समजून घेणं चांगलं आहे, पण दरवेळी नाही.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
कोणत्याही नात्यामध्ये मग ते पालकांचं आपल्या मुलांशी असुदे, भाऊ बहिण, मैत्री, कामाच्या ठिकाणी जसा आदर, विश्वास, प्रेमाची, आपुलकीची भावना गरजेची असते, महत्त्वाची असते, तस समजून घेणं, सांगणं पण महत्त्वाचं असत. समजूतदार माणूस योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळू शकतो कारण त्याला त्यावेळी काय गरजेचं असत, काय केल्याने गोष्टी बिघडणार नाहीत हे माहीत असत. समजूतदारपणा हा गुण असण खूप गरजेचं आहे. सर्व माणसांकडे हा गुण असतोच अस नाही. पण ज्यांच्याकडे हा गुण असतो त्यांना माणसं चांगल्या पद्धतीने जोडून ठेवतात येतात. अशी माणसं विश्वासू असतात. इतर लोक यांच्यावर विश्वास ठेवतात कारण त्यांना माहीत असत की काही कमी जास्त झालं तर ही व्यक्ती मला समजून घेणार. माझ्यावर आरोप प्रत्यारोप होणार नाहीत.
समजूतदारपणाचा हा धागा माणसांना जोडून ठेवतो, एकत्र आणतो. नात भक्कम करतो. पण आधी म्हटल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट दोन्ही बाजूंनी असली तर अजून चांगली राहते. असा आग्रह नाही की दोन माणसांनी एकाच वेळी समजूतदारपणा दाखवला पाहिजे. एकाच वेळी दोघांनी एकमेकांना समजून घेतलं पाहिजे. अस कोणीही असत नाही. सर्वांमध्ये चांगल्या, वाईट दोन्ही गोष्टी असतात. परफेक्ट कोण असत? कोणीही नाही.
पण म्हणून आपल्यात बदलच करायचा नाही अस होत नाही. काही व्यक्ती स्वभावाने जरा हट्टी असतात, तर काही मुळातच शांत, समजूतदार स्वभावाच्या असतात. त्यांना काही सांगावं लागतं नाही. आपसुकच त्यांचं त्यांना समजत व त्या सर्व हाताळतात. पण व्यक्ती मुळातच समजूत घेणारी आहे, दर वेळी ऐकते म्हणून तिला गृहीत धरणं ही गोष्ट मात्र योग्य नाही. आपला स्वभाव कितीही हट्टी असुदे, पण समोरची व्यक्ती जर आपल्यासाठी इतकं करत आहे, समजूतदार पणा दाखवत आहे तर आपणही कधीतरी तस करायला हरकत नसते. वय वाढलं तरी अनेक लोकांना हीच गोष्ट नेमकी समजत नाही.
नात्यात तंटे, दुरावा, मतभेद होण्याची कारण अनेक असतात त्यातल एक कारण हेच असत की कुठेही समतोल नाही. आज मी दोन पावलं मागे सरले तर उद्या तू मला सावरून घे अशी वृत्तीच नाही. एक सहन करतच जातोय आणि दुसरा मनमानी करतोय अश्या दोन्ही टोकाच्या भूमिका असल्याने समस्या निर्माण होतात. एकत्र असताना, बोल चाल, विचारांची देवाण घेवाण करताना जो एक सुवर्ण मध्य असावा लागतो तो असत नाही. मधला मार्गच मिळत नाही. मोठ मोठ कंपन्या चालवायच्या असतील, त्यांचं आऊटपुट चांगल यायला हवं असेल तर त्यांचे आंतरवैयक्तिक संबंध चांगले असावे लागतात, म्हणजेच तिथल्या लोकांचं एकमेकांशी असलेले नात चांगल असावं लागतं. ज्यामध्ये वरिष्ठ अधिकारी, बॉस पण येतात. अस झालं नाही तर त्याचे परिणाम नंतर दिसून येतातच.
त्यामुळे समजूतदारपणा हा असा गुण आहे जो असला तर गोष्टी सुकर होतात. पण पुन्हा तिचं गोष्ट येते की टोकाच्या भूमिका, गोष्टी या चुकीच्या त्रासदायकच ठरतात. जसं हट्टी असण चुकीचं आहे तस प्रत्येक गोष्टीत अती समजूतदार पणा दाखवणं देखील आपल्यालाच अडचणीत टाकू शकत. कारण आपणच प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींमध्ये माघार घेऊन, समजूतदारपणा दाखवून समोरच्या व्यक्तीला आपल्याला गृहीत धरायची संधी उपलब्ध करून देत असतो. अनेक घरातल्या स्त्रिया विशेषकरून गृहिणी; कितीही समजुतदारपणा दाखवला, पडती बाजू घेतली तरी बोल ऐकून घ्यावे लागतात, कदर केली जात नाही. अस का होत? कारण आपण आपलं म्हणून काहीतरी मत आहे हेच दाखवून देत नाही. आपलं स्वतंत्र अस्तित्व आहे हेच सांगत नाही. आपल्या माणसांसाठी, इतरांसाठी त्यागाची भावना असावी, निस्वार्थपणे करण असावं, पण म्हणून स्वतः ला पूर्ण विसरून जायची काही गरज नसते.
आपल्याला स्वतःसाठी जगता आलं पाहिजे. असा समजुतदारपणा जो आपल्यासाठीच समस्या निर्माण करेल तो काय कामाचा? ज्यातून काहीतरी चांगल निष्पन्न न होता आपल्यासाठीच पुढे जाऊन गोष्टी अजून कठीण होऊन जातील त्या आपणच बदलल्या पाहिजेत. स्वतःसाठी स्वतःच्या चांगल्यासाठी लढता आल पाहिजे. आपण जर आपला आदर ठेवला तरच समोरची व्यक्ती ठेवते. म्हणूनच लक्षात ठेवा की समजून घेणं चांगलं आहे, पण दरवेळी नाही.
ळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

