Skip to content

समजून घेतलं नाही तरीही चालेल पण पुढे पुढे करून लाचार होऊ नका.

समजून घेतलं नाही तरीही चालेल पण पुढे पुढे करून लाचार होऊ नका.


मयुरी महाजन


किती छान वाटतं, जेव्हा कोणी आपल्याला समजून घेतं, आपल्या भावना समजून घेतं, आणि त्या भावनांचा आधारही करतं, खरं तर या जगात सर्वात जास्त कसरत कुठे होत असेल, तर ती भावना जपण्यातच होते, कारण प्रत्येक वेळेस प्रत्येक व्यक्ती त्या भावनांना समजून घेईलचं असं नाही, ज्याला समजून घ्यायचं असतं ना ,ते न सांगता बोलता समजून घेतातचं, ज्याला समजून घ्यायचं नसतं, ती व्यक्ती कितीही काही करून खोटं काढणारच असते, त्यासाठी समजून घेतलं नाही, तरी चालेल पण उगाच पुढे पुढे करून आपण लाचार होऊ नये,

कारण कोणीतरी समजून घ्यावं, म्हणून त्यांच्या पुढे पुढे करण्यात काही शहाणपण नसतच, आपण पुढे पुढे करत राहिलो तर लाचार होण्याची वेळ आपल्यावरच येते,

कुणीतरी असावं नेहमी आपलं, आपल्याला साथ देणारं, हात देणारं आणि वेळेप्रसंगी आपल्या बाजूने अगदी भक्कमपणे उभे राहणारं, आपल्याला खरं मनापासून समजून घेणार, असं वाटणं हे माणसाला ठाई स्वाभाविक आहे ,परंतु प्रत्येक वेळेस आपल्याला कोणी समजून घेईलचं असं मात्र नाही ,समजून घेण्यासाठी खूप मोठं मन आणि अनुभवाचा कस लागतो, ती प्रत्येकाला जमणारी गोष्ट नाही,

कधी कधी घटना प्रसंगचं माणसाच्या विरोधात घडत असतात ,जेव्हा आपण दोषी नसतानाही दोषी ठरवले जातो, तेव्हा ज्यांच्याकडून समजून घेण्याची अपेक्षा असते, नेमकं त्यांच्याकडूनच अपेक्षा भंग होतो, अशावेळी शांत असणे फार गरजेचे व जिकरीचे असते, आणि समजून घेतले नाही, तरीही चालेल कारण वेळ अशा लोकांना ते समजूनच देते जे समजायचे असते,

आपण कोणाचे पुढे पुढे करून लाचार होऊन जगण्यात अर्थ तर नाहीच, लाचारपणे जर आपण समोरच्याला समजून घेण्यासाठी विनवणी करत असणारं, तर व्यक्ती आपल्या लाचारीचा गैरफायदा घेऊ शकते, हे आपल्याला आधी बघावं लागेल,

एक गोष्ट मला खूप आवडते ती म्हणजे जी माणसं आपल्याला खरंच ओळखतात, ते आपल्यावरती कधीही शंका घेत नाही, आणि जी माणसं आपल्याला ओळखत नाही ती आपल्या स्पष्टीकरणावरती अजिबात विश्वास ठेवत नाही, कोणी समजून घेतलं नाही म्हणून लोड घेऊ नका, प्रत्येक व्यक्तीची समजून घेण्याची पात्रता वेगवेगळी असते ,फक्त आपण लाचार म्हणून कुणाकडून समजून घेण्याची अपेक्षा ठेवू नये ,म्हणजे आपला समजूतदारपणा आपणच जोपासला पाहिजे,

कोणीतरी समजून घ्यावं म्हणून कितीतरी कुरापती करण्यात काय अर्थ आहे, ज्याला समजून घ्यायचं नसतं ,ती व्यक्ती काहीही केल्या नाही समजून घेणार, पण आपण आपली लाचारी का म्हणून दाखवायची, अरे मला समजून घ्या, माझी परिस्थिती बेताची आहे, माझ्यावर किती मोठं दुःख आहे, घटना प्रसंग परिस्थिती काहीही असो, लाचार होऊ नका, आपल्यातील क्षमतांना आणि आपल्या अस्तित्वाला प्रश्न विचारा ,यासाठी आपण आलोय का?????

जे उत्तर आपल्याला आपले मन देत असेल, आपण त्याच वाटेने गेले पाहिजे, इतकं मात्र लक्षात असू द्यावे की आपली कुठली लाचारी समोरच्या व्यक्तीसाठी ती संधी असते, आपल्याकडून हवं ते काढून घेण्याची, त्यामुळे जगणं आपलं आहे, तर ते ठरवणंही आपलचं असले पाहिजे,लाचार होवून जगायचे आहे की आपल्या जीवनाचा चांगला आचारी विचारी होवून जगायचे आहे…..हे आपल्याच हातात आहे….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

 

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!