पुढे सरकताना याचा काहीही फरक पडत नाही की सध्या तुम्ही किती दुःखी आहात.
काव्या धनंजय गगनग्रास
(एम.ए. समुपदेशन मानसशास्त्र)
इवल्याशा पणतीचा इवलासा जीव
त्योच घेई परी समद्या अंधाराचा ठाव
दिस जातील, दिस येतील
भोग सरल, सुख येईल…..
कवीने किती सुंदर रित्या या शब्दांतून सकारात्मकतेची ताकद मांडली आहे. खरच आहे, पणतीचा जीव तरी केव्हढासा असतो. त्याची ज्योत किती लहानगी असते. पण त्या इवल्याश्या ज्योतीमध्ये अख्खा अंधार मिटवायची ताकद असते. आणि ही ज्योत म्हणजेच आपल्या मनातली आशा. आपल्या मनातला एक आशेचा किरण आपलं दुःख कमी करू शकतो. आपल्याला त्यातून बाहेर पडायला मदत करू शकतो. मग त्या दुःखाचा अंधार हा कितीही मोठा असुदेत. आपल्याला हा आशेचा, सकारात्मकतेचा प्रकाश पुढे वाट दाखवत राहणार.
हा प्रकाश आपल्याला जाणीव करून देतो की कोणतीही गोष्ट चिरकाल नाही. जसं कवीने सांगितलं, आज जसा दिवस आला तसा तो परत जाणार, तसच आता आपल्यात आयुष्यात जे काही दुःख आहे तेही निघून जाऊन पुन्हा सुख येणार आहे.
पण जेव्हा आपण दुःखात असतो तेव्हा हे आपल्याला. बहुतेकदा लक्षातच येत नाही. आपल्याला अस वाटत असत की ही परिस्थिती आहे तशी राहणार आहे. अगदी शेवटपर्यंत. आपण एकप्रकारे या गोष्टीचं overgenralization करून टाकतो. बरेचदा जेव्हा वाईट घटना आयुष्यात घडतात तेव्हा त्याचा मानसिक आघात आपल्या मनावर होत असतो. काही जण त्यातून हळू हळू बाहेर पडतात तर काही जणांना त्यातून बाहेर पडायला वेळ लागतो. कारण मनात एक प्रकारची भीती बसलेली असते. बाहेरच जग पुढे सरकत असल तरी आपण तिथेच कुठेतरी अडकून बसतो. आणि त्यामुळे आयुष्यात पुढे जायला मन कचरत, घाबरत.
ज्यापद्धतीचा आघात आपल्यावर झालेला असतो, जे दुःख वाट्याला आलेल असत तशी घटना किंवा तश्या प्रसंगाची पुसटशी चाहूल जरी लागली तरी आधीच सर्व उफाळून येत. यातून आपण पुढे न जाता परिस्थिती जास्तीत जास्त नाकारायचा प्रयत्न करतो, त्यापासून पळून जाण्याचा प्रयत्न करतो. कोरोना असेल किंवा पुर, अनेकांच्या आयुष्यात उलथापालथ झाली. स्वतःच्या व्यक्तीचा मृत्यु पाहण्यापासून ते आयुष्भर पै पै करून बांधलेले घर कोसळण असो वेगवेगळ्या पद्धतीचे त्रास लोकांनी अनुभवले आहेत. ज्यांची reseliance Power चांगली होती ते यातून बाहेर पडले व परत नव्याने सर्व सुरू केल.
पण हे सर्वांना जमलं अस नाही. कारण व्यक्तीनुसार त्याचा त्रास बदलत असतो. कोणत्या गोष्टीने कोणाला किती दुःख होईल त्रास होईल हे सांगता येत नसत.
त्यामुळे आता नुसतं सर्दी झाली तरी काही जण लगेच घाबरतात, पाऊस जरा वाढला तरी अनेकांना लगेच टेन्शन येऊ लागतं. याच कारण आधी जे काही झालं आहे त्यातून पूर्ण बाहेर पडता आलेल नाहीये. पुढे जाता येत नाहीये. कारण पुन्हा तेच होईल अशी चिंता मनात आहे.
पण अस आहे त्याच परिस्थितीत थांबून कधीही आपलं दुःख कमी होत नसत. त्यातून बाहेर पडायचं असेल तर आपल्याला पुढे गेलं पाहिजे. आता त्रास आहे याचा अर्थ पुढे पण होईल अस नसत. कारण कोणाताच दिवस सारखा नसतो. दुःखाशी सामना केल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही.
दुःखात असताना अस वाटत की आता आपल्याला किती त्रास आहे, आपण काही करू शकत नाही. पण अस नसत. आपण आपल्याला दुःखाला मनात मोठ करून आपल्या क्षमता विसरून बसतो. त्यांनाच परत आठवायची गरज असते.
गाडी जेव्हा बंद पडते तेव्हा ती आपोआप चालू होईल तेव्हा जाऊ अस म्हटल किंवा ती आता बंदच झाली आहे पुढे जाणार नाही अस म्हटल तर गाडी तिथेच राहणार आणि आपणही. अश्यावेळी कधी स्वतःहून तरी इतरांची मदत घेऊन आपल्याला ती बंद पडलेली गाडी ढकलावी लागते आणि ती चालू होते.
तसच आपलं आहे. मी दुःखी आहे म्हणून तसच थांबून राहील तर आपण कदाचित अडकून पडू. त्यामुळे आता आपण दुःखात असलो तरी त्याचा आपल्या पुढे जाण्यावर फरक पडत नाही. कारण तस असत तर सर्वच दुःखी माणसं बसून राहिली असती. पण अस होत नाही. अनेक जण दुःखातून परत वर येऊन पुढे जातात.
कारण जरी आपल्याला दुःख असल तरी ते ठेवून अजून वाढवायचं की त्यावर उपाय करत पुढे जायचं हे आपल्या हातात आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Khupch chan ani positive