सहनशीलता संपलेल्या मनावर कोणत्याही सहानुभूतीचा काहीच परिणाम होत नाही.
अपर्णा कुलकर्णी
सदाशिव जॉइंट फॅमिलीत रहात होता. त्याचं कुटुंब खूप छान होतं अगदी दृष्ट लागण्याजोगे. त्याच्या घरात सदाशिवचे आई, बाबा, काका, काकू त्यांची दोन मुले, आत्या असे सगळे होते. सदाशिव आठ वर्षांचा होता. त्याच्या घरात तो मोठा म्हणजे भावंडात मोठा आणि समंजस मुलगा होता. त्याची आत्या कॉलेजमध्ये शिकत होती तर सदाशिव त्याच्या भावंडासोबत शाळेत जात असे. त्यांची खूप मोठी जमीन होती गावात. गावातील सगळ्यात मोठे बागायतदार होते त्यांचे घर. घरात पैसा,अडका, धान्य यांनी घर कसे भरलेले असायचे. सगळं कसं छान सुरू होतं. सदाशिव त्याच आयुष्य खूप आनंदात जगत होता.
त्याची आत्या कॉलेजमध्ये कोणाच्यातरी प्रेमात पडली होती आणि तिने त्याच मुलाशी पळून जाऊन लग्न केले होते त्यामुळे घराशी तिचे नाते तसे संपले होते. त्यात सदाशिवचे आई बाबा खूप दुखावले होते. त्यातून ते स्वतःला सावरून उभे राहतात तोच एक दिवस सदाशिवचे आई बाबा शेताचा माल विकायला शहरात जात असताना त्यांच्या गाडीचा खूप मोठा अपघात झाला आणि सदाशिवची आई जागच्या जागीच गेली. त्याचे बाबा अनेक दिवस हॉस्पिटलमध्ये पडून होते पण शेवटी त्यांनीही शेवटचा श्वास घेतला. मृत्यू काय असतो हे कळण्याचे वयही नसताना सदाशिव पोरका झाला होता. आता त्याला त्याच्या काका काकूंचाच आधार राहिला होता. त्यांच्यातच तो त्याच्या आई बाबांना बघत असे.
पण सदाशिवचे आई बाबा असताना सदाशिववर प्रेम करणारे, त्याचे सगळे लाड पुरवणारे काका काकू एकदम विचित्र वागू लागले. त्यांचे वागणे खूप बदलले. ते सदाशिवला खूप वेगळी वागणूक देऊ लागले. त्याला हिडीस, फिडीस करू लागले. त्याचे शिक्षण त्यांनी बंद केले. घरातील सगळी कामे त्याच्यावर पडू लागली. इतकेच काय त्याने खायला प्यायला मागितले तरीही त्याला कामाची भली मोठ्ठी लिस्ट मिळायला लागली. घरातील बाकी सगळे चांगलं करून खात असतं पण सदाशिवल नेहमीच शिळ अन्न खायला घालत असे काकू काका. त्याने यावर काही बोलायचा प्रयत्न केला तर त्याला खूप मार खावा लागत असे.
यात त्याची आत्या एकदा घरात येऊन त्याची बाजू घेऊन बोलली होती तर काका काकूंनी तिलाही घराबाहेर काढले होते. आत्याने चिडून सदाशिवला पण तिथून तिच्या घरी नेले होते पण तिच्या सासरच्या लोकांनी सदशिवल घरात घेण्यास नकार दिला होता त्यामुळे आत्याने नाईलाजाने सदशिवला पुन्हा त्या खाईत लोटले होते.
त्या दिवसापासून सदाशिव घरातला नोकर झाला होता. शेताची, घराची सगळी कामे तो करत असे आणि मिळेल ते खात असे. त्याच्या शाळेची एक मैत्रीण त्याच्याकडे शेतात त्याला भेटायला येत असे. सदाशिवच्या घराजवळ तिचे घर होते. सदाशिवची सगळी परिस्थिती तिला माहीत होती त्यामुळे तिला सदाशिवबद्दल खूप वाईट वाटत असे. पण सदशीवला कोणाची मदत नको होती. तसे त्याने सतत तिला वेळोवेळी सांगितले होते पण तरीही ती सदाशिवला शेतात भेटायला येत असे आणि येताना काहीतरी खायला घेऊन येत असे. हे जर काका काकूंनी पाहिले तर काय होईल याची त्याला जास्त भीती वाटत होती आणि तसेच झाले. एकदा काकूने त्या दोघांना बोलताना पाहिले आणि त्या मुलीच्या आई बाबांना सांगितले शिवाय त्यामुळे सादशिवला ही खूप मार खावा लागला. तिथून पुढे त्यांची कधीच भेट झाली नाही.
