Skip to content

एक लक्षात असुद्या, समोरच्याला आपण नकोसे झालो असेल तर तो आपल्यात नको त्या चुका काढतो.

एक लक्षात असुद्या, समोरच्याला आपण नकोसे झालो असेल तर तो आपल्यात नको त्या चुका काढतो.


हर्षदा पिंपळे


रेश्मा आणि पुजा तशा चांगल्या मैत्रिणी होत्या.एकाच रूमवर दोघी रहात होत्या. दोघीही नोकरी करत होत्या. वेगवेगळ्या शहरातून आलेल्या या दोघींमध्ये सुरूवातीला छान मैत्री होती.एकमेकींच काही चुकत असेल तर दोघीही एकमेकींना हक्काने त्या चुका सांगायच्या. एकमेकींना शक्य होईल तितकी प्रत्येक गोष्टीत मदत करायच्या.

पहा आता पैसा आल्यावर एखादा मनुष्य स्वतःचे पाय जमिनीवर ठेऊनच वावरतो.तर एखादा मनुष्य हवेत उडायला लागतो.अर्थात एकेकाळी आपण काय होतो हे तो मनुष्य विसरून जातो.अगदी तसच पूजाला नोकरीमध्ये बढती मिळाली. आणि ती पैशामध्ये हरवून गेली.

एखाद्या गोष्टीची हाव कशी असते तशीच पुजाला पैशाची हाव होती हे नंतर रेश्माच्या लक्षात यायला लागलं.अधूनमधून पुजा रेश्माला तिच्या मी पगारावरून काही ना काही टोमणे मारतच रहायची.रेश्माने अनेकदा याकडे दुर्लक्ष केलं. पण दिवसेंदिवस पुजाच असं वागणं वाढतच होतं.रेश्माने मात्र नंतर मौन सोडलं.

रेश्माने पुजाला सरळ भाषेत समजावून सांगितले. पण ते मात्र पुजाला आवडलं नाही. तिच्याकडे आत्ता पैसा होता.आणि त्याच पैशाच्या जोरावर ती रेश्माला डिवचत होती.तिला आता रेश्मा रूममध्ये नकोशी झाली होती.रेश्माने लवकरात लवकर रूम सोडून जावं असं तिला वाटत होतं.आणि म्हणूनच ति सातत्याने रेश्माच्या चुका काढू लागली.

रूममधील पसारा,आणि रूमशी संबंधित सगळ्या गोष्टींमध्ये पुजा रेश्माच्या चूका काढत होती.रेश्माला एकदा दोनदा वाटलं की झालं असेल आपल्याकडून काहीतरी चुक.परंतु नंतर नंतर रेश्माच्या लक्षात येऊ लागलं.पूजा हे मुद्दाम करत होती.शेवटी पूजाच्या अशा वागण्याला कंटाळून रेश्मा कायमची रूम सोडून निघून गेली.

पहा…..
आपण कुणालातरी हवेहवेसे वाटतो ही भावना मुळातच खूप सुखावणारी असते.आपण खरच कुणाच्या तरी उपयोगी येतो,आपल्यामुळे कुणीतरी आनंदी राहतय या गोष्टी म्हणजे सोन्याहून पिवळ्या वाटतात. परंतु याच्या उलट म्हणजेच आपण कुणालातरी नकोसे असणं ही भावना मनाला मुळीच सुखावणारी नसते.त्यावेळी मन मनास खायला लागतं.

आपल्याला आपल्यातच काही कमी आहे असं वाटत रहातं.यात कधी आपली चुक असते तर कधी समोरच्याची चुक असते.पण एक गोष्ट तितकीच खरी प्रत्येकवेळी आपण समोरच्याला हवेहवेसे वाटणं म्हणजे अशक्य आहे. एकवेळ अशीही असते की जेव्हा समोरच्याला आपण नकोनकोसे झालेलो असतो.आणि अशावेळी समोरच्याला आपल्यामध्ये काहीही चांगल दिसून येत नाही. प्रत्येक गोष्टीत तो आपल्या चुकाच काढत राहतो.आपण एकही गोष्ट व्यवस्थित केलेली नाही हे समोरची व्यक्ती आपल्याला पावलापावलावर सांगत राहते.

चूक नसतानाही जर कुणी आपल्याला असं करत असेल तर आपल्याला वाईट वाटणं अगदी साहजिक आहे. पण याचाच अर्थ असा की आपण त्या व्यक्तीला खरच नकोसे झालेलो असतो.नाहीतर चूक नसतानाही उगाच असं कोण बोलत नाही. चूक असेल तर एखादा माणूस त्या चूकीची जाणीव करून देतो.पुन्हा अशी चूक होणार नाही याची कबुली घेतो.चूका सुधरवण्यासठी मदत करतो.परंतु मुद्दाम चूका काढणाऱ्या मनुष्याला काय म्हणावं…??

मस्करी मस्करी मध्ये एकदा दोनदा चूक नसतानाही चूक आहे असं दाखवणं ठीक आहे. पण मस्करी वेगळी आणि सातत्याने एखाद्याला चुक नसतानाही त्याची चूक दाखवणे म्हणजे काहीतरी भलतच आहे.

वरील गोष्टीतून नक्कीच तुमच्या लक्षात येऊ शकतं.कोण कोणत्या वेळी कसं वागू शकतं.पहा तुम्हीही ही गोष्ट लक्षात घ्या.तुमच्या बाबतीतही असं होत असेल तर नक्की विचार करा.रेश्मासारखीच तुमचीही अवस्था असू शकते.आणि पूजासारखीच कुणीतरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात असु शकते.

अनेकदा कुणीच समोरच्या व्यक्तीला स्पष्टपणे सांगत नाही की “तु मला माझ्या आयुष्यात नको वगैरे”.त्या व्यक्तीला आयुष्यातून घालवण्यासाठी ती व्यक्ती वेगवेगळ्या ट्रीक्स वापरते.त्यातल्या त्यात चुका हा मार्ग त्यांना सर्वात सोपा वाटतो.विनाकारण चूका दाखवून ते त्यांना काय सांगायचय ह्याची जाणीव करून देतात.

सातत्याने आपलं हे चुकलं ते चुकलं .तु हे असच केलं तसचं केलं.असं बोलून बोलून समोरच्या व्यक्तीला अक्षरशः हैराण करून सोडतात. तर असं तुमच्या बाबतीत असं होत असेल तर आपण समोरच्याला नको आहे का याची खात्री करून घ्या.आणि जर तसं असेल तर वेळीच या सगळ्यातून बाहेर पडा.नाहीतर उगाचच मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो यात शंका नाही.

(तुम्हीही इतरांसोबत असे वागू नका.जी व्यक्ती नकोशी झाली असेल तर तिला ते स्पष्टपणे सांगा.उगाचच न केलेल्या चूकांची शिक्षा त्यांना देऊ नका.)


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!