पुष्कळ व्यक्ती स्वतःच समस्यांची निर्मिती करतात आणि त्रास इतरांना देतात.
हर्षदा पिंपळे
राधिका, श्रुती आणि स्वराली खूप चांगल्या मैत्रिणी होत्या.एकाच सोसायटीत रहायच्या.एकाच वर्गात त्या होत्या.आता कॉलेजमध्ये वातावरण कसं असतं हे वेगळं सांगायला नको.तर असच तिघीही कॉलेजमध्ये एकत्र जायच्या एकत्र यायच्या.अगदी कुठेही जाताना त्या नेहमीच सोबत असायच्या.
आता कॉलेज म्हंटलं की एक नाही तर बरेचसे मित्रमैत्रिणी सहज होतात. तसच श्रुतीची ओळख अचानक एका मयुर नावाच्या मुलाशी होते.ओळख झाल्यामुळे ते रोज भेटायचे,बोलायचे.
राधिका आणि स्वराली मात्र त्याच्यापासून चार हात लांबच रहायच्या. त्यांना त्या मयुरचा स्वभाव मुळातच रूचला नव्हता.आणि उडत उडत “मयुर चांगला मुलगा नाही.” असं काहीसं त्यांच्या कानावरही आलं होतं.पण उडत उडत ऐकलेल्या गोष्टींवर लगेच विश्वास ठेवणं त्यांनाच बरोबर वाटलं नाही.
म्हणून त्यांनी पूर्ण चौकशी करून मयुरची पूर्ण माहिती काढली. शेवटी ती उडत आलेली अफवाच खरी ठरली होती.मयुर खरचं चांगला मुलगा नव्हता. आणि तो पुढे जाऊन बदलेल की नाही याचीही काही शाश्वती देता येत नव्हती. त्यामुळे राधिका आणि स्वराली त्याच्याशी पुन्हा कधीच बोलायला गेल्या नाही. श्रुती जवळची मैत्रीण असल्याने त्यांनी श्रुतीला मयुरबद्दल संगळं सांगितलं.पण श्रुती काही विश्वास ठेवायला तयारच नव्हती. उलट तिने राधिका आणि स्वरालीलाच सुनावलं.पण तरीही त्यांनी तिला पुन्हा एकदा सांगण्याचा प्रयत्न केला की,
“अगं श्रुती,मयुर काही चांगला मुलगा नाहीये गं,जरी तुमची मैत्री असली तरी काही गोष्टींकडे नीट लक्ष दे.त्याची मुलींकडे बघण्याचा दृष्टिकोन फार काही चांगला नाही.त्याच्या सहवासात जास्त राहू नको.त्याचं वागणं फार काही बरोबर नाही. कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं त्याला व्यसनही लागलेलं आहे.तुझ्याबरोबर राहून जर तो सुधारलाच तर चांगलच आहे. पण तु त्यांच्यासोबत राहून बिघडू नको.बघ,सांगतोय तर वेळीच ऐक.नाहीतर नंतर उगाच पश्चाताप करण्यात काही अर्थ नाही.आणि आम्ही काहीच सांगितलं नाही असही तु बोलायला नको.सो..ऐक आत्ताच.अगं आणि तुझ्या घरचेही आम्हाला बोलतात गं,त्याचं काय करायचं आम्ही…?”
पण यावर श्रुती काहीही न बोलता निघून गेली. तिला वाटलं राधिका आणि स्वराली उगाच काहीही बोलत आहेत.पण हळुहळू काय झालं तर मयुरने त्याचे रंग दाखवायला सुरुवात केली.त्याने राधिका आणि स्वरालीविषयी श्रुतीच्या मनात चुकीच्या गोष्टी भरवल्या.पण तरीही श्रुतीला मयुरचं खरं वागणं कळत नव्हतं.इतकच नाही तर हळुहळू श्रुतीचं वागणं चुकीचं होत चाललं होतं.
पण या सगळ्याचा त्रास मात्र राधिका आणि स्वरालीला होत होता.सोसायटीमधील लोकं श्रुतीमुळे या दोघींनाच टार्गेट करत होती.आणि इतकच नाही तर नंतर नंतर श्रुतीच्या घरच्यांनी तर राधिका आणि स्वरालीलाच दोष दिला.”तुमच्यामुळे ही बिघडली, तुमच्यामुळे ही अशी वागतेय. वगैरे वगैरे” असं काही टोमणे मारायला सुरुवात केली. शेवटी काय,केलं सगळं श्रुतीने आणि त्रास मात्र त्या दोघींना होत होता.
राधिका आणि स्वरालीला श्रुतीचं असं वागणं सहन झालं नाही. शेवटी वैतागून त्यांनी असलेली मैत्री तोडून टाकली.
पहा,आपल्या आयुष्यात अशी पुष्कळ माणसं असतात जी की स्वतः एखादी समस्या निर्माण करतात आणि त्रास मात्र आपल्याला/दुसऱ्यांना देत राहतात.अशा वेळेस आपल्याला अगदी नकोनकोसं झालेलं असतं.आपल्याला त्यावेळेस नेमकं काय करायचं तेच कळत नसतं.नाही म्हंटलं तरी त्यावेळेस आपण द्विधा अवस्थेत अडकलेले असतो.एकीकडून आपल्याला वाटत असतं की “केलाय समोरच्याने घोळ तर आपण तो निस्तरायला मदत करायला हवी.
आपण नाही मदत करणार तर कोण करणार ? तर एकीकडून असही वाटत असतं की,समस्या यांनी क्रिएट करायच्या आणि नंतर त्रास मात्र आम्ही भोगायचा.अशा स्वतःच समस्या कोण क्रिएट करतं यार ? करायच्या तर करायच्या आणि नंतर आम्हालाच त्रास द्यायचा.” या अशा सगळ्या फिलींग्स त्यावेळी आपल्या मनात गोंधळ घालत असतात. याच्यापलिकडे आपल्याला दुसरं काहीही सुचत नसतं.अक्षरशः वीट येतो आपल्याला त्या गोष्टीचा.
तर , अवतीभवती अशी उदाहरणं नक्कीच तुम्ही पाहिली असतील.
कधी कधी एकदा खड्ड्यात पडूनही कित्येकांना अक्कल येत नाही. पुन्हा पुन्हा ते स्वतःहूनच खड्ड्यात पडत राहतात.आपले हितचिंतक अनेकदा आपल्याला सावध करण्याचा प्रयत्न करतात परंतु आपण ते काही ऐकत नाही.
आपण अनेकदा आपल्याच गोष्टी खऱ्या करत राहतो.आणि एकदा का आपण खड्ड्यात पडलो की लगेचच दुसऱ्याला दोष देऊन मोकळे होतो.अशा वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या अनेक माणसं स्वतःच निर्माण करत असतात. मग त्या नात्यातील असो,कामामधील असो वा अजून कोणत्या वेगळ्या.पण यामुळे त्रास मात्र दुसऱ्यांना होतो.दुसरे यामध्ये विनाकारण भरडले जातात. त्यांना उगाच सहन करावं लागतं.
तर अशावेळेस,मनाला शांत करून पुढे जात रहायचं.काय आहे, अशी लोकं आयुष्यात येतच राहणार पण त्यांच्यामुळे आपण आपल्याला त्रास करून घ्यायचा नाही. आपण आपली काळजी घेत रहायची आणि पुढे जात रहायचं.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

