Skip to content

संकटं यायची कधीच थांबणार नाहीत, उलट त्यामुळे जगण्याला नवीन अर्थ मिळत राहील.

संकटं यायची कधीच थांबणार नाहीत, उलट त्यामुळे जगण्याला नवीन अर्थ मिळत राहील.


अपर्णा कुलकर्णी


केदारचा आज ऑफिसमध्ये पहिलाच दिवस होता. त्यामुळे वेळेआधीच तो ऑफिसमध्ये पोहचला होता. तसा केदार खूप हुशार आणि प्रामाणिक मुलगा होता. या नोकरीसाठी त्याने खूप मेहनत घेतली होती आणि नोकरीच्या रूपात त्याचे फळही त्याला मिळाले होते. आजचा दिवस कामाची सगळी ओळख करण्यात निघून गेला होता. त्याचा स्टाफ आणि बॉस दोघेही खूप छान होते. तो सगळ्यांचा निरोप घेऊन घरी निघाला होता. त्याची आई त्याचीच वाट बघत होती. त्याला समोर पाहून ती धावत दाराशी आली आणि कसा होता दिवस केदार ?? ऑफिस छान आहे ना?? आज तुला दिलेले काम तू नीट केलेस ना ?? तुला जमतंय ना तुझ काम ?? तुझे सर काय म्हणाले ?? असा प्रश्नांचा भडिमार केला त्याच्या आईने. तो घरात आला आणि त्याने आईला पाणी देत ऑफिस मध्ये काय झाले ते सगळे सविस्तर सांगितले.

काय करू केदार, एकतर तुला जॉब मिळवण्यासाठी खूपच संघर्ष करावा लागला आहे. त्यात आपण मध्यमवर्गीय. लहापणापासूनच मी आणि तुझ्या बाबांनी खूप कष्टाने तुला वाढवले आहे. तुझ्या सगळ्या गरजा पूर्ण करता याव्यात यासाठी दुसरे मुल होऊ दिले नाही आम्ही, त्यात आता तुझे लग्न ठरले आहे त्यामुळे तुझ्या नोकरीची खूप काळजी वाटत होती मला, केदारची आई म्हणाली. हो आई, मला सगळ्या गोष्टींची खूप चांगली कल्पना आहे. म्हणूनच आज सगळ्यात आधी ऑफिसला गेलो होतो, सगळ्या कामाची नीट माहिती घेतली आणि मगच आलो. पण आई रिचाच्या घरच्यांना आणि रीचाला पण माझ्या पागराबद्दल एकदा नीट सांगायला हवे. ते मला पाहायला आले होते त्यावेळी त्यांना भल्यामोठ्या पगाराचा मुलगा जावई म्हणून हवा होता, मला इन्फोसिसमध्ये जॉब लागला असता तर कदाचित पॅकेज मस्त मिळाले असते पण मला इन्फोसिसमध्ये नोकरी नाही मिळाली त्यामुळे त्यांना खरे काय ते सांगायला हवे आहे. बरोबर आहे तू म्हणतोस ते. मी तुझ्या बाबांना सांगते त्यांच्याशी बोलायला.

