पुष्कळ कामे पूर्णत्वाला येण्याआधी आपल्यासाठी ती कायम अशक्यच असतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“अग रेणुका तू का घाबरत आहेस इतकी? तुला इतक्या वर्षांचा अनुभव आहे. मग काय हरकत आहे तुला ही ऑर्डर घ्यायला?” सतीश रेणुकाला समजावत होता. रेणुका पहिल्यापासून जेवणाच्या, फराळाच्या ऑर्डर वगैरे घेत होती. तिला आधीपासूनच विविध पदार्थ बनवायची आवड. अगदी पारंपरिक पदार्थापासून ते आताचे नवीन पदार्थ ती शिकली आणि त्याच्या ऑर्डर ती घ्यायची आणि सर्व एकट्याने करायची. मुल लहान असताना दिवसभर काय करायचं असा प्रश्न पडायचा म्हणून तिने हे काम करायला सुरुवात केली होती.
पण त्याच हळू हळू व्यवसायात रूपांतर झालं. सतीश पण खूप सपोर्ट करणारा होता. त्याला पहिल्यापासून वाटायचं आपल्याला जे आवडत ते माणसाने करावं. स्वतःचा पायावर उभ राहावं. त्यामुळे तो ही तिला हवी ती मदत करायचा. सुखी समाधानी अस कुटुंब होत हे. पण हल्ली रेणुका जरा कामाचा व्याप कमी करायला पाहत होती. तिला एकटीने सर्व झेपायच नाही. त्यामुळे ती तेवढ्याच मोजक्या ऑर्डर घ्यायची. पण पहिल्यापासून काही माणसं जोडली गेली होती. ज्यांना तिच्याच हातच केलेलं आवडे. ते म्हणत देखील, काकू तुम्ही करता तस आम्हाला काही जमत नाही. आम्ही सर्व व्यवस्था करून देतो, पण तुम्हीच जेवणाच पाहिलं पाहिजे.
तसच काही आज झालं. १००लोकांच्या जेवणाची ऑर्डर आली होती. खूप दिवस झालेले अशी मोठी ऑर्डर घेऊन. त्यामुळे रेणुकाला जवळपास हे करण अशक्यच वाटत होत.
म्हणून सतीश तिला समजावत होता. “अहो तुम्ही सांगताय कर म्हणून, पण तुम्हाला पण माहीत आहे गेले कित्येक महिने मी अशी ऑर्डर घेतली नाही. मला होणारे का करायला? उगाच काही कमी जास्त झालं तर? जेवण वेळेवर मिळायला नको?” “अग रेणू, तुझा सराव सुटलाय ना म्हणून तुला भीती वाटते, पण विश्वास ठेव एकदा तू बनवायला सुरुवात केली ना की तुला जमेल.” सतीशला चांगल ठाऊक होत की रेणुकाने जरी खूप दिवस इतक्या लोकांचं जेवण केलं नसल तरी ती करू शकते.
ती क्षमता तिच्यामध्ये आहे. फक्त भीतीने ती नको म्हणत होती. पण ती करू शकते हा विश्वास सतीशला होता म्हणून तो तिला आग्रह करत होता. आणि ही एक संधी पण होती तिला तिचा आत्मविश्वास परत मिळवून द्यायची. आताची ऑर्डर जर तिने पूर्ण केली असती तर परत ती पहिल्यासारखी बिझी झाली असती. मध्यंतरी एका छोट्या प्रसंगावरून तिने जरा धसका घेतला होता व ती काही करायला घेत नव्हती. पण तिच्या मधील मुळ सुगरण अजून तशीच होती.
सतीश ने पण आग्रह केला आणि ज्या लोकांनी ऑर्डर दिली त्यांना पण तिच्यावर तिच्या जेवणावर विश्वास होता. त्यामुळे तिने ही ऑर्डर घेतली. कोण कोणते पदार्थ करायचे त्याची यादी आली, त्यासाठी कोणत सामान लागणार त्याची यादी रेणुकाने केली. जेवण घरातूनच बनवून द्यायचं होत. त्यामुळे बारीक सारीक सर्व सामान आणावं लागणार होत. ती जबाबदारी सतीशने घेतली. त्याला आज कामावर जायचं नव्हत. तो लगबगीने सर्व सामान घेऊन आला.
