प्रत्येक माणूस सुख आणि समाधानाच्या शोधात असूनही शेवटी तो अस्वस्थच का राहतो ?
गीतांजली जगदाळे
जगी सर्व सुखी असा कोण आहे ,
विचारे मना तूच, शोधूनि पाहे .
समर्थ रामदासांच्या मनाचे श्लोकांमधील हा श्लोक सुपरिचित आहे . जगात सर्व सुखी कोण असू शकतो ? याचं उत्तर अजून तरी कोणाला मिळालेलं नाही . पण सुखाचा शोध घेणारं कोणी आहे का असं विचारलं, तर आपण सगळेच सुखाचा शोध घेतोय, असं उत्तर आपल्याला मिळेल .
सुख आणि समाधानाची एखादी जगतमान्य व्याख्या असती तर सुख आणि समाधान शोधणं जरा तरी सोप्प झालं असतं , नाही ? पण सुख आणि समाधान शोधून सापडण्यासारखं आहे का ? तर उत्तर आहे ‘हो’ . ते शोधून मिळण्यासारखं आहे पण जरा योग्य ठिकाणी शोधण्याची गरज आहे . आपण जी गोष्ट जगभर शोधत फिरतो , विविध ध्येय ठरवून त्यासाठी कष्ट करतो , आणि ती मिळवतो देखील , पण तरीदेखील म्हणावं तसं सुख आणि समाधान मात्र आपल्याला मिळत नाही . त्यातून क्षणिक सुख नक्कीच अनुभवतो. आपण क्षणिक सुखाच्या शोधत नसून , निरंतर काळ टिकेल असं सुख आणि समाधान आपल्याला हवं असतं .
सुख आणि समाधानाची व्याख्या करणं तर अवघड आहे . पण आजकाल माणसे महागड्या वस्तूंमध्ये , चैनीमध्ये , पैशांमध्ये सुख आणि समाधान शोधताना दिसतात. आणि हेच त्यांच्या अस्वस्थतेमागचं कारण आहे. चुकीच्या ठिकाणी एखाद्या गोष्टीचा शोध घेतल्यास ती मिळणं कठीण असतं, जवळपास अशक्यच असतं. आणि ते शोधण्यामध्ये एवढे कष्ट केलेले असतात की,ते न मिळाल्याने खूप निराशा पदरी येते आणि खूप अस्वस्थ ही वाटतं.
पैसा ही आपली गरज आहे , पण पैशाने सुख आणि समाधान विकत घेता येत नाही . पैशाने अशा वस्तू विकत घेता येतात ज्या आपल्या बेसिक गरजा भागवतात . बेसिक गरजा भागल्या नाहीत तर सुख आणि समाधान मिळत नाही, पण त्या भागल्याने देखील सुख आणि समाधान मिळेल याची शाश्वती देता येत नाही. काही लोकांना सामाजिक प्रतिष्ठा , किंवा आपल्याला इतर लोक काय समजतात याने ही सुखाची-समाधानाची अनुभूती होते असं वाटतं. म्हणजे जर लोकांनी त्यांचा आदर केला तर ते समाधानी राहतील असं त्यांना वाटतं. याने समाधानी वाटतं ही, नाही असं नाही.पण फक्त तेवढीच एक गोष्ट पुरेशी नसते .
आपण स्वतःचा आदर करतो का आपल्याला स्वतः बद्