पुष्कळ मुले-मुली सुद्धा आई-वडिलांसाठी आपली स्वप्न बाजूला सारतात.
हर्षदा पिंपळे
स्वरूपची कहाणीच काही वेगळी होती. लहानपणापासून हुशार आणि स्वभावाने तितकाच नम्र असणाऱ्या स्वरुपची अगदी शाळेत असल्यापासून विविध अशी स्वप्नं होती.पण घरची परिस्थिती तशी बेताची होती.घरी शेती होती परंतु सगळा खेळ पावसापाण्यावर चालायचा.आई वडील शेती करायचे. त्याच पैशावर घर आणि स्वरूपच्या शिक्षणाचा खर्च चालायचा.स्वरूप साधारण सहावीत असेन. त्यावेळेस त्याला गाणी ऐकता ऐकता गाणी गाण्याचा सहजपणे छंद जडला.त्याला वाटायचं की त्याने गायक व्हावं.पण तेव्हा त्याला घरचे काही फारसं गाणं म्हणू द्यायचे नाही.
“आत्ता लहान आहे आधी अभ्यास कर.अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नको.कशीबशी निदान दहावी तरी कर.” असं त्याला त्याची आक्का सारखी बोलायची.नंतर काही वर्षांनी स्वरूपची दहावी झाली.तर स्वरूपला पुढे शिकायची इच्छा होती.पुढे जाऊन त्याला डॉक्टर व्हायचं होतं.सर्जन व्हायचं होतं पण घरच्यांनी त्याला सरळ सरळ नकार दिला. सायन्सला त्याला काही प्रवेश घेऊ दिला नाही.
“कॉमर्स कर,आणि कुठल्यातरी बँकेत एखादी नोकरी कर.”असं घरच्यांनी त्याला सांगितलं.आक्काचा मात्र यालाही विरोधच होता.पण आईबाबांनी निदान शिकायची तरी परवानगी दिली होती. “पंधरावी तर पंधरावी….,कॉमर्स तर कॉमर्स,आपलं काहीतरी शिकून तर होईल…” असं स्वतःशीच बोलत तो पुढच्या प्रवेशासाठी कॉलेजमध्ये गेला.प्रवेश घेतला. त्याचं कॉलेजही सुरू झालं.
अकरावी ते पंधरावी पर्यंत त्याने कॉलेजमध्ये जाऊन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीझमध्ये सहभागी झाला होता. आणि त्यामुळेच त्याला अजून काहीतरी क्रिएटिव्ह करण्याचा नवा ध्यास लागला होता. वेगवेगळ्या स्वप्नांकडे त्याचं मन धाव घेत होतं.नाटक, कला ,संगीत ,रांगोळी यांच त्याला प्रचंड वेड लागलं होतं.
आता केवळ एक कलाकार बनण्याचं त्याचं स्वप्न होतं.घरच्यांसाठी त्याने डॉक्टर होण्याचं स्वप्न केव्हाच सोडून दिलं होतं.पण पंधरावी होऊन नुकतेच चार पाच दिवस झाले होते. आणि त्याला बँकेत नोकरी करावी लागणार होती. पण ती नोकरी करायची त्याची अजिबात मनापासून इच्छा नव्हती. करायचं म्हणून त्याने नोकरी करायचं ठरवलं. चार पाच ठिकाणी इंटरव्ह्यु देऊन त्याला नोकरी लागली. पण त्याचं मन काही तिथे रमेना.
अधूनमधून तो त्याच्या स्वप्नांकडे आकर्षित व्हायचा.पण पुन्हा त्याला त्याचे घरचे आठवायचे.त्याचं नोकरीमध्ये फारसं लक्ष नाही हे त्याच्या घरच्यांच्या लक्षात आलं.आणि त्यांनी त्याला “बस् झाली नोकरी आता शेतीकडेच लक्ष दे.शेती आणि तू आता इतकच लक्षात ठेवं.”असं घरच्यांनी त्याला सांगितलं.पण त्यावेळी मात्र तो बोलला “आई,शेती करणं वाईट नाही.पण मला शेती करायची नाही. मला शेतीपेक्षा जास्त आवड नाटकात आहे. आधी डॉक्टर व्हायचं होतं पण जाऊदे.पण आता नाटक किंवा गाणं वगैरे तरी करूदे. मला प्रचंड आवड आहे गं त्याची…प्लीझ् नाही म्हणू नका मला.सुरूवातीला दोन पैसे कमी मिळतील पण प्लीझ् मला तेच करायचं आहे.”
पण यावर…त्याचे आईबाबा सरळ त्याला नाही म्हणाले.”नाही…. स्वरूप. अजिबात नाही. एकतर नोकरी तरी नीट कर नाहीतर शेतीकडे लक्ष दे.तेच चांगलं आहे. आणि नाही, नोकरी नकोच करू.शेती आहे ती शेतीच नीट कर.शेतीत लक्ष घाल जरा.आम्हाला मदत कर.आणि आमच्या नंतर तर तुलाच शेती सांभाळायची आहे. ते नाटक बिटक इथं नको.आपली शेतीच बरी ! ” असं म्हणत त्यांनी स्वरूपला खरच नकार दिला.
