समोरचा आपल्याला काय समजतो हे जाणून घेणं खरंच महत्त्वाचं असतं का?
काव्या गागांग्रास
(समुपदेशक)
निखिल तु घे या वक्तृत्व स्पर्धेत भाग, मला खात्री आहे तू नक्की छान बोलशील या स्पर्धेत. एरवी तर तुझी बडबड, एखादा विषय मांडणं, त्यावर बोलण चालूच असत की! आता तेच तुला स्पर्धेत करायला काय हरकत आहे? आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तुला ही स्पर्धा अगदी सोप्पी जाईल. तुझी आई तुला इतका पाठिंबा देते आहे तरी तुझा स्वतःवर विश्वास कसा रे नाही? कमाल करतोस तू अगदी! आई निखिलला गेल्या दोन दिवसांपासून समजावत होती. आता ती सांगून सांगून वैतागली होती पण निखिल काही केल्या तयार होत नव्हता. अग आई तुला मी काहीही बोललो ना तरी छान वाटत. पण म्हणून मी स्पर्धेत भाग घेऊ का? एरवी जे मी बोलतो ते वेगळं आणि स्पर्धेत भाग घेऊन बोलण वेगळं.
बोलायचा पण प्रश्न नाही. पण तिथे सर्व शाळांमधील मुल असणार, शिक्षक असणार. तुला माझे मित्र, आमच्या वर्गातली मुल माहीत नाहीत. समोरच्या माणसाची थट्टा करायची एक संधी सोडत नाहीत ते. आणि तसही वर्गात माझी इमेज जरा वेगळी आहे. तिथे मी स्पोर्ट्स साठी फेमस आहे. एक उत्तम प्लेअर म्हणून सर्व ओळखतात मला. हे अस असताना मी असल्या स्पर्धेत भाग घेतला तर माझी इमेज पूर्ण बदलून जाईल.
काय विचार करतील सर्व माझ्याबद्दल? काय समजतील मला? ते काही नाही, जोपर्यंत मला खात्री होत नाही की माझं हे टॅलेंट पण इतरांना आवडू शकत, जेव्हा मी अश्या प्रकारे लोकांसमोर स्वतः ला प्रेसेंट करेन तेव्हा लोक काय विचार करतील याचा मला अंदाज आला पाहिजे, हे जाणून घेणं माझ्यासाठी गरजेचं आहे. एकदा मला ते समजलं की मी विचार करेन अश्या स्पर्धेत भाग घ्यायचा की नाही.
आता मात्र निखिलच्या आईला राग आला. अरे निखिल, हा काय वेडेपणा आहे? इतरांच्या संमतीने, त्यांच्या नजरेने का आपण आपलं आयुष्य जगतो? ते तुला काहीही समजत असतील शेवटी तो त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यावर अवलंबून राहून, ते जाणून घेण्याच्या हट्टापायी तू स्वतःला नाही अस बांधून ठेवू शकत. आणि तू जर स्पर्धेत भागच नाही घेतला तर तुला कसं समजणार इतरांची प्रतिक्रिया काय आहे? तू स्वतःच सर्व ठरवून मोकळं होत आहेस? तुझ्या या बोलण्यात कितपत तथ्य आहे तूच सांग.
कदाचित असही होऊ शकत की तुझी ही बाजू पण तुझ्या मित्रांना आवडेल. दोन्ही शक्यता आहेत. पण हे सर्व महत्त्वाचं नाही. आपण एखादी गोष्ट करावी ती आपली कला समृध्द व्हावी यासाठी, त्यातून आपलं व्यक्तिमत्त्व खुलून निघाव यासाठी. सतत जर इतर काय म्हणतील, त्यांना मी कसा वाटत असेन? त्यांच्या मनात माझं चित्र कसं आहे हे जाणून घेण्याच्या मागे तू राहिलास तर तू काही करू शकणार नाही.
कारण प्रत्येक जण आपापल्या नजरेतून, अनुभवातून समोरच्या माणसाचं चित्र उभ करत असतो. गरजेचं नाही ते तसच असेल.
एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, जितकं आपण स्वतःला ओळखत असतो, जितकी माहिती आपल्याला स्वतः बद्दल असते तितकी कोणालाच असत नाही. कारण आपण सर्वात जास्त सोबत असतो ते आपल्याच. त्यामुळे आपल्याला स्वतःची माहिती दुसऱ्याकडून करून घ्यायची काही गरज नाही. लोक काही वेळा चांगल मानतील, आदर देतील, कौतुक करतील, नाव ठेवतील, चेष्टा निंदा करतील. हे होतच राहणार. पण म्हणून त्यानुसार आपण स्वतः ला नाही ना बदलू शकत. त्यानुसार आपण आपलं आयुष्य जगू शकत नाही.
हे अस जाणून घेणं, अप्रुवल घेणं आपण तेव्हाच करतो जेव्हा आपल्याला स्वतः बद्दल, स्वतःच्या क्षमतांची माहिती नसते, जाणीव नसते. तेव्हा आपण अश्या बाहेरच्या शोधत निघतो. खरतर इथे स्वतः बद्दल जाणून घेण्याची आपल्या अनुभवनांतून आत्मपरिक्षण करण्याची गरज असते.
आपल्याला जर माहीत असेल, खात्री असेल की आपण जे काही करत आहोत त्यातून आपल्याला आणि दुसऱ्याला काही नुकसान होणार नाही. आपण जे काही करत आहोत ते आपल्या फायद्याचं आहे, विकासाच आहे. मी कसा आहे हे जर मला चांगला पद्धतीने माहीत असेल तर समोरचा माणूस माझ्या बद्दल काय विचार करतो, मला काय समजतो हे जाणून घेण्याची मला गरज पडणार नाही.
निखिलच्या आईने जे त्याला सांगितले ते अगदी खर आहे. आपण बरेचदा समोरच्या व्यक्तीच्या मनात आपलं जे चित्र आपण तयार केलेलं असतं किंवा झालेले असत त्याच नुसार वागायचा प्रयत्न करतो. प्रवाहाच्या विरुध्द जायला मन अनेकदा तयार होत नाही ते याच कारणाने.
पण यातून आपण आपली सृजनशीलता, आपला विकास थांबवतो. कारण हाच मुद्दा येतो की समोरचा माणूस मला काय समजत असेल? किंवा मी अस केल तर काय समजेल? हे जाणून घेण्याकडे लक्ष जास्त असत. पण हे अतार्किक आहे. अस झालं तर आपण आपलं आयुष्य कधी जगू शकणार नाही. एखाद्याचं मत लक्षात घेऊन आपल्यामध्ये गरजेची असणारी सुधारणा करण वेगळं आणि केवळ समोरच्या व्यक्तीच्या मतावरच आपलं आयुष्य जगणं वेगळं.
हे आपलं आयुष्य आहे. याला आकार द्यायचा असेल तर तो आपल्यालाच द्यावा लागतो. इतर लोक त्यात थोडा हातभार लावू शकतात. पण घडवू शकत नाहीत. त्यामुळे इतर लोक आपल्याला काय समजत असतील हे जाणून घेण्याच्या मागे न पडता मी एक माणूस म्हणून कसा आहे? माझी नैतिकता माझी मूल्य काय आहेत त्यानुसार मी वागतो आहे का नाही हे जाणून घ्या. ते जास्त फायदेशीर ठरेल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
