Skip to content

सगळं विसरायचं म्हणता म्हणता त्यावेळी सगळंच कसं काय आठवतं ?

सगळं विसरायचं म्हणता म्हणता त्यावेळी सगळंच कसं काय आठवतं ?


गीतांजली जगदाळे

(समुपदेशक)


‘ विस्मृती ‘ , शाप की वरदान ?

गरजेच्या आणि कामाच्या गोष्टी जेव्हा आपण विसरतो तेव्हा ही विस्मृती शाप वाटते . पण जेव्हा खरंच विसराव्यात अशा त्रासदायक गोष्टी आपण विसरतो तेव्हा मात्र ती वरदानच ठरते.

आपण काही गोष्टी लक्षात ठेवतो तर काही विसरतो आणि हे आपण हेतुपूर्वक करतो. पण काही वेळा कसलेही प्रयत्न न करता आपण बऱ्याच गोष्टी लक्षात ठेवत असतो आणि त्याचबरोबर विसरत ही असतो.

असं म्हटलं जातं की , आपल्याला ज्या गोष्टी महत्वाच्या वाटतात त्या आपल्या लक्षात राहतात आणि ज्यांचं महत्व आपल्या दृष्टीने फार कमी असतं त्या आपण विसरून जातो. हे जरी खरं असलं तरी प्रत्येक व्यक्तीबाबतीत हे लागू होईलच असं नाही . व्यक्तीची जीवनशैली , त्याच्या खाण्या- पिण्याच्या सवयी , झोपण्याच्या सवयी , व्यायाम , ताण-तणाव , त्याच्या मेंदूची क्षमता आणि त्या माणसाच्या आयुष्यातील priorities असे बरेच घटक ‘ लक्षात राहणं आणि विसरणं याला कारणीभूत ठरतात.

आयुष्यातल्या किती अशा वाईट घटना , दुःखदायक प्रसंग आपण खऱ्या अर्थाने विसरतो? विसरलोय असं वाटत असताना अचानकपणे सगळ्या आठवणी एकदम समोर येऊन उभ्या राहतात. आणि आठवतात ही अशा की , काल – परवा घडल्यासारखं सगळं ताज आहे असं दिसायला लागतं आणि जाणवायला ही लागतं . मुळातच ज्या गोष्टी आपण जाणूनबुजून विसरायचा प्रयत्न करत असतो त्या चांगल्याच मनात दबा धरून बसलेल्या असतात. जेवढा विसरायचा प्रयत्न करू तेवढ्या त्या खोलवर जातात. माणसाचं मनच असं आहे की , त्याला जे नको करू असं बजावू तेच त्याला करण्यात इंटरेस्ट असतो. आणि त्यामुळेच की काय जे विसरायचं असतं ती गोष्ट मन चांगलीच लक्षात ठेवते.

जो प्रसंग किंवा जो विषय आपल्याला जाणीवपूर्वक विसरायची इच्छा आहे त्याने आपल्या मनावर , भावभावनांवर एक परिणाम केलेला असतो. आणि ज्याचा आपल्याला त्रासदेखील होत असतो. त्यामुळेच अशा गोष्टी विसरायला अवघड जातात. मेमरी शी भावनांचा खूप जवळचा संबंध आहे. जेवढी भावना स्ट्रॉंग तेवढी मेमरी लक्षात राहण्याचे चान्स जास्त असतात. काही वेळा आपल्याला विसरल्यासारखं वाटतं , पण ते आपण पूर्णपणे कधीच विसरत नाही.

फक्त आपल्या रोजच्या व्यापात ती गोष्ट मनाच्या कुठल्यातरी कोपऱ्यात जाऊन बसते. मनाच्या उपरि भागात समोर उभी असणारी संकटे , काळजी , जबाबदाऱ्या , इत्यादी. गोष्टी असतात. ज्याच्या त्याच्या priority नुसार मनात या गोष्टींची क्रमवारी ठरलेली असते. आणि नको असलेली गोष्ट मनाच्या कोपऱ्यात पडून राहते. पण यामुळे का होईना ज्या गोष्टी मनात किंवा डोक्यात नको असतात त्यांच्यापासून काही काळ सुटका मिळाल्यासारखी वाटते . आणि सगळं नीट , सुरळीत चाललेलं असताना काही तरी ट्रिगर होतं आणि मनाच्या कोपऱ्यात लपलेलं सगळं उफाळून वर येतं आणि कधी आपण हे विसरलोच नव्हतो किंवा ते कधी कुठे गेलंच नव्हतं अशा पद्धतीने दर्शन देत.

त्यामुळे विसराव्याशा वाटणाऱ्या गोष्टींचा स्वीकार करावा. अवघड नक्कीच आहे पण काही काळ जाऊ दिला असता आपण ते नक्कीच करू शकतो जेणेकरून परत परत आठवून त्याचा आपल्याला त्रास होत राहत नाही. जेवढं आपण टाळायचा प्रयत्न करतो विसरायचा प्रयत्न करतो तेवढं आपलं मन ते जास्त चांगलं लक्षात ठेवतं .

आपण जितकं लक्ष ते विसरावं यासाठी देऊ तेवढं ते लक्षात राहण्याची शक्यता वाढते. त्यामुळे ते स्वीकारणं किंवा जो त्रास होईल त्याला सामोरं जाऊन ते टाळण्याचा प्रयत्न न करणं याने आपली मदत होऊ शकते. हे बोलायला जेवढं सोप्प आहे तेवढं करायला अवघड आहे.

पण अशा काही आठवणीने आयुष्यभर त्रास होत राहण्यापेक्षा आपण हा एक प्रयत्न करून पाहायला हरकत नाही . वाईट घटनेबाबत आपण बऱ्याचदा denial मध्ये जगत असतो म्हणजेच हे असं कसं झालं पासून ते, ते झाल्याच्या शॉक मधेच आपण अडकून राहतो आणि त्यामुळे आपण असं काही घडलंय हे स्वीकारायला तयार नसतो त्यामुळे त्या घटना आठवणिंस्वरूपात आपल्याला भेट देत राहतात.


मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!