रोड हिप्नोसिस म्हणजे काय ? ड्रायविंग करताना व्यक्तीला जीव गमाविण्याची वेळ का येते ?
राकेश वरपे
(मानसशास्त्र तज्ज्ञ)
रोड हिप्नोसिस म्हणजे काय ? तर याचा सरळ आणि साधा अर्थ असा कि तंद्रीचा उच्चांक गाठणे. म्हणजे आपले डोळे आणि कान उघडे असतात, पण आपण त्यावेळेसचे प्रेझेन्स ऑफ माईंड हरवून बसलेलो असतो. त्याक्षणी आपल्याकडे पाहणाऱ्याला वाटेल कि आपण पूर्ण शुद्धीत ड्रायविंग करीत आहोत. खरंतर त्यावेळी आपण आपली प्रेसेंट मानसिकता पूर्णपणे हरवत चालण्याच्या दिशेकडे असतो.
हिप्नोटाईझ होण्याच्या अगदी सुरुवातीच्या काही सेकंदात किंबहुना मिनिटात इतर वाहनांचे ऐकू आलेले आवाज, सिग्नल, स्पीड ब्रेकर, खड्डे, बाजूच्या किंवा मागच्या सीटवरून आपल्याला मारलेली हाक ई गोष्टी आपल्याला हिप्नोटाईझ होण्यापासून वाचवते. परंतु दीर्घकाळापर्यंत अशा मानसिक अवस्थेत राहिल्यास नेहमीचे आवाज कानांवर पडतात पण आपल्याला मात्र ऐकू येत नाही.
आणि अशाच वेळी अचानक ड्रायविंग करताना झालेल्या सरावापेक्षा काही वेगळी कृती करण्याची जेव्हा वेळ येते किंवा काही आव्हानात्मक परिस्थिती जेव्हा ओढावते त्यावेळी हिप्नोटाईझ झालेली मानसिकता ती वेळ हाताळू शकत नाही. दुर्दैवाने समोरच्यासकट आपल्यालाही जीव गमवावा लागतो किंवा दोघांच्याही शरीराची प्रचंड हानी होते.
ड्रायविंग करताना प्रवास जर फार मोठा असेल आणि प्रवासात आपल्यासोबत कोणीही नसेल तर हमखास तंद्रीत जाण्याची शक्यता ही वाढते. इथे एक महत्वाची बाब नोंदवू इच्छितो कि तंद्रीत जाणे हि बाब सामान्य आहे तर दीर्घकाळपर्यंत तंद्रीत राहिल्यास त्याक्षणी आपण बौद्धिक पातळीवर कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. किंबहुना आपल्या त्यावेळच्या सर्व जाणिवा तात्पुरत्या बधिर झालेल्या असतात.
तंद्री का लागते? तर थोड्या वेळासाठी एक कल्पना करा कि तुम्ही एक अशी चित्रकृती पाहत आहात ज्यामध्ये अनेक वर्तुळ आहेत. आणि सगळे वर्तुळ गोल फिरताना आपल्याला दाखवले जात आहेत. आता ती गोल फिरणारी चित्रकृती आपण किती वेळापर्यंत तंद्रीत न जात पाहू शकतो? तर हे प्रत्येकाच्या मानसिक क्षमतेवर अवलंबून आहे. पण दीर्घकाळापर्यंत विचलित न होता जेव्हा आपण ते पाहत राहू तर आपण तंद्रीत जाण्याचा उच्चांक गाठू शकतो.
आणि हीच हुबेहूब बाब ड्रायविंग करताना घडत असते. मागे पळणारे रस्ते, झाडे, ढग, वाहने, काही व्यक्ती, नद्या, डोंगर ई त्याच त्याचचा रतीब लावणाऱ्या गोष्टी आपल्याला तंद्रीत जाण्यासाठी प्रवृत्त करत असतात. पुष्कळ वेळा असं का घडतं कि आपल्याला कळतंही नाही कि पनवेल किंवा खोपोली इतक्या लवकर कसं काय गाठले किंवा ज्याठिकाणी आपल्याला थांबायचे होते त्याच्या कित्येक पटीने आपण पुढे आलेलो असतो.
याचा अर्थ आपण काही काळासाठी तंद्रीत गेलो होतो किंबहुना हिप्नोटाईझ झालो होतो. या दरम्यान कोणतीही आव्हानात्मक कृती करण्याची वेळ न आल्यामुळे दुर्दैवी अपघात घडला नसावा. असेही कित्येक अनुभव आपल्याला येतात. प्रचंड तंद्रीत जाऊन सुद्धा आपण पुन्हा भानावर येतो. आणि सगळं काही सुखरूप असतं.
मग तंद्रीत जाऊ नये यासाठी काय करावे आणि करू नये..
१) प्रथमतः तुम्ही एकट्याने प्रवास करत असाल तर २ तासाने ब्रेक घेत ड्रायविंग करा.
२) शक्यतो कोणत्याही टेन्शनमध्ये किंवा अतिविचारात ड्रायविंग करू नका कारण तुमची त्यावेळची मानसिकता हिप्नोटाईझ होण्यासाठी एक निमित्त ठरते.
३) ड्रायविंग करताना कंटाळा येत असेल तर silently गाणी लावा किंवा रेडिओ सुरु करा.
४) तुमच्या बाजूच्या सीटवरील बसलेल्या व्यक्तीला झोपायचे असल्यास मागे जाऊन झोपायला सांगा.
५) ड्रायविंग करताना सतत मागे पळणाऱ्या नेहमीच्या चित्रांपेक्षा काही नवीन चित्रे शोधण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा मेंदू ऍक्टिव्ह राहील.
६) काही ठराविक वेळेमध्ये अलार्म लावत चला किंवा सोबतच्या व्यक्तीला तुम्हाला आवाज द्यायला सांगा.
७) तंद्री लागत आहे असे वाटत असल्यास एक मस्तपैकी चहा प्या किंवा वाहन थांबवून फोनवर थोड्या वेळेसाठी गप्पा मारा.
तंद्रीचा उच्चांक गाठला तर वरील हे सर्व उपाय फेल ठरतील. त्यावेळी तुम्ही काहीच करु शकणार नाही. कारण तुमचा सारासार विचार करणारा मेंदू त्यावेळी बधिर झालेला असतो. त्यामुळे वरील हे उपाय अत्यंत महत्वाचे आहेत.
खरंतर निकृष्ट दर्जाचे रस्ते, खड्डे यांमुळे झालेले अपघात किंवा झालेले मृत्यू हा एक संशोधनाचा विषय आहे कि यापैकी किती चालकांनी तंद्रीचा उच्चांक गाठला होता ??