त्याने विनवण्या करूनही काहीही झालं नाही. शेवटी आईबाबांसाठी त्याने स्वतःचं मन घट्ट करून त्याची स्वप्नं बाजूला सारली. “ठीक आहे, मी करेन शेती.” असं म्हणून तो शेताकडे निघून गेला.अर्थात एखादी गोष्ट आवडत नसली तरी ती निष्ठेने करण्याची त्याची नेहमीच तयारी असायची.अगदी शेतीकडेही त्याने आवडत नाही म्हणून कधी दुर्लक्ष केलं नाही.उलट मनापासून शेती करण्यावर भर दिला.स्वतःचं ज्ञान आणि कौशल्ये वापरून त्याने शेतीला नवा गंध आणला होता.
आईबाबा त्याच्या या निष्ठेवर खरच खूप आनंदी होते.आईबाबांच्या चेहऱ्यावर असणारं समाधान, सुख स्वरूपसाठी सगळ्यात जास्त महत्वाचं होतं.स्वतःची स्वप्नं पूर्ण करता आली नाही म्हणून थोडं दुःख त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात सलत होतं.परंतु आईबाबांच्या आनंदापुढे त्या गोष्टीचं त्याने फारसं वाईट वाटून न घेता शेतीमध्येच एखाद्या पिकाप्रमाणे मनाला रूजवलं होतं.
तर….मित्रांनो या स्वरूपसारखीच कित्येकांची वेगवेगळ्या प्रकारची स्वप्नं असतात. कुणाची ती पूर्ण होतात तर कुणाची ती पूर्ण होत नाही. अर्थात कधी कधी स्वप्नांना घरच्यांचा पाठिंबा असतो तर कधी कधी नाही.पाठिंबा असेल तर काही प्रश्नच उद्भवत नाही. पण त्याच स्वप्नांना पाठिंबा नसेल तर फार अवघड होऊन जातं.
आयुष्यात प्रत्येक गोष्टीचं असं एक वेगवेगळं स्थान आहे.त्यापैकीच एक म्हणजे स्वप्न ! स्वप्नांना आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात वेगळच स्थान आहे. प्रत्येक माणूस वेगवेगळ्या स्वभावाचा असतो तसच त्याची स्वप्नही वेगवेगळी असतात.कुणाचं डॉक्टर बनण्याचं स्वप्न असतं तर कुणाला प्रशासकीय सेवेत अधिकारी म्हणून काम करायची इच्छा असते.कुणाला छोट्या घराला मोठं करायचं असतं.कुणाला जगाची सफर करायचं स्वप्न असतं तर कुणाला सगळं आयुष्य प्राण्यांसाठी, निसर्गासाठी, अनाथ लोकांसाठी व्यथित करण्याचं स्वप्नं असतं.
खरचं स्वप्नांना काही मर्यादा नसेलच असं वाटतं.कारण एकामागोमाग एक स्वप्नांची यादी वाढतच जाते.पण कधी कधी काय होतं ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रत्येकजण आपल्याला परीने धडपड करत असतो.काहींना तीच स्वप्नं पूर्ण करण्यासाठी घरच्यांची पूर्ण सहमती मिळते तर काहींना ती मिळतच नाही.
आणि मग केवळ आईबाबांसाठी/घरच्यांसाठी काही मुलं स्वतःच्या स्वप्नांची यादी कुठल्यातरी एका पेटीत बंद करून ठेवतात.सर्वांगीण विचार करून,मनावर दगड ठेऊन, स्वतःच्या मनाविरुद्ध जाऊन केवळ आईबाबांसाठी, त्यांच्या समाधानासाठी स्वतःची स्वप्नं बाजूला ठेवण्याचं धाडस करतात.आईबाबांसाठी काय महत्वाचं आहे ते पाहतात.आईबाबांना कशात समाधान वाटतय त्याचा विचार करतात.स्वतःचं स्वप्नं एक स्वप्नच होतं असं समजून त्याला हसतहसत सोडून देतात. आणि आईबाबांसाठी नव्या स्वप्नांना गवसणी घालतात.
तर ,कधी कधी आपण ऐकतो की,आईवडील मुलांच्या स्वप्नांसाठी त्यांची स्वतःची स्वप्नं बाजूला सारतात.हो,यात काही नाकारण्यासारखं मुळीच नाही. परंतू हेही तितकच खरं की,पुष्कळ मुलं-मुलीही आई-वडिलांसाठी स्वतःची स्वप्नं बाजूला सारतात. आणि यातूनच स्वरूपसारख्या प्रेरणादायी कहाण्या जन्माला येतात.
शेवटी एकच की…सर्वांगिण विचार करणं महत्वाचं आहे. मुलांची स्वप्नं वाईट /अयोग्य नसतील तर त्याला पालकांनी मनापासून पाठिंबा द्यायला हवा.दोघांनी एकमेकांना समजून घ्यायला हवं. योग्य स्वप्नांना योग्य दिशा ही मिळायलाच हवी.हा विचार लक्षात घेऊन स्वप्नांना झेप घेण्यासाठी ग्रीन सिग्नल प्रत्येकाने द्यायला हवा.
तर….नसेल पाठिंबा तरी स्वप्नं बघणं थांबवू नका,एक ना एक दिवस मनाच्या कोनाड्यातील स्वप्नांनाही उडण्याची संधी नक्कीच मिळेल.
Keep dreaming…!
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

