समाधानी रहा, जेथून अपेक्षा नाहीये तिथे सुद्धा सुख मिळेल.
“The art of being happy is to be satisfied with what you have.”
आपल्याला जर आनंदी राहायचं असेल तर आपल्याकडे जे आहे त्यात समाधानी राहता आलं पाहिजे. ही कला जर आपण आत्मसात केली तर आपण सुखी होऊ शकतो. कारण सुख, आनंद हे सर्व आपल्या मानण्यावर आहे. नाहीतर सर्व काही असूनही माणसाला बरेचदा आतून एक प्रकारची पोकळी जाणवत राहते. अस का होतं?
कारण फक्त भौतिक वस्तू गोळा करत राहणं म्हणजे खरं सुख नव्हे. माणसाला एकदा यशाची ओढ लागली की मग तो त्याच्याच मागे धावू लागतो, आहे त्याहून अधिक मिळवत राहायचं हाच त्याचा ध्यास होतो. पण यामध्ये आता जे आपल्याकडे आहे, त्याचा खराखुरा आनंद घेणं, त्यात समाधान मानणं हे कुठेतरी मागेच पडतं. उलट जितकं मिळवू तितकं माणसाला कमीच वाटू लागतं. त्यामुळे समाधान मिळत नाही.
गोष्ट अगदी दहा ओळींची असुदेत किंवा मग एक अख्खं पुस्तक भरेल इतकी असुदेत, मध्ये मध्ये आपल्याला थोडं थांबावं लागत, कुठेतरी स्वल्पविराम, पूर्णविराम हा द्यावाच लागतो. एकसारखं लिहीत गेलं की कशाचाच थांग पत्ता लागत नाही. आपलं आयुष्य हे काही कोणत्या गोष्टीहून कमी नाही. ही गोष्ट देखील पुढे नेताना आपल्याला मध्ये मध्ये थांबावं लागेल, आपल्याकडे जे काही आहे त्याच्याकडे डोळसपणे पाहावं लागेल.
आपली मानसिकता ही आपल्याकडे किती आहे हे पाहण्यापेक्षा दुसऱ्याकडे किती आहे हे पाहण्याची असते. त्यामुळे माणूस जवळ कितीही असलं तरी असमाधानी राहतो. स्वतःजवळ इतकं सर्व असतानाही आपल्याला त्याची जाणीव होत नाही. कस्तुरीचा सुगंध सर्वांना वेडा करून सोडतो पण ज्याच्याकडे तो असतो त्या मृगाला मात्र त्याची जाणीव होत नाही.
अगदी तश्याच पद्धतीने आपल्याकडे जे आहे त्याची जाणीव आपल्याला कधीच होत नाही. ती करून घ्यायचा प्रयत्न आपण करत नाही. कारण आपण बाहेर कुठेतरी सुख पाहत असतो, शोधत असतो. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं, संघर्ष, पार्श्वभूमी वेगळी असते. त्यामुळे समोर जे दिसत तेच खरं असतं असं नाही. माणूस समोर कितीही आनंदी, सुखी दिसत असला तरी मागे काय चालू असतं हे आपल्याला समजत नाही.
अश्या वेळी तिची अमुक अशी परिस्थिती आहे म्हणून ती व्यक्ती आनंदी दिसते अस मानून आपण तसच वागायला जाणं आणि आपल्याकडे आहे त्याकडे दुर्लक्ष करणं हे चुकीचं आहे. असं करून आपण कधीच सुखी होऊ शकत नाही. प्रगती करू नये का? आयुष्यात नव नवीन यश मिळवू नये का? तर नक्की मिळवावं, कारण परिपूर्ण संतुष्टीची भावाला देखील कधी कधी आपल्याला थांबवून टाकते.
पण हे करत असताना आहे त्या गोष्टींचा आनंद पण घेता आला पाहिजे. आपल्या समाजात अशीही काही लोक आहेत ज्यांच आयुष्य अजूनही मूलभूत गरजांमध्ये अडकून पडले आहे. तिथेच त्यांचा संघर्ष चालू आहे. त्या तुलनेत आपण एक चांगल आयुष्य जगत आहोत अस आपण वाटून नाही का घेऊ शकत? म्हणून समाधानी राहायला शिका. आहे त्याचा आनंद घ्यायला शिका. जेव्हा आपण असं करायला लागू तेव्हा आपल्याला जिथून अपेक्षा नाही तिथून देखील सुख, आनंद मिळू लागेल.
लेखिका – काव्या धनंजय गगनग्रास
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