केदार आता ऑफिसमध्ये चांगलाच रुळला होता. त्याच्या कामाचा उरक पाहून सगळेच त्याच्यावर खूप खुश होते. त्यामुळे तो ही खूपच आनंदात होता. तो ऑफिस संपवून बाहेर पडला तर रिचा त्याची वाट पाहत समोरच उभी होती. अरे रिचा तू ?? तू कधी आलीस ?? मला फोन तरी करायचा ना. मी जरा लवकर आलो असतो केदार म्हणाला. नाही, मी माझ्या ऑफिसमधून दोन मिनिटापूर्वीच आले. म्हणून मग फोन केला नाही. आपण कुठेतरी बसून बोलूया का ?? रिचा म्हणाली. दोघेही एका कॉफीशॉपमध्ये गेले आणि रीचाने बोलायला सुरुवात केली, हे बघ केदार, मी इंजिनियर आहे आणि तू ही आहेस. तू इन्फोसिसचे दोन इंटरव्ह्यू पास केले होतेस आणि तिसरा पूर्ण झाल्यावर तुला नोकरी मिळणार असे तू म्हणाला होतास. म्हणूनच मी तुला होकार दिला होता पण दुर्दैवाने तसे झाले नाही. त्यामुळे तुला मिळेल त्या नोकरीत आणि पॅकेजमध्ये समाधान मानावे लागले आणि ते तू मानलेस. तसेच प्रमाणिक पणाने ते माझ्या घरी सांगितलेस. त्याबद्दल खरंच मला तुझ कौतुक वाटतं पण माझी स्वप्ने, अपेक्षा खूप वेगळी आहेत. हाय लेवलची आहेत. त्यामुळे माझा या लग्नाला नकार आहे. केदार रिचाचे बोलणे ऐकून शॉक होतो आणि म्हणतो, अग पण तुझ्या बाबांनी तर होकार कळवला होता माझ्या बाबांना. त्या दोघांचं बोलणं झालं आहे माझ्या जॉबबद्दल. हो ते मला माहित आहे पण माझ्या बाबांना तुझा प्रमाणिक स्वभाव खूप आवडला आणि त्यांनी होकार दिला. माज मत त्यांनी विचारात घेतलं नव्हत आणि तेच सांगायला मी इथे आले आहे. सॉरी पण हे लग्न नाही होऊ शकत असे म्हणून रिचा निघून गेली.

रिचाचे बोलणे ऐकून केदार बराच वेळ कॉफीशॉपमध्ये बसून राहिला. तो स्वतः तर निराश झालाच होता पण आता आई बाबांना कसं फेस करायचं हा मोठा प्रश्न त्याच्या समोर उभा होता. त्याची पाऊले घराकडे वळायला तयारच नव्हती. आई बाबांना सामोरे जाण्याची त्याची हिम्मत नव्हती. कसाबसा चेहरा नॉर्मल करून तो घरात आला आणि मोठ्या हिमतीने त्याने सगळे घरी सांगितले. केदारचे आई बाबा खूप हताश झाले. त्या दिवशी घरात कोणीच जेवले नाही. दुसऱ्या दिवशी केदारने आई बाबांना समोर बसवले आणि म्हणाला, बाबा रिचाने लग्न मोडून योग्य तेच केले. जे झालं ते चांगलच झालं. तिने नाईलाजाने लग्न केले असते आणि नंतर वाद झाले असते तर त्याचा मनस्ताप किती सहन करावा लागला असता. आणि तिच्या अपेक्षा नसत्या पूर्ण करू शकलो बाबा आपण. ती ऐशो आरामात जगणारी मुलगी आहे. आपल्याला झेपण्यापलीकडचे होते सगळे. त्यामुळे मला एखादी कमी शिकलेली, पण लाघवी स्वभावाची मुलगी बघा.

केदारच्या आई बाबांना ते पटले आणि लवकरात लवकर त्यांनी केदारच्या अपेक्षेप्रमाणे कमी शिकलेली पण गोड स्वभावाची मुलगी सून म्हणून आणली. केदार आणि पूजाचा संसार बघता बघता सुरू झाला. पूजा खरंच स्वभावाने गोड होती. पार्ट टाईम नोकरी करत संसाराला हातभार लावत होती. केदारचे आणि पुजाचे स्वभाव एकमेकांशी चांगलेच जुळले होते. पाच वर्षांच्या काळात त्यांना परी आणि कार्तिक अशी दोन मुले पण झाली होती. सगळे छान सुरू होते. खरतर पूजा ही केदरच्या बाबांच्या जुन्या मित्रांची मुलगी. त्या निमित्ताने दोन जुन्या मित्रांची पुन्हा मैत्री झाली होती.