या बाबतीत मात्र रेणुका नेहमी देवाचे आभार मानायची. इतका मनमिळावू, मदत करणारा नवरा, गुणी मुल दिली. कुटुंब छोट असल तरी एकमेकांना त्यांनी धरून ठेवलं त्यामुळं जरी संकट आला तरी एकट पडल्यासारखं वाटल नाही. सामान आणल्यावर लगेच रेणुकाने जेवण बनवायला सुरुवात केली. मनात भीती होतीच की वेळेत सर्व होईल का नाही. कारण पदार्थ खूप होते. पण शेवटी सुगरणीचा हात होता. तयारीचे हात होते आणि पहिल्यापासून मेहनत करायची पटापट काम करायची सवय असल्यामुळे तिने जम बसवला.
एक दोन पदार्थ बनवून झाल्यावर तिला विश्वास येऊ लागला, अंदाज आला की सर्व जेवण व्हायला किती वेळ लागेल. त्याप्रमाणे तिने काम चालू ठेवले. सोबतीला सतीश होताच. त्याने छोटी मोठी काम करून दिली. पाहता पाहता सर्व जेवण बनत आल. आश्चर्य म्हणजे वेळेच्या अर्धा एक तास आधीच सर्व जेवण तिने बनवल. जे काम तिला काही वेळापूर्वी अशक्य वाटत होत, ते तिने पूर्ण केलं होत. सर्व व्यवस्थित डब्यात भरून तिने ते जेवण पाठवून दिले. मनात अजून धास्ती होती. जेवण बनवलं खर पण त्यांना आवडलं असेल ना? तर तोही प्रश्न मिटला. ज्यांनी जेवण नेल होत त्यांचा नंतर फोन आला व त्यांनी भरुभरून कौतुक केलं.
सर्वांना जेवण आवडलं होत. आता तिच्या मनाला खर समाधान मिळालं होत. तिने फोन ठेवला व सतीश जवळ येऊन म्हणाली, “थँक्यू. आज तुमच्यामुळे मी हे सर्व करू शकले, माझा गेलेला विश्वास तुम्ही परत मिळवून दिला.” त्यावर सतीश तिची पाठ थोपटत म्हणाला, “अग मी काही केल नाही. तुला हे काम जमणारच होत. पण तू मनात उगाच भीती घेतली होती. ती काढायचं काम, तुला फक्त एक push देण्याचं काम मी केल. बाकी सारे कष्ट तूच केलेस. आणि त्याच फळ तुला मिळालं.”
हे आपल्या बाबतीतही अनेकदा होत. आपल्याला खूप काही गोष्टी करायच्या असतात. पण त्या पूर्ण होईपर्यंत अशक्यच वाटतात. आणि अस वाटल्याने आपण सुरुवातच करायला जात नाही. परीक्षेला काही दिवस राहिले, आता कसला पूर्ण अभ्यास कव्हर होतोय म्हणून बरीच मुल जितका होईल तितका पण करत नाहीत. एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, ग्रो करायचा असेल तर आधीच मनात येत, आपण हे जे काही करतोय ते नीट पुर्ण होईल ना? आपण इतकी गुंतवणूक करत आहोत तर आपल्याला जसं हवं तस होईलच असं नाही अस वाटून त्या कामाला सुरुवातच केली जात नाही.
पण यातून आपण आपलं नुकसान करून घेतो. आपणच स्वतः वर शंका घेऊन आपली प्रेरणा कमी करून टाकतो. इथे गरज असते स्वतःला त्या कामात झोकून देण्याची, एक सुरुवात करण्याची. जर आपण कष्ट घेतले, मेहनत केली तर आपल्याला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. Markus Aurileus म्हणतो, “But if a thing is humanly possible, consider it to be in your reach.”
कोणत्याही माणसाला जर एखादी गोष्ट शक्य होत असेल तर ती आपल्या आटोक्यात पण असते. आपण पण ती करू शकतो. पण पूर्णत्वाच्या भीतीने आपण करायला जात नाही. यावेळी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पूर्ण होण्यासाठी आधी त्याची सुरुवात करावी लागते. तर ती पूर्ण होईल का नाही हे पाहता येत. त्यामुळे आधीच काहीतरी मनात घेऊन मागे न सरता आपण निदान एक प्रयत्न तरी केला पाहिजे. कारण impossible ला जरी वेगळं केल तरी i m possible असच होत.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
