हजारदा झुकावं… फक्त समोरची व्यक्ती त्या लायकीची हवी!
हर्षदा नंदकुमार पिंपळे
झुकायला-वाकायला कोणाला आवडतं…?असं उठता बसता कुणीही कुणापुढे सहजासहजी झुकत नाही की वाकत नाही. आपल्या स्वतःसमोर कुणी झुकलं तर खूप बरं वाटतं. पण एखाद्यापुढे झुकताना आपण कितीतरी वेळा सहज विचार करतो.कैकदा तर आपल्याला झुकण्याचा अर्थच कळत नसतो.झुकायच म्हंटल की ,मी का झुकू..? मीच का झुकू..?त्यांनी थोडं झुकायला नको का…? सारखं-सारखं काय झुकायच…?
असे अनेक प्रश्न आपल्या मनात क्षणात पिंगा घालायला लागतात. तर इतकं गोंधळून जायची मुळात गरजच नसते.शांतपणे विचार केला तर झुकण्याचा अर्थ अगदी सहजपणे समजून घेता येतो.
तर….वाकणं आणि झुकणं.कित्येकांना वाकणं आणि झुकणं यातील फरक समजत नाही. तर मित्रांनो वाकणं आणि झुकणं यामध्ये खूप फरक आहे.एखाद्या समोर आपण वाकतो ते या भीतीने की समोरचा आपल्याला काही बोलेल वगैरे.
आपण वाकलो नाही तर शिस्त मोडल्यासारख होईल ही भीती वाकणाऱ्याच्या मनात असते.थोडक्यात वाकणं म्हणजे मनात एक प्रकारची भीती असते.आणि झुकणं म्हणजे मनातील आदरयुक्त भावं.लीनता, नम्रता म्हणजे झुकणं.एखाद्यापुढे आपण झुकतो तेव्हा आपल्या मनात तो त्या व्यक्तीप्रती असलेला लीनभाव असतो.
थोडक्यात सांगायचे तर एखाद्या व्यक्तीसमोर त्याची योग्यता, त्याच कर्तृत्व पाहून आपण नम्रपणे झुकतो. त्यामुळे प्रत्येकाने वाकणं आणि झुकणं यामधील फरक समजून घेणं आवश्यक आहे.इतकच नव्हे तर कुठे आणि कुणापुढे झुकावं हेही आपल्याला समजायला हवं.
मुळातच एखाद्यासमोर झुकणं म्हणजे कित्येकांना खूप कमीपणाच वाटतं. पण मित्रांनो, झुकणं म्हणजे नेहमीच कमीपणा नसतो. कधी कधी चांगल्या गोष्टींसाठीही झुकावं.कारण अनेकदा झुकल्यामुळे कितीतरी गोष्टी अगदी सहज सोप्या होतात.आणि झुकल्यामुळे काही चांगल होणार असेल तर जरूर जिथे शक्य असेल तिथे झुकावं.कारण कुणीतरी आपल्यासाठी झुकत असतं मग आपणही कधी थोडं झुकलं तर …..?
मी का झुकायच…? असं वाटणं साहजिक आहे. पण झुकण्यामुळे कुणाच नुकसान होत नाही हे लक्षात घ्या. याऊलट झुकण्यामुळे गोष्टी अगदी सहज शक्य होतात. पण झुकताना एक लक्षात घ्या, आपण कुणासमोर झुकतोय…? का झुकतोय..? याची जाणीव स्वतःला करून द्यायला विसरू नका.
कारण तिथेच झुकावं जिथे गरज आहे, काही तथ्य आहे. त्याच्यासमोर झुकावं ज्याची तेवढी ती योग्यता आहे. आणि अशा योग्यता असणाऱ्या व्यक्तींपुढे एकदा नाही हजारदा झुकलं तरी चालेल.कारण झुकतो तोच ज्याला एखाद्याची जाणीव असते , एखाद्या गोष्टींची सहजपणे जाणीव होते. नाहीतर अहंकारी भाव असणाऱ्यांची या जगात मुळीच कमतरता नाही. काही ठिकाणी तर झुकणाऱ्यालाही दबावाखाली आणून चिरडल जातं.ज्याच्याकडे नम्रता आहे ती नम्रता ठेचायला काही विकृती मागेपुढे पहात नाही. स्वतः झुकत नाहीत आणि दुसऱ्यालाही झुकू देत नाही. चांगल्या गोष्टींसाठी झुकलं तर काय कमीपणा आहे….?
चांगल्या गोष्टींसाठी ,लायकी अर्थात पात्रता असलेल्या व्यक्तीसाठी जरूर झुकावं.आणि अशा योग्यता असलेल्या व्यक्तीपुढे सारखं सारख झुकलं तर आपण काही कमी ठरत नाहीत. उलट यातून आपल्यातील नम्रपणा,त्यांच्याप्रती असलेला आदर हा स्पष्ट होत असतो.आपले संस्कार आपल्या त्या वागण्यातून दिसत असतात.
झुकणं या शब्दाचा वावर विविध ठिकाणी आहे. कधी नात्यात कधी सामाजिक आयुष्यात अशा विविध ठिकाणी झुकणं या शब्दाला आपण जवळून अनुभवत असतो.(‘तिच्या कर्तबगारीसमोर पूर्ण समाज झुकला.’ ‘प्रयत्नांपुढे नशीबाला झुकावच लागलं.’ तो झुकला म्हणून तर नातं टिकून आहे’) अशा अनेक ठिकाणी झुकणं म्हणजे काय ते आपण समजून घेऊ शकतो.ही काही साधी सरळ उदाहरणं आहेत.
नात्यांच सांगायच झालं तर अनेकदा एखादी व्यक्ती खूप हट्टी असते.पण मनाने ती तितकीच सच्ची, निरागस असेल तर त्या व्यक्तीसाठी आपण कधीतरी का होईना झुकलं पाहिजे. ज्यावेळी एखादी गोष्ट खरच खूप महत्त्वाची असते तेव्हा तिथे झुकायलाच हवं.झुकणं म्हणजे माघार घेणं वगैरे मुळीच नसतं.तर एखादी गोष्ट अडून न राहता तीच गोष्ट पुढे जाण्यासाठी आपण केलेला एक प्रामाणिक प्रयत्न असतो.
आणि तो प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकाने करायला हवा.कारण आपला एक प्रामाणिक प्रयत्न एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी खूप मोठ सहाय्य करत असतो. त्यामुळे वेळ पडली तर हजारदा झुकायला शिका आणि तेही पात्रता असलेल्या लोकांसाठी…!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

अप्रतिम लेख आहे..नाते संबंध जपण्यासाठी कुठे, कसं, कधी, झुकावे.. याचं सुंदर लिखाण केले आहे.. खूप खूप धन्यवाद 🙏
खूप सुंदर. दोन्ही बाजू खूप छान प्रकारे हाताळून लेखामध्ये सांगितल्या आहेत.
खूप सुरेख.दोन्ही बाजू खूप सुंदररित्या हाताळल्या आहेत लेखामध्ये.
खुपच छान नाते टिकविण्यासाठी झुकलेच पाहिजे.