प्रत्येकाने मला समजून घ्यावं, खरंतर याची अजिबात गरज नाही.
काव्या गगनग्रास
(समुपदेशक)
“त्रिशा सोड आता, कितीवेळ अशी गाल फुगवून बसणार आहेस?” राहुल तिची समजूत घालत होता. पण ती काही केल्या ऐकेना. तिचं एकच म्हणणं होत. मला कोणी समजून घेत नाही. माझं बोलणं कोणाला पटत नाही. मी मात्र सर्वांच ऐकून घ्यायचं. ती जरी अशी रिऍक्ट झाली असली तरी इतकं काही झालेलं नव्हत. उन्हाळ्याची सुट्टी पडली होती आणि सर्व भावंडं आपल्या मामाच्या गावी राहायला आली होती. चार मावश्या, दोन मामा, त्यांची मुलं.
वयाच अंतर देखील फार नव्हत. सर्व कमी जास्त फरकाने एकाच वयाची. पण तरीही त्यातल्या त्यात नमा मावशीची मुलगी उर्वी लहान होती. पण ते फक्त वयानेच धरायचं. कारण जरी ऊर्वी लहान असली तरी लहान मुलासारख वागणं, सारखं रुसून, फुगून बसणं हे काम जास्त करून त्रिशाचं असे. जरा काही झालं की ती नाराज होई. तिच्या मनासारख्या सर्व गोष्टी व्ह्यायला लागत. तस झालं नाही की मॅडमचा एक तर पारा तरी चढे नाहीतर डोळ्यांना धारा लागत. आणि नेहमी एकच म्हणणं असे. बाकी सर्वांना तुम्ही समजून घेता. सर्व त्यांच्या मनासारखं होत. माझ्या मनासारखं काही केलं जातं नाही. मला कोण समजून घेत नाही.
हे तिला सर्वच बाबतीत वाटे. अगदी खायला काही वेगळे केले तर तिथपासून खेळताना तिला out करण्यापर्यंत. आज पण तसच झालं होत. ते कोणतातरी खेळ खेळत होते. ज्यात ती हरली. आता खेळ म्हणजे हार जीत होणार. पण तिला हे मंजूर नव्हत. तिला वाटत होत की ती हरलेली नाही. तिला मुद्दाम सर्व काढायला पाहत आहेत. पण अस कोणी काही केल नव्हत. उलट तिचा असा स्वभाव पाहून तिला दर वेळी तिची भावंडं, आई बाबा घरातले मोठे जास्त सवलती देत. का? तर उगाच तिने नाराज होऊन बाजूला बसू नये म्हणून.
पण आता त्याचाच चुकीचा परिणाम दिसू लागला होता. तिला अती समजून घेण्याचा परिणाम म्हणून ती आता इतकी हट्टी झाली होती. दिवसेंदिवस तिच्या डिमांड वाढत चालल्या होत्या. म्हणून आता सर्वांनी ठरवलं होत की तिच्यामध्ये बदल घडवून आणायचा असेल तर आपलं सुद्धा वागणं बदललं पाहिजे. ज्या पद्धतीने रडून, नाराज होऊन सर्वांना manipulate करायची कोणीही विरघळून जाईल. पण आता तिने अस काहीही केलं तरी आपण त्यावर react व्हायचं नाही अस सर्वांनी ठरवलं.
हे खरच आहे. आपल्या सर्वांची अपेक्षा असते की आपल्याला प्रत्यकाने समजून घेतलं पाहिजे, आपलं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे. आपण काहीही केल, आपल्याकडून काही चूक झाली, गोष्टी कमी जास्त झाल्या तरी समोरच्याने मात्र मला समजून घेतलं पाहिजे. हे सर्व सर्वांना वाटतच. पण हे कुठपर्यंत रास्त आहे? जोपर्यंत खरच आपल्याकडे काहीतरी असेल आपली बाजू मांडायला. अशी अनेक कुटुंब असतात जिथे मुलींना, बायकांना त्यांचं अस काही वेगळं अस्तित्व आहे हेच दाखवून द्यायला देत नाहीत.