काका काकूंचे वागणे दिवसेंदिवस विचित्र होत चालले होते. सदाशिवल तिथे राहण्याची इच्छा नव्हती पण तो जाऊन जाऊन कुठे जाणार होता. नीट शिक्षण नव्हते आणि त्याच्या बाबांनी कष्टाने उभी केलेली जमीन म्हणजेच सगळी शेती सोडून तो जाऊ शकत नव्हता. त्याच्या बाबांचा खूपच जीव होता त्या जमिनीत आणि ही जमीन म्हणजे त्यांचे स्वप्न होते. शिवाय त्यांनी मृत्यू पूर्वी जमिनीचा काही हिस्सा सदाशिवच्या नावे केला होता पण काका काकूंनी त्यावरही त्यांचाच हक्क दाखवला होता त्यासाठी त्यांनी कागदपत्रात काही फेरफार केले होते.
बघता बघता सदाशिव लग्नाच्या वयाचा झाला. समाजाला उत्तरे द्यावी लागु नयेत यासाठी कसलीतरी मुलगी बघून सदाशिवचे लग्न लावून दिले होते. ती मुलगी आल्यावर त्याचे आयुष्य काही अंशी चांगल्या अर्थाने बदलेल असे त्याला वाटले होते पण त्याची बायको त्याच्या काकू सारखीच खूप काजाग आणि उद्धट होती. तिने कधीच सदाशिवला समजून घेतले नाही उलट सतत त्याला त्याच्या शिक्षणावरून, स्वभाववरून घालून पाडून बोलत राहिली. सदाशिव खूप खचला, काय करावे हे त्याला समजेना. त्याला एक मुलगा झाला होता पण त्याच्या दुर्दैवाने तो ही आईच्याच वळणावर गेला होता.
सगळे आयुष्य सदाशिवने न केलेल्या चुकीची शिक्षा भोगण्यात घालवले होते. आता त्याचे सगळे संयम संपले होते. तो अलीकडे शेतातच रहात असे. संध्याकाळी मंदिरात भजन कीर्तन ऐकण्यात मन रमवात असे. एकदा तो मंदिरात बसलेला असताना त्याच्या शेजारी एक त्याच्याच वयाची बाई येऊन बसली. त्याला वाटले भजन कीर्तन ऐकण्यासाठी बसली असेल पण तसे नव्हते ती एकटक सदाशिवकडेच बघत होती. त्याला ती बाई कोण हे समजेना म्हणून त्याने दुर्लक्ष करायचे ठरवले. मग त्या बाईच म्हणाल्या, तुम्ही सदाशिव ना ?? तो आश्चर्य चकित झाला आणि म्हणाला हो कोण तुम्ही आणि मला कसे ओळखता ?? त्या बाई म्हणाल्या सदाशिव लहानपणी आपण एकाच शाळेत होतो, पुढे तुझ शिक्षण तुझ्या काका काकूंनी बंद केले आणि शेतात कामाला जुंपले. त्यावेळी मी तुला शेतात भेटायला येत होते, खायला घेऊन येत होते ते ही तुझ्या काका काकूंना बघवले नाही. त्यांनी थेट ते माझ्या घरी सांगितले आणि घरच्यांनी आपली भेट पुन्हा कधीच होऊ दिली नाही. सदाशिव ल सगळे आठवले आणि तो म्हणाला, म्हणजे तू प्रमिला ?? बरोबर ??
ती म्हणाली हो, मी प्रमिला. नुकतीच या गावात आले होते. आईची तब्येत हल्ली बरी नसते, सतत आठवण काढते त्यामुळे येत असते पण आज तुला पाहिले आणि मी स्वतःला थांबवू नाही शकले. कसा आहेस तू ?? सदाशिवचा चेहरा खरतर सगळं सांगून गेला होता पण तरीही खोटेच हसून त्याने छान आहे असे सांगितले. पण प्रमिला त्याला समजावत होती, सहानुभूती देत होती, सगळं ठीक होईल एक दिवस अशी आशा दाखवत होती तेंव्हा तो निर्विकार चेहऱ्याने ऐकायचे म्हणून ऐकत होता, शेवटी प्रमिलाला समजले की, सहनशीलता संपलेल्या मनावर कोणत्याही सहानुभूतीचा काहीच परिणाम होत नाही…. हेच खरे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
