प्रत्येकाचं बालपण वेगळ्या प्रकारे घडलंय म्हणून सगळ्यांकडून एकसारखीच घडण्याची अपेक्षा करू नका.
हर्षदा पिंपळे
बालपण…वयाने मोठ्या झालेल्या प्रत्येकासाठी हा जवळचा आणि जादुई शब्द !
हल्ली,बालपण शब्द ऐकला तरी मनात एकीकडे चर्ं होऊन जातं तर एकीकडे मन सुखावतही.बालपण म्हणजे आयुष्यातील सुखाचा, आनंदाचा काळ असं आपण नक्कीच म्हणू शकतो.कारण बालपण म्हणजे खरचं एक वेगळं आयुष्य असतं.पण प्रत्येकाचं बालपण हे एकाच प्रकारे घडलेलं नसतं.प्रत्येकाचं बालपण हे वेगवेगळ्या प्रकारे घडलेलं असतं.कुणाचं अगदी सुखात,हसतखेळत तर कुणाचं बालपण रडतकुढत,दुःखात गेलेलं असतं.
एखाद्याला बालपणी हवीहवीशी सगळी सुखं ओंजळीत मिळतात. पण काहींना ती मिळवायलाच फार कष्ट घ्यावे लागतात.प्रत्येकालाच रिमोट कंट्रोल वाली कार मिळतेच असं नाही. आणि प्रत्येकालाच आंबट गोड चिंच,बोरं यांची मजा चाखायला मिळतेच असं नाही. कुणी मातीच्या भांडीकुंडीमध्ये आपलं बालपण खेळवत असतं तर कुणी त्या कारमध्ये.काहीजणांना केवळ काजू बदाम माहित असतात. त्यांना चिंच,आवळा या गोष्टी माहितच नसतात.
कुणाला इतरांचे कपडे वापरावे लागतात तर कुणाला थेट नवेकोरे कपडे मिळतात.आणि प्रत्येकालाच दोन वेळचं जेवण मिळतच असं नाही.काही जणांच बालपण हे अर्ध्या भाकरीवरही गेलेलं असतं.प्रत्येक व्यक्तीचं बालपण वेगवेगळ्या वातावरणात , छोट्या मोठ्या कुटूंबात घडलेलं असतं.
थोडक्यात सांगायचं झालं तर…प्रत्येकाचं बालपण हे वेगवेगळ्या प्रकारे घडलेलं असतं.आणि याची प्रत्येकालाच कल्पना असेल.पण अनेकदा याची कल्पना असूनही कित्येकजण सर्वांकडून पुढे जाऊन एखादी गोष्ट एकसारखीच घडण्याची अपेक्षा करतात.पण याला खरं तर काही अर्थ नाही.अपेक्षा करणं तसं चुकीचं नाही परंतु प्रत्येक व्यक्तीकडून एकसारखीच अपेक्षा करणं मात्र चुकीचं आहे.
कारण मुळातच प्रत्येक व्यक्ती सारखी नसते आणि प्रत्येकाचं बालपण हे वेगवेगळ्या प्रकारे घडलेलं असतं.त्यामुळे सगळ्यांनी सगळं एकसारखच करावं ही अपेक्षा करणं चुकीचं ठरू शकतं.
बेसिकली कशा अपेक्षा केल्या जातात याचा एक अंदाज घेऊयात.
◆सगळं खायला हवं.सगळ्या भाज्या खायला हव्यात. कोणतीही नाटकं नको…मिजास नको.
◆लहानपणी काय काजू बदाम मिळाले का…? नाही नं ? मग आता कशाला हवेत ?
◆लहानपणी नवीन कपडे सगळं नवीन मिळत होतं…मग आता एक दिवस नाही मिळालं तर काय होईल ?
◆बालपण सुखात गेलं मग एक दिवस काही मनासारखं झालं नाही तर काही बिघडतं का ?
◆तुम्हाला सगळ्या गोष्टींची जाणीव असायलाच हवी.लहानपणी काही मिळालं नाही तर त्याची जाणीव असायलाच हवी.
◆सगळं मिळालं नं ? मग त्याची थोडीफार तरी जाण हवी नं ?
◆तुला सगळं मिळालं तर तु आता सगळं करायला हवं होतं.तुझं करिअर, नोकरी या गोष्टी तु नीट करशील अशा अपेक्षा आहेत. असही आजपर्यंत तुला कुठलीच गोष्ट कमी केली नाही.
वगैरे वगैरे. एक उदाहरण म्हणून या छोट्या छोट्या अपेक्षा.तर अशा अनेक प्रकारच्या छोट्या मोठ्या अपेक्षा आपण सर्वांकडून करत असतो.पण या अपेक्षा कशा बरं पूर्ण होतील ?
दोन वेगळ्या लोकांच बालपण वेगवेगळ्या वातावरणात घडलेलं असतं याचा आपण विचार का करत नाही ? पूर्ण बालपण रोज काजू बदाम ,सगळं पौष्टिक खाण्यात गेलेलं असेल तर त्या माणसांकडून आत्ता साधं खाण्याची आपण सहसा अपेक्षा करू शकत नाही. एखाद्या माणसाला घरातील वातावरणामुळे लहानपणापासूनच सगळ्या गोष्टींची जाणीव असू शकते.
परंतु तीच जाणीव एखाद्या माणसाला नसूही शकते याचा आपण विचार करणं आवश्यक आहे.प्रत्येक माणसाकडून त्याच जाणीवेची अपेक्षा करणं काही योग्य वाटत नाही.प्रत्येकजण हा वयापेक्षा अनुभवाने जास्त समजूतदार होत असतो असं म्हणतात. आणि त्यात नाकारण्यासारखं काही असावं असं वाटत नाही.
बालपणी प्रत्येकाचे अनुभव हे वेगवेगळे असतात. कुणाचं छत्रच लहानपणी हरवतं तर कुणी एखाद्या एकत्रित कुटुंबात रहात असतं.त्यामुळे साहजिकच प्रत्येकावर होणारे संस्कार, प्रत्येकाचे अनुभव, खाण्या-पिण्याची,वागण्या-बोलण्याची शैली ही निश्चितच वेगळी असते.त्यामुळे सगळ्या व्यक्तींकडून सगळ्या गोष्टींची समान अपेक्षा करणं कितपत योग्य आहे याचा जाणीवपूर्वक विचार नक्की करायला हवा.
एकवेळ जी व्यक्ती जशी घडली तशी तिच्याकडून अपेक्षा करू शकतो परंतु ज्या व्यक्तीला एखाद्या गोष्टीची कणभरही कल्पना नसेल तर त्या व्यक्तीकडून तशी अपेक्षा करणं मुळातच चुकीचं ठरू शकतं.
म्हणून, एकच गोष्ट आपण लक्षात ठेवायला हवी. प्रत्येकाचं बालपण हे वेगळ्या पद्धतीने घडलेलं असतं.त्यामुळे पुढे जाऊन त्यांच्याकडून एकसारखी अपेक्षा करणं काही चांगलं नाही.
आपण तशा अपेक्षा करायलाच नको.त्यापेक्षा जे आहे ते स्वीकारून पुढे जायला हवं.
“तुला या गोष्टीची जाणीव आहे नं ? मग मी केवळ याच गोष्टीची तुझ्याकडून अपेक्षा करतो.बाकी मला काही नको.” असं थोडं आपण समजून उमजून घ्यायला हवं.
काय कळतय नं ?
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

