राग येण्याची नेमकी कारणे काय असू शकतात?
हर्षदा पिंपळे
राग ही भावना आहे. आपल्या मनाचीच एक अवस्था आहे.मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनेला मन अनेकदा नकारात्मक स्वरूपाची प्रतिक्रिया देतं.आणि अशावेळीच रागाची भावना निर्माण होते.एखाद्याचा राग हा ज्वालामुखीसारखा भयंकर असतो.अनेकदा याच रागातून वाईट गोष्टी घडतात.तर कधी कधी या रागातून काही चांगल्या गोष्टीही घडतात. अर्थात ते प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असतं.प्रत्येकाचा स्वभाव हा सारखा नसतो.कुणाला गोष्टी चटकन मनाला लागतात तर कुणाला नाही. कुणी रागामध्ये स्वतःच नुकसान करून घेतं तर कुणी शांत राहून योग्य निर्णय घेतो.
उदाहरणार्थ-
१)दोन मुलं अजिबात अभ्यास करत नाही.अनेकदा यावरून वाद होतात.त्यात भर म्हणून कुणीतरी अजून चढवून देतं.”तु माठ आहेस,तुला काही येतच नाही. असाच रहा अडाणी भोपळा” वगैरे वगैरे बोलून त्या मुलांना शब्दांचे बाण फेकून मारतं.तर हे असलं काहीतरी ऐकून दोघांना राग येतो.पण त्यातला एक आपल्याला खरच काहीच येत नाही हा विचार करून स्वतःच नुकसान करून घेतो.तो इतरांवरही राग काढतो.तर दुसरा मुलगा स्वतःला सिद्ध करण्यासाठी पेटून उठतो.
२)ऑफिसला जायला घरून वेळेवर निघूनही रस्त्यात केवळ ट्रॅफिक लागल्याने उशीर होतो. अशावेळी दिवसाची सुरूवातच खराब झाल्यासारखं वाटतं.तेव्हाही आपल्याला राग येतो.
३)अभ्यास करूनही चांगला रिझल्ट मिळत नाही. अशावेळी मी हुशार नाही हा न्यूनगंड मनात घर करून राहतो.मुलांची चिडचिड होते.मुलं स्वतःचाच राग राग करायला लागतात. इतकच नाही तर हल्ली तुलना वाढत चालली आहे. पालक तर आपल्या पाल्याची तुलना दुसऱ्या कुणासोबत तरी करतात. त्यामुळे मुलांमध्ये द्वेषाची भावना निर्माण होण्यास वेळ लागत नाही. काही वेळेस पालकही मुलांवर रागावतात.
४)रिया कॉलेजवरुन घरी आली.भूकेने पोटात कावळे ओरडत होते.आल्या आल्या घरातले सगळे डब्बे चाचपडून झाले.पण खायला काही मिळेना. यावर ती आईवर रागवली.”मला खूप भूक लागली आहे. खूप अभ्यास आहे. वैताग आलाय वगैरे असं काहीतरी ती अगदी तावातावाने बोलली.]
अशीच काहीशी उदाहरणं आपल्या रोजच्या आयुष्यात आपण अनुभवतो.राग येतो राग येतो असं म्हणून काही उपयोग नाही. तर तो राग का येतो,त्याची नेमकी कारणं कोणती हे शोधणही तितकच महत्वाच आहे. इतकच नाही तर त्यावर काही सोल्युशन्स काढणेही गरजेचे आहे. तर राग येणं स्वाभाविक असलं तरीही त्यामागे असंख्य कारणही नक्कीच आहेत.अगदी छोट्या छोट्या कारणांवरूनही आपल्याला राग येतो.तर अशीच काही कारणं पुढीलप्रमाणे—————–
१) अनुवांशिक-रागाची भावना ही अनेकदा अनुवांशिकही असू शकते.
२)मानसिक त्रास-अनेकदा माणसाला कोणती ना कोणती मानसिक समस्या असते.तर यातून अनेकदा चिडचिड वगैरे होऊन त्याचा परिणाम त्या त्या व्यक्तीवर होत असतो.
३)शारीरिक त्रास-मानसिक त्रासाबरोबरच माणसाला शारीरिक त्रासही असतो.अनेकदा शरिराच्या दुखण्यामुळे चिडचिड होत राहते.
शरिराची दुखणी नकोनकोशी करून सोडतात.
४)ताणतणाव-माणूस कोणत्याही ताणतणावात असला की त्याचं स्वतःवर नियंत्रण हे कमी प्रमाणात असतं.ताणतणावसुद्धा अनेकदा राग येण्यास कारणीभूत ठरतो.
५)अपेक्षाभंग-माणसाच्या स्वतःकडून, दुसऱ्याकडून कोणत्या ना कोणत्या अपेक्षा असतात.जर त्या पूर्ण झाल्या नाही की राग येतो.
६)आर्थिक चणचण-आर्थिक विवंचना हे मानसिक स्वास्थ्य बिघडवू शकते.पैसा नसेल तर माणूस हतबल होऊन जातो. निराश होतो.अशा वेळी त्याला स्वतःचा, परिस्थितीचा राग येतो.
७)अपमानास्पद वागणूक-प्रत्येकाला वाटतं की आपल्याला चांगली वागणूक मिळावी.चार लोकांनी आपल्याला चांगल बोलावं.परंतु कधी कधी आपण कितीही चाओगल वागून समोरचा सातत्याने अपमान करत असेल तर राग येणं साहजिक आहे.
८)काही जीवशास्त्रीय घटक (विस्कळीत होणारी मज्जासंस्था,अँड्रेनॅलिनचे वाढते प्रमाण,Dopamine and serotonin )
तर काही मानसशास्त्रीय कारणेही याला जबाबदार असतात.(आनंदी – समाधानी वृत्तीचा अभाव,तीव्र स्वयंकेंद्रीपणा,काही अपूर्ण इच्छा)
९)एखाद्या गोष्टीत वारंवार अडथळे येणे.अपयश येणे.
थोडक्यात सांगायचे झाले तर,माणसाला भूक लागल्यावर वेळेवर खायला मिळालं नाही तरीही चिडचिड होऊन त्याला राग येतो.इतकच नाही तर रस्त्यात लागणारी ट्रॅफिक, एखाद्या गोष्टीला झालेला उशीर, एखाद्याने केलेला अपमान,शारीरिक-मानसिक संतुलन बिघडल्याने होणारी चिडचिड यांसारखी असंख्य शारीरिक-मानसिक कारणे राग येण्यास कारणीभूत ठरतात. अर्थात व्यक्तिपरत्वे आणि परिस्थितीनुसार ती वेगवेगळी निश्चितच असू शकतात.
तर अशावेळी रागाकडे दुर्लक्ष न करता त्याची कारणे ,त्या रागापलिकडील मानसिकता समजून घ्यायला हवी.इतकच नाही तर हीच रागाची कारणं जाणून घेऊन त्यावर नियंत्रण कसं मिळवता येईल याचा विचार करून पहा.रागावर नियंत्रण हे हवच.अन्यथा शारीरिक-मानसिक समस्या दिवसागणिक वाढू शकतात. त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा आणि स्वतःची, स्वतःबरोबर इतरांचीही काळजी घ्या.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
