पुष्कळ वेळेस आपण चुकीचे नसतो, पण मिळालेले घाव आपल्या खऱ्या भावनांना मारून टाकतात.
हर्षदा पिंपळे
भावना म्हणजे सर्वात सुंदर गोष्ट !
आणि निखळ निःस्वार्थी भावना असलेला मनुष्य तर त्याहीपेक्षा सुंदर!
खरचं आपल्या आयुष्यात भावनेला खूप महत्त्व आहे.आपण प्रत्येकवेळी भावनांचा खूप विचार करतो. इतकच नव्हे तर आपल्यामुळे कुणाच्या भावना दुःखावल्या जाऊ नये म्हणूनही आपण अनेकदा धडपडत असतो.पण कधी कधी कळत नकळतपणे भावना दुखावल्या जातात.कधी आपल्या तर कधी दुसऱ्यांच्या. आणि मग भावना दुखावल्या गेल्या की प्रचंड त्रास होतो.आतल्या आत खूप वाईट वाटत राहतं.आतल्या आत रडायला येतं.मनाची अक्षरशः घुसमट होते.बरं,काय झालं ते सांगताही येत नाही. मनातील भावना कधी कुणापुढे व्यक्तच करता येत नाहीत.
हे केव्हा होतं तर आपल्या नाजूक भावना दुखावल्या गेल्यावर.पण तुम्हाला माहित आहे का,भावना दुःखावनं हल्ली रोजचच झालं आहे. कुणीही येतं आणि आपल्या भावनांना दुःखावून जातं.कधी कधी आपणही त्यातच मोडतो.हे सगळं खरं असलं तरीही प्रत्येक चांगला मनुष्य स्वतःच्या परिने भावना जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो.त्यांना जपण्याचा प्रयत्न करत असतो.पण कधी कधी अशी वेळ येते की त्याच भावना मरायला लागतात.अशा वेळी मन सुन्न होतं.काहीही सुचत नाही. त्यावेळी सतत वाटत राहतं ‘भावनाशून्य’ असलेलच केव्हाही चांगलं.
पहा,असं प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी घडत असेल.आपल्याकडून नेहमीच काही ना काही चुका होत असतात यात काही प्रश्न नाही. आपण माणूस आहोत आणि आपण शंभर टक्के चुकूच शकतो.आणि आपण चुकांमधूनच शिकत असतो.पण अनेकदा काय होतं,आपण मुळातच चुकीचे नसतो.आपली एखाद्या गोष्टीत खरं तर काहीही चुक नसते.पण आपल्याला नेमकं त्याच वेळी चुकीचं ठरवलं जातं.सगळा दोष आपल्याला दिला जातो.
कुठलीही शहानिशा न करता आपल्याला आपण फार मोठा गुन्हा केलाय अशी सतत जाणीव करून देणारी लोकं त्यावेळी आपल्या आजुबाजूला काही कमी नसतात.उलट एकामागोमाग एक असा त्या माणसांचा वावर हा वाढत जातो.येणारा जाणारा प्रत्येक जण आपल्याकडेच चुकीचं बोट दाखवत फिरतो.त्यावेळी आपली अवस्था फार वाईट झालेली असते. “मी चुकीचा नाही, माझी यात कणभरही चुक नाही. माझं थोडं ऐकून तर घ्या.माझ्यावर असा अविश्वास दाखवू नका.प्लीझ्…प्लीझ्ssss” असं सगळ्यांना आपण जीव तोडून सांगत असतो पण त्याचा खरच काही उपयोग होत नाही.
आपलं बोलणं कुणाला पटतच नाही.आपलं म्हणणं कोणी ऐकून घ्यायला तयारच नसतं.अशावेळेस मनाला इतक्या जखमा होतात त्या कधीच लवकर भरून निघत नाही.त्यावेळी जे घाव आपल्या मनावर होतात त्यामुळे आपल्या भावनांवर विपरीत परिणाम होतो.संवेदनशील असलेलं मन असंवेदनशील बनायला लागतं.जिवंत असलेल्या भावना हळुहळू मरायला लागतात.अर्थात जिव्हारी लागलेले ते घाव आपल्या खऱ्या भावनांना मारून टाकतात.
आपली या सगळ्यामध्ये इतकी दमछाक होते की,”भावना मेल्या आता माझ्या….”असही आपण कैकदा सहजपणे बोलून जातो.आणि असं बोलायची वेळ तेव्हाच येते जेव्हा एखाद्या गोष्टीचा भयंकर त्रास आपल्याला होत असतो.नकोनकोसं होतं जातं भावनांमध्ये अडकून राहणं.नकोशा वाटतात सगळ्याच भावना.आणि पुन्हा पुन्हा नव्या भावनांमध्ये गुंफायलाही मन लवकर तयार होत नाही.ती सलच मनाला इतकी सलते की भावनांवरचा विश्वासच हळुहळू कमी व्हायला लागतो.
खरचं कळत नाही समोरचा आपल्या भावनांचा कधी कधी विचार का करत नाही ? समोरच्या मनावर काय परिणाम होऊ शकतात याचा विचार मनातसुद्धा येत नाही का? इतकं कसं कोणी निष्ठुर होऊ शकतं? एकाने आपल्याकडे चुकीचं बोट दाखवलं तर संपूर्ण जग आपल्याला त्याच नजरेतुन बघत राहतं.अशा नजरा सहन होण्यासारख्या नसतात. मनाला अक्षरशः छळत राहते हो ती नजर !
आपण चुकीचे नसताना आपल्याला चुकीचं ठरवलं जातं याचा त्रास होतो. आणि दुसरीकडे आपल्या भावना मरायला लागतात याचाही त्रास होतच राहतो.या गोष्टींचा त्रास होतो हे मान्य आहे.परंतु अशा गोष्टी आयुष्यात कधी ना कधी घडनारच असतात हे लक्षात घेऊन आपणच त्यातून स्वतःला सावरलं पाहिजे.आपलं संवेदनशील मन जपलं पाहिजे. सुन्न झालेल्या भावनांना आपणच शांत केलं पाहिजे.भावना मेल्या तर आपल्यातल्या माणूसही जिवंत बोलका राहणार नाही. जोपर्यंत मानसाच्या भावना जिवंत असतील तोपर्यंतच माणूस जिवंत भासेल.
भावनाशून्य माणसापेक्षा भावना असलेला मनुष्य जास्त सुंदर असतो. कारण भावना माणसाला आयुष्य जगायला शिकवतात.त्यामुळे कुणी आपल्या भावनांना दुःखावत असेल ,त्रास देत असेल तर त्यांच्यामुळे आपल्या भावनांवर परिणाम होऊ देऊ नका.लोकं चुकीचं ठरवत राहतील पण म्हणून आपण आपल्या भावनांना मारत राहणं किती योग्य आहे?शेवटी, आपल्या भावना जिवंत ठेवणं आपल्या हातात आहे. म्हणून नेहमी भावनांना जपण्याचा प्रयत्न करा.त्यांना नेहमी जिवंत आणि बोलक्या ठेवण्याचा प्रयत्न करा.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Beautiful mam, thank