पूजाचा पायगुण केदारसाठी शुभ ठरला होता. लग्नानंतर लगेच त्याचे प्रमोशन झाले होते आणि पगार वाढला होता. पण म्हणतात ना आपण फार काळ सुखात राहू शकत नाही आणि दुःखात पण. त्यामुळे केदार आणि पूजाच्या सुखाला नजर लागली होती. केदारची कंपनी अचानक बंद पडली होती आणि त्यामुळे हातचा जॉब गेला होता. घरावर पुन्हा संकट आले होते. त्यात मुलांचे शिक्षण, घरखर्च सगळे एकट्या पूजाच्या पगारावर जमणे केवळ अशक्य होते. केदार रोज अनेक ठिकाणी इंटरव्ह्यू साठी जात होता पण यश त्याच्यावर रुसून बसले होते की काय कोण जाणे. त्याला नोकरी काही केल्या मिळत नव्हती. त्याच्या सासर्यानी अनेक ठिकाणी जॉबसाठी बोलून ठेवले होते त्यामुळे एका ठिकाणी त्याला जॉब मिळाला होता पण त्याला भारता बाहेरच्या कंपनीत शिफ्ट व्हावे लागणार होते. केदार आजवर कधीच घरच्यांना सोडुन असा गेला नव्हता पण पैसा मिळवणे त्याच्यासाठी तितकेच महत्त्वाचे होते. तसे त्याचे सासरे अनेक ठिकाणी प्रयत्न करत होते त्याच्या नोकरीसाठी पण तोपर्यंत त्याने हा जॉब करण्याचे ठरवले होते.

पण पूजाला आणि केदारच्या आईला त्याचा हा निर्णय मान्य नव्हता. जॉब जॉईन करायला दोनच दिवस बाकी होते, केदार निघण्याच्या तयारीत होता तेवढ्यात केदारच्या आईची तब्येत अचानक बिघडली. त्यांना हॉस्पिटलमध्ये अडमिट करावे लागले. त्या बेशुध्द होत्या, आणि त्यात सतत केदारचेच नाव घेत होत्या. त्यामुळे केदार जॉबसाठी जाऊ शकला नाही. आईसाठी आणि जॉबसाठी केदारला खूप वाईट वाटत होते. त्यात आता हॉस्पिटलचे बील कसे द्यावे हा प्रश्न पण होताच. पूजा ने स्वतःचे दागिने गहाण टाकून बिल भरले आणि सासूबाईना घरी आणले. केदार खूप अस्वस्थ झाला होता. आपण असताना आपल्या बायकोचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आल्यामुळे त्याचे मन त्याला खात होते.

तर आपण आजारी पडल्यामुळे केदरचा जॉब गेला याचे केदारच्या आईला खूप वाईट वाटत होते. पण कोणीच कोणाशी काहीच बोलत नव्हते. तेवढ्यात पूजाचे बाबा आले आणि येताना पेढे घेऊनच आले. सगळ्यांना आश्चर्य वाटले, पूजा त्यांना म्हणाली बाबा घरात वातावरण काय ते तुम्हाला माहित आहे ना तरीही तुम्ही पेढे घेऊन कसे आलात ?? बाबा म्हणाले अग पोरी बातमीच तशी आहे. मागे एका कंपनीत जावई बापूंनी इंटरव्ह्यू दिला होता ना तिथून त्यांना नोकरीसाठी बोलावणे आले आहे आणि त्याहून आनंदाची बातमी म्हणजे भारता बाहेर जितका पगार मिळत होता त्याहून जास्त पगार आहे इथे. हे बघ मी घेऊन आलो आहे रुजू होण्याचे पत्र. केदारने त्यांच्या हातातून पत्र म्हणजे appointment लेटर चक्क ओढून घेतले आणि ते वाचून त्याच्या डोळ्यात आनंदअश्रू उभे राहीले. त्याने पटकन सासर्याचे आशिर्वाद घेतले आणि म्हणाला हे तुमच्या प्रयत्ना मुळे शक्य झालं बाबा नाहीतर आज हा दिवस मी बघू शकलो नसतो. त्यावर सासरे म्हणाले जावई बापू तुम्ही भारताबाहेर नोकरीसाठी गेला नाहीत तेच बरे झाले ना, इथेच कुटुंबा सोबत राहून तुम्हाला जास्त पगाराची नोकरी मिळाली. आयुष्यात संकटं येतच राहणार ती कधीच थांबणार नाहीत पण उलट त्यामुळे जगण्याला नवा अर्थ मिळत राहील. त्यामुळे लढण्याची हिंमत ठेवायची.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!