पुष्कळ वेळा मोबाईल चेक करून काय उपयोग.. जर समोरच्याला आपल्याशी बोलयचेच नसेल तर..
अपर्णा कुलकर्णी
मुक्ता आणि मानसी दोघी एकमेकींच्या खूपच छान मैत्रिणी. दोघीही एकाच गावात रहात असत. मुक्ता तिच्या नावाप्रमाणे अगदी मुक्त, स्वच्छंदी मुलगी. तर मानसी जरा अबोल, शांत स्वभावाची होती. मुक्ताची आर्थिक परिस्थिती जेमतेम होती. त्यामुळे तिने फार महागड्या शाळेत न टाकता मुलाला एका साध्या शाळेत टाकले होते. अंथरूण पाहून पाय पसरावेत या विचारांची ती होती. तर मानसीची आर्थिक परिस्थिती खूप चांगली होती पण तिचा स्वभाव समंजस आणि लाघवी असल्यामुळे मुक्ता आणि तिच्यात छान मैत्री होती. मुक्ताला जॉब न करता स्वतःचे असे काहीतरी वेगळे करायचे होते आणि मानसीला घरात बसून वेळ जात नसल्याने काहीतरी करावेसे वाटत होते.
एकदा दोघींनी मिळून काहीतरी छान,वेगळे करून पाहूया या विचाराने संस्कार वर्ग सुरू करण्याचे ठरवले. मुक्ताचा स्वभाव खूपच सुंदर होता. त्यात तिचे शिक्षण ही छान झाले होते. लहान मुलांना आपलेसे करून घ्यायला तिला आवडत असे. लग्नाआधी तिने मुलांना शिकवण्याचे काम केले होते त्यामुळे अनुभव होता पण शिकवण्यासाठी लागणारी जागा, त्यासाठी भरावे लागणारे भाडे तिला परवडणारे नव्हते आणि तीच मदत करायला मानसी तयार होती.
कारण मानसीचे घर मेन एरिया मध्ये होते, शिवाय मोठे होते त्यामुळे जागेचा प्रश्न नव्हताच. दोघींनी होणारा फायदा वाटून घेण्याचे ठरवले होते. पण मुक्ताच्या नवऱ्याला पार्टनरशिपमध्ये व्यवसाय म्हणजेच कोणतेही काम करणे आवडत नव्हते. पण मुक्ताच्या हट्टापुढे त्याने शांत राहायचं ठरवले.
क्लासची जाहिरात, त्यासाठी लागणारा मजकूर सगळे तयार झाले आणि बघता बघता क्लास सुरू झाला. सुरुवातीला दहा मुलांवर सुरू झालेला क्लास २५ मुलांवर आला. मुक्ताची मुलांना समजून सांगण्याची पद्धत, त्यांच्याच वयाचे होऊन त्यांचे मित्र बनून हसत खेळत शिकवण्याची कला खरंच वाखाणण्याजोगी होती. तिचे शिकवण्याचे कसब पाहून मानसी भारावून गेली होती. हळू हळू तिनेही सगळ्या गोष्टी आत्मसात केल्या होत्या. बघता बघता क्लासला सहा महिने पूर्ण झाले आणि ५० मुले झाली.
मानसी आणि मुक्ता दोघींनाही फायदा मिळत होता. पण मानसीच्या मनात कपट निर्माण झाले. कारण आता ती ही चांगल्या प्रकारे मुलांना शिकवू शकत होती आणि तिला जागेची अडचण नव्हती. त्यामुळे मुक्ता आपल्या जागेत येऊन शिकवते याचा तिला राग येऊ लागला. खरतर मुक्तामुळे मानसी बऱ्याच गोष्टी शिकली होती पण मी जागा दिल्यामुळे मुक्ता क्लासेस घेऊ शकली असे तिचे म्हणणे होते.
म्हणून एक दिवस क्लास संपल्यावर माझ्या जागेत येऊन तू शिकवायचे नाही असे मानासीने मुक्ताला सांगितले. मुक्तासाठी हा खूप मोठा धक्का होता. अचानक काहीच कारण नसताना का, कशामुळे असे मानसी बोलते आहे ते मुक्ताला कळेना. पण तिचे निर्वाणीचा बोलणं ऐकून मुक्ता फार काही बोलली नाही. तशी ती खूप स्वाभिमानी होती पण अचानक घेतलेल्या निर्णयामागे काय कारण आहे ते तिला समजत नव्हते.
घरी आल्यावर मुक्ताने तिच्या नवऱ्याला सगळे सांगितले. त्याने सरळ सांगितले मी एखादी जागा बगतो, कमी पैशांची तू तिथे क्लास सुरू कर पण आता त्या मानसीच्या नादाला नको लागू. पण मुक्ता मात्र खूपच दुखावली गेली होती. खरतर मुक्ताला तिचा नवरा म्हणाला त्याप्रमाणे नव्याने क्लास सुरू करता येत होते. पण पडत्या काळात मानसीने केलेली मदत शिवाय सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे दोघींचे मैत्रीचे नाते तिला सुरळीत व्हायला हवे होते.
कारण मुक्ता पैशापेक्षा नात्यांना महत्त्व देणारी मुलगी होती. क्लासेस काय आज ना उद्या सुरू झाले ही असते पण तिला मानसीची मैत्री गमवायची नव्हती. त्यामुळे मानसीला सतत फोन किंवा मेसेज करून बोलण्याचे प्रयत्न करत होती पण मानसी मात्र कशालाच रिप्लाय करत नव्हती. मुक्ताल वाटे मानसी आणि मी खूप छान मैत्रिणी आहोत, आज ना उद्या ती नक्की माझ्याकडे येईल आणि बोलेल, मेसेज करेल, फोन करेल पण तसे झाले नाही. दिवसातून शंभर वेळा मुक्ता फोन तपासून बघत असे पण पुष्कळ वेळा मोबाईल चेक करून काय उपयोग जर समोरच्याला आपल्याशी बोलायचेच नसेल तर ….
मित्रांनो ही फक्त एक परिस्थिती होती, ज्यात एक मैत्रीण दुसऱ्या मैत्रिणीची वाट पहात होती. पण आजकाल अनेक वेळा थोड्या फार फरकाने सगळ्यांच्याच बाबतीत असे होते. नात्यात कधीतरी दुरावा येतो, कधी एकाला ते नाते नको असते पण दुसऱ्याला हवे असते. अशा वेळी एक व्यक्ती आशेने दुसऱ्या व्यक्तीला सतत फोन, मेसेजेस करून संपर्क करण्याचा प्रयत्न करतो पण समोरची व्यक्ती कशाचीच कदर करत नाही.
नातं तेंव्हाच टिकतं, जर नात्याची गरज दोघानाही असेल. मी तर म्हणेन एका हाताने टाळी वाजत नाही तसेच एकतर्फी नातं टिकत नाही. त्यामुळे दोन्ही कडून ती गरज पूर्ण होत असेल तरच आणि तरच नातं टिकवावे नाहीतर अशा वेळी सरळ सगळ्या अपेक्षा सोडून देऊन आपला मार्ग आपणच शोधावा.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Excellent