रागाने गेलेली व्यक्ती पुन्हा येईल,पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती पुन्हा येणार नाही.
हर्षदा पिंपळ
मनाली आणि तेजस दोघे खूप चांगले फ्रेन्ड्स होते.नर्सरी पासून ते एम एस्सी पर्यंत दोघे एकत्रच शिकले.एकाच कंपनीत ते दोघे नोकरीला होते.इतक्या वर्षाची मैत्री तशी घट्टच होती.सगळं चांगलं असताना मध्येच काहीतरी झालं आणि दोघांच्या मैत्रीवर त्याचा परिणाम झाला.मनाली लहानपणापासून बोलायला फटकळ होती.काहीही झालं की लहान-मोठ न पहाता बिंधास्त बोलायची.त्यादिवशी सुद्धा मनाली आणखी तेजसमध्ये काहीतरी बिनसलं होतं.त्या दोघांमध्ये टोकाची भांडणं झाली.
मनाली त्याला खूप काही बोलली पण तेजस मात्र काहीही न बोलता सॉरी बोलून तिथून गेला.इतक्या वर्षात जे घडलं नाही ते त्यादिवशी घडलं होतं.मनाली त्यादिवशी तेजसला असं काही बोलली ज्यामुळे तो कायमचा दुःखावला गेला होता.तो इतका दुःखावला गेला की मागे वळून पहायला तयार नव्हता.मनालीने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तेजसने काही ऐकलं नाही.तो एकदम शांत झाला होता.मनालीचे शब्द त्याला भयंकर टोचले होते.त्यामुळे “आता पुन्हा मनालीशी कनेक्ट व्हायच नाही”असा मनाशी त्याने चंग बांधला होता.बावीस-तेवीस वर्षाच नातं त्यादिवशी कायमच कोमेजलं होतं.
असा प्रसंग आपल्या बाबतीत घडतो किंवा आपल्या अवतीभवती घडताना आपण पाहतो.तर…
आपल्या आयुष्यात माणसं एखाद्या वाऱ्याच्या झुळूकेप्रमाणे येतात आणि वाऱ्याच्या झुळूकेप्रमाणेच जातातही.ही माणसं आयुष्यात येतात त्यामागेही खरं तर काही कारणं असतात. आणि माणसं आयुष्यातून जातात त्यामागेही काही कारणं असतात.कधी कुणी काही कारणास्तव आयुष्यातून निघून जातं.कुणी मुद्दाम स्वार्थासाठी आपला हात सोडून निघून जातं.तर कधी कुणी भांडण वगैरे झाल्यामुळे रागावून,वैतागून निघून जातं.कुणी तावातावाने रागात काही वेडंवाकडं बोलून निघून जातं.तर कुणी भांडण वगैरे झाल्यावर आदळआपट न करता शांतपणे निघून जातं.पण अनेकदा असं होतं की रागाने निघून गेलेली व्यक्ती पुन्हा येते पण शांतपणे निघून गेलेली व्यक्ती सहसा पुन्हा येत नाही.
[रागाच आणि मनुष्याच तसं जवळच नातं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. एकमेकांच नेहमीच पटेल असं नाही. इथे सख्खे भाऊही पक्के वैरी असतात. त्यामुळे कोण कोणाशी कसं वागेन याचा काही अंदाज बांधता येत नाही.] असो,
तर असं का होतं…? या प्रश्नाच उत्तर आपल्याला काही सहसा मिळत नाही.
तर असं का होत असेल हे आपण पाहूयात.
प्रत्येकाचा स्वभाव हा वेगवेगळा असतो.कुणी पटकन चिडतं,रागावतं,दुःखावतं तर कुणी सहसा लवकर चिडत नाही.थोडक्यात सांगायच झालं तर कुणी फार कठिण स्वभावाच तर कुणी फार मृदू स्वभावाच असतं.त्यामुळे कधी स्वभावानुसार तर कधी परिस्थिती/प्रसंगानुरूप माणसाच्या प्रतिक्रिया या बदलत असतात.कुणी अनेकदा शांत राहण्याला प्राधान्य देतं तर कुणी मनात आलेलं थेट तिथल्या तिथे बोलण्याला प्राधान्य देतं.अनेकदा आपण स्पष्टपणे बोलणाऱ्या व्यक्तीला शॉर्ट टेम्पर बोलत असतो.पण लक्षात घ्या ही स्पष्टपणे बोलणारी, रागावणारी,भांडणारी व्यक्ती आपल्याशी पुन्हा कनेक्ट होते.
पुन्हा बोलायलाही येते.पण हेच जर स्वभावाने मृदू आणि हळव्या असणाऱ्या व्यक्तीच्या बाबतीत घडलं तर ती व्यक्ती सहसा पुन्हा आपल्याकडे परत येतेच असं नाही.कारण अशा व्यक्ती भांडण झाल्यावर, दुःखावल्यावर काहीही न बोलता शांतपणे निघून जातात. त्या पुन्हा माघारी फिरण्याच्या सगळ्या शक्यता तशा संपलेल्या असतात.अशा व्यक्तींच्या बाबतीत “ठीक आहे, रागावून गेली आहे.येईलच पुन्हा.इतकं काय त्यात.समजावेन मी तिला.. जाऊदे गेली तर रागाने.” असं बोलून चालत नाही.कारण अशा व्यक्तींना कितीही समजावण्याचा प्रयत्न केला तरीही या व्यक्ती पुन्हा परतायच नाव घेत नाही.मनाला लागलेलं सारं काही अशा व्यक्तींना क्षणाक्षणाला बोचत राहतं.
मनाची इतकी घुसमट झालेली असते की काही बोलायची इच्छाच नसते.त्या सगळं काही मनात साठवून ठेवतात. स्वतःला त्याचा त्रास करून घेतात. कारण समोरच्या व्यक्तीला प्रत्युत्तर देण्यासाठी त्यांच मन पुढे सरकतच नाही. सगळं ऐकून घेऊन कुढत कुढत या व्यक्ती कापरासारख्या निघून जातात.आपल्याच व्यक्तीने दिलेला त्रास त्यांना मुळीच सहन होण्यासारखा नसतो.ते अशा गोष्टी फार मनाला लावून घेतात. मनातील यातना कुणालाही सांगत नाही. झालेला संतापही ते कधीच व्यक्त करत नाही. पण त्यांची ही भयंकर शांतताच बरच काही सांगून जाते.
म्हणून लक्षात ठेवा, इतरांना (कळत नकळतपणे) इतक्याही इजा करू नका की जेणेकरून माणसं पुन्हा मागे वळून पहायला तयारच होणार नाहीत.
थोडं थोडकं आयुष्य राग आणखी भांडणात वाया घालवू नका.स्वतःबरोबर इतरांनाही कशाप्रकारे सुखी ठेवू शकतो याचाही विचार करा.आयुष्य आहे तर भरभरून जगण्याचा प्रयत्न करा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

होय बरोबर आहे.
अगदी बरोबर,हेच घडलं