ना कोणत्या गोष्टीत त्यांचं मतं घेतलं जातं, ना सल्ला. मग तो अगदी त्यांच्या मुलांच्या बाबतीत असला तरीही. इथे जर त्यांना वाटत असेल की काही प्रमाणात तरी मला माझ्या नवऱ्याने तरी समजून घ्यावं तर ते योग्य आहे. कारण आपण सर्व माणसं आहोत, आपल्याला मन आहे त्यामुळे अस वाटू शकत. आणि आपल्या जवळच्या व्यक्तीकडून तर वाटणारच आहे.
पण कोणत्याही गोष्टीची मर्यादा असतेच. त्याचप्रमाणे या गोष्टीला पण आहे. आपण अपेक्षा करण आणि अट्टाहास करण यात खूप फरक आहे. अपेक्षेमध्ये मला वाटत तास व्हायलाच पाहिजे असा आग्रह नसतो. पण अट्टाहासात मात्र तो असतो. मी काहीही केल तरी समोरच्याने व्यक्तीने मला समजून घ्यायलाच पाहिजे हा अट्टाहास आहे. जो चूक आहे. कारण यातून समोरच्या माणसाला आणि त्याच बरोबर आपल्यालाही त्रासच होतो.
आपली डिमांड जेव्हा पूर्ण होत नाही तेव्हा आपण त्या माणसाला काहीबाही बोलतो ज्यातून त्या व्यक्तीला पण दुःख पोचत आणि आपण स्वतः त्रागा करून घेतो ज्यामुळे आपलाच मुड खराब होतो. त्यामुळे ही डिमांड आधी कमी केली पाहिजे. काही गरज नसते दर वेळी प्रत्येकाने आपल्याला समजून घ्यायची. आणि अस होण शक्य पण नाही. कारण माणसं वेगळी आहेत, त्यांचे स्वभाव वेगळे आहेत. त्यामुळे त्यांनी कसं वागावं हे आपल्या हातात असू शकत नाही.
आपल्या घरातल्या लोकांचं आपल्यावर प्रेम असत म्हणून ते कदाचित आपल्याला आपल्या चुकीमध्ये देखील समजून घेतात. पण बाहेर; तिथे अस होण शक्य नसत. लोक आपल्याला समजून घेतलीच अस नाही. कामाच्या ठिकाणी तर ही शक्यता अजूनच कमी होऊन जाते.
त्यामुळे आपल्याला दर वेळी कोणीतरी समजून घेतल पाहिजे, पाठीशी घातल पाहिजे अस न म्हणता आपण कोणाला किती समजून घेतो? आपण दुसऱ्यांचा किती विचार करतो? याच देखील आत्मपरीक्षण केल पाहिजे. आता माझ्या अमुक एका गोष्टीसाठी मला कोणीतरी समजून घेतलं पाहिजे अस जर मी म्हणत असेन तर त्याच प्रसंगात दुसरा असता तर मी काय केलं असत? हा देखील विचार केला पाहिजे.
मुळातच जे विचार आपल्याला चुकीचं करायला लावत असतील, ज्यातून काही साध्य होत नसेल असे विचार तरी केले पाहिजेत का? की त्यांना थोड बदलल पाहिजे याच जर चिंतन केल तर आपल्याला उत्तर मिळेल. उत्तर आहे त्यांना बदललं पाहिजे. काय असेल विचार? तो असा असेल की “मला वाटत मला समजून घ्यावं, पण अस गरजेचच नाही की अस व्हायला पाहिजे.”
हे सर्व का करायचं आहे? कारण पहिली गोष्ट आपलं कोणावरही नियंत्रण नाही. आपल्या मनासारखं एखादी वेळी होऊ शकत एखादवेळी नाही होऊ शकत. त्यातून आपण किती त्रास करून घ्यायचा? कोणी कसा वागावं हे आपल्या हातात नाही. आपण काय करू शकतो? त्यांनी आपल्याशी नीट वागावं यासाठी चांगले प्रयत्न करू शकतो. ते कसे? तर आपला स्वभाव चांगला ठेवून.
आणि इतकं होऊनही आपल्याला हवं तस झालं नाही तरी it’s ok. आपण आग्रहच केलेला नसेल तर आपल्याला त्रास पण होणार नाही. आणि हाच याचा उद्देश आहे. आपल्याला inner success मिळवायचा आहे. तो तेव्हाच मिळणार जेव्हा आपले विचार आपलं वागणं flexible होणार. ते होत देखील. लागतो तो सराव.
