चे एका मुलीवर खूप प्रेम होते.पण ते प्रेम मात्र एकतर्फी होते.दोघे नेहमी बोलत असत.गप्पा-गोष्टी, शेअरिंग सर्व सुरू असे.ती मुलगी मात्र आरव ला फक्त एक चांगला मित्र मानत होती आणि एक चांगला माणूस देखील समजत होती आणि यामुळेच ती आरव बरोबर मुक्तपणे संवाद साधू शकत होती.
मात्र आरव तिच्यात गुंतला होता.पण दुसरीकडे तो हे ही जाणत होता की , तिच्या मनात तसे काही नाही.पण तरी देखील त्याचे दुसरे भावनिक मन त्याला असे सांगत होते की ,’ती इतके बोलत आहे माझ्याशी तर तिचं देखील माझ्यावर खूप प्रेम आहे,ती मला पसंत करते,फक्त बोलायला लाजत आहे’.हा झाला संकुचितपणा.कारण इथे आरव चे मन वास्तव स्वीकारायला घाबरत आहे.
कित्येकदा आयुष्य आपल्याला एखाद्या गोष्टीसाठी खूप वाट बघायला लावते.मग अशा वेळी आपण ठेवलेला संयम, आणि उशिरा का होईना जे होत आहे ते आपल्या मनासारखेच आहे ,हा दृष्टिकोन खूप उपयोगी पडतो.कधी परीक्षेत वारंवार अपयश येत असते, कधी नोकरी लवकर लागत नाही, कधी वारंवार आर्थिक समस्या येत असतात.मग अशा बिकट परिस्थितीत जर का आपण हा दृष्टिकोन ठेवला की , ‘जे घडत आहे ते मानासारखच आहे’ तर तो आपला विकसितपणा ठरेल.
माणसाने नेहमी वाईट, नकारात्मक, संकटकाळी खूप शांत राहिले पाहिजे. कारण आपली इतरांशी आणि स्वतःशी देखील ओळख याच परिस्थितीत होत असते.आणि ह्या परिस्थितीत ,’जे घडत आहे ते मनासारखच आहे’ ही मानसिकता खरेच विकसितपणा ठरते.मात्र ज्या गोष्टी आपल्या हातात नसतात , जसे की एखाद्या व्यक्तीशीच लग्न जमणे, अमुक एका कंपनीतच प्रथम नोकरी मिळणे, स्पर्धा परीक्षेत हमखास यश मिळालेच पाहिजे , ह्या बाबतीत मात्र ही मानसिकता लागू होत नाही.आणि जर का आपण उगाचच , जबरदस्तीने स्वतःवर ती लागू करून घेत असू तर मग हा नक्कीच संकुचितपणा आहे.
संकुचितपणा म्हणजे तरी काय ? संकुचितपणा म्हणजे ,फक्त तेवढाच विचार करणे होय, जे माझे मन इच्छित आहे , बस तेवढेच, बाकी मला काही माहीत नाही.एखाद्या गोष्टीविषयीचे विविध अंग विचारात न घेता , विचार करणे, फक्त आपल्यापुरता विचार करणे म्हणजे संकुचितपणा. विकसितपणा म्हणजे समजूतदारपणा.म्हणजेच एखाद्या गोष्टीचा सर्वांगाने विचार करणे, त्याचे फायदे-तोटे-धोके विचारात घेणे.कारणे, समस्या, परिणाम याचा सर्व सारासार विचार करणे.
मग आता तुम्हीच विचार करा की ,’जे घडत आहे ते मनासारखच आहे’ या मागे आपली कोणती मानसिकता आहे ? संकुचितपणाची की विकसीतपणाची??
संकुचितपणा आपापल्या आयुष्यात पुढे जाऊ देत नाही.आपले आयुष्य आहे तिथेच राहते.कोणतीच प्रगती होत नाही. मात्र विकसितपणा कायम आपल्याला आयुष्यात पुढे जाण्यास शिकवितो.यश संपादन करण्यास मदत करतो.
म्हणूच जे आपण बदलू शकत नाही, ते मनापासून स्वीकारता आले पाहिजे. आणि जे बदलू शकतो त्या गोष्टीसाठी कायम प्रयत्न केले पाहिजेत आणि अशा गोष्टींविषयी कायम विश्वास ठेवला पाहिजे की , ‘जे घडत आहे ते मनासारखच आहे’.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
