ज्यांच्यामुळे पुढे पुढे जात राहिलो, त्यांचे ऋण आयुष्यभर जपले पाहिजेत.
मेराज बागवान
आपल्या आयुष्यात कधी ना कधी, कोणी ना कोणी ,कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्याला मदत केलेली असते.आणि त्यांच्या ह्या मदतीमुळे आपण पुढे पुढे जात राहीलेलो असतो.कित्येकदा आपल्या लक्षात देखील येत नाही की अमुक का व्यक्तीने आपल्याला गरजेच्या वेळी मदत केली आणि त्यामुळे आपण पुढचे पाऊल टाकू शकलो.पण ह्याच छोट्या मदतीने आपल्याला आयुष्यात पुढे नेलेले असते.आणि म्हणूनच, ज्यांच्यामुळे पुढे पुढे जात राहिलो,त्यांचे ऋण आयुष्यभर जपले पाहिजेत.
एक तरुण होता, अगदी सुशिक्षित पण बेरोजगार.अनेक प्रयत्न करून देखील त्याला त्याच्या करिअर मध्ये यश मिळत नव्हते.यामुळे तो खूप निराश आणि उदास झाला होता.जणू आपले आयुष्यच संपले असे त्याला वाटत होते.असाच तो एका चहाच्या टपरीवर बसलेला असताना, एक मध्यमवयीन व्यक्ती तिथे आली आणि त्या तरुणाशी सहजच गप्पा मारू लागली.त्यातून तो तरुण थोडा बोलता झाला.तरुणाची समस्या लक्षात आल्यानंतर त्या गृहस्थाने त्याला स्वतःजवळ असलेले एक पुस्तक वाचायला दिले आणि तो निघून देखील गेला.ते पुस्तक एका प्रसिद्ध उद्योगपतीचे आत्मचरित्र होते.त्या तरुणाने घरी गेल्यानंतर ते पुस्तक काय आहे बघायला म्हणून हातात घेतले आणि एकदा हातात घेतलेले ते पुस्तक त्याने एकाच वेळी पूर्ण वाचून काढले.पुस्तक वाचून संपले त्यावेळेस रात्रीचे २.३० वाजले होते. पण का कसे कुणास ठाऊक त्या पुस्तकामुळे त्याला एक नवी ऊर्जा मिळाली, त्यांच्यामध्ये सकारात्मक दृष्टिकोन निर्माण झाला.आणि तो पुन्हा जोमाने कामाला लागला.त्याच्या अथक परिश्रमाला फळ मिळाले आणि आज तो एका नामवंत आयटी कंपनीत उच्च पदावर कार्यरत आहे.
ह्या उदाहरणावरून इतकेच सांगायचे आहे, कोणी केलेली मदत आपल्याला कशी आणि कुठे उपयोगी पडेल हे सांगता येत नाही.कित्येकदा तर अगदी बिकट किंवा आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कोणीतरी आपल्याला अशी मदत करून जाते की जणू अंधारात प्रकाश पुन्हा जागृत होतो. म्हणूनच अशा व्यक्तींचे आपण कायम ऋणी राहिले पाहिजे आणि त्यांची मदत आयुष्यभर लक्षात ठेवली पाहिजे.
आई-वडील हे कायम आपल्यासोबत असतात. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते आपल्यासाठी सदैव तयार असतात.कितीही काळ लोटला तरी ते नेहमी आपली मदत करीत असतात आणि पाठिंबा देत असतात.आई-वडिलांचे हे ऋण तर आपण आयुष्य फेडू शकत नाही.पण किमान त्यांनी आपल्यासाठी केलेल्या गोष्टींची किंमत तरी ठेवू शकतो.त्यांना त्यांच्या आयुष्याच्या संध्याकाळी धीर देऊ शकतो. आई-वडिलांची तुलना कोणाशीच होऊ शकत नाही.माणसाच्या रूपातील ते देवच असतात.
पण , आई- वडीलांनंतर देखील काही व्यक्ती असतात.जणू देवाचा अवताराच म्हणू यात ना.जेव्हा इतर कोणीच नसते तेव्हा ती एखादी व्यक्ती आपली ढाल बनलेली असते. ती व्यक्ती आशेचा किरण घेऊन आलेली असते जी आपल्या आयुष्यात काही तरी सकारात्मकता आणते आणि आपले आयुष्य पुन्हा फुलून निघते.अशा त्या देवरूपी व्यक्तीचे ऋण आपण कायम लक्षात ठेवले पाहिजेत.
मित्र, मैत्रीण, शिक्षक, ऑफिस सहकारी, भाऊ, बहीण, नवरा, बायको, मुलगा, मुलगी, आत्या, मामा, मावशी, काका इत्यादी कोणीही ही व्यक्ती असू शकते.खूपदा आपण यांना गृहीत धरतो.आणि त्यामुळे त्यांनी आपल्याला केलेल्या मदतीची आठवण पुसट होते.पण प्रत्यक्ष आभार व्यक्त करता येत नसतील तरी किमान आपल्या कृतीतून ही कृतज्ञता कायम दिसली पाहिजे.कारण आपण यशस्वी होण्यामागे यांचा खूप मोलाचा वाटा असतो.
आजकालच्या जमान्यात सहजपणे कोणी कोणावर विश्वास ठेवत नाही.आणि अशा वेळीच काही माणसे अशीही भेटतात जी बिनधास्तपणे आपल्यावर विश्वास ठेवून आपली मदत करतात, जणू आयुष्यच ओवाळून टाकतात. कधी कोणी मानसिक आधार देत तर कोणी आर्थिक मदत करत, कोणी सामाजिक मदत करत तर कोणी आयुष्य मार्गी लावायला मदत करत आणि अशा व्यक्ती केलेल्या मदतीचा गाजावाजा देखील करीत नाहीत.पण अशा व्यक्ती कुठे ना कुठे जरूर असतातच.जरी आजचे जग ‘खूप प्रॅक्टिकल’ झालेले असले तरी आपले मन सांभाळणारी, आपली अडचण समजणारी मंडळी आजही ह्या जगात अस्तित्वात आहेत.फक्त डोळे उघडे ठेवण्याची गरज आहे आणि त्यांनी केलेल्या मदतीची जाणीव ठेवणे गरजेचे आहे.
जेव्हा आयुष्याची वाट चुकते.सर्व संपले असे वाटते त्याक्षणी विधाता अप्रत्यक्षरित्या कोणालातरी पाठवितो आणि आपली मदत करतो.आपल्याला हे फक्त ओळखता आले पाहिजे आणि ‘ग्र्याटीट्युड’ मनामध्ये कायम बाळगला पाहिजे.नाहीतर काय होते, आपण फक्त आपल्या समस्यांना चिकटून बसलेले असतो आणि त्या समस्येवर असलेला उपाय देखील आपल्या समोर असतो.पण आपण त्याकडे लक्षच देत नाही.कारण नकारात्मकता ठासून भरलेली असते.’कोणी काही करू शकत नाही, कोणी भरवश्याचा नाही’ अशी चिडचिड केली जाते.’तुला नाही समजणार, ज्याचे जळते त्यालाच कळते, तू हे अनुभवलेले नाही म्हणून तुला माझी समस्या कळणार नाही’ असे बोल आपण अनेकवेळा बोलतो.पण थोडा दृष्टिकोन बदलला की सर्व ही स्पष्ट होऊ शकते.
म्हणून गरज आहे ती नव्याने जग पाहण्याची.हे कलियुग आहे असे म्हटले जाते, पण त्या कलयुगात विधाता देखील आहे हे विसरुन चालणार नाही.कारण तो निसर्ग, विधाता आणि नियतीच तर आहे जी आपल्याला कायम मदत करीत आहे कोणत्या ना कोणत्या रुपात.म्हणून अशा सर्व गोष्टींसाठी, त्या व्यक्तींचे आपण कायम ऋणी असले पाहिजे.
कारण ‘मदत’ ही मदत असते , जी आपल्याला आयुष्यात कायम पुढे घेऊन जात असते.
म्हणूनच अशा सर्व देवासमान व्यक्तींना ह्या लेखातून दिलेला हा ‘मनाचा मुजरा’.
धन्यवाद!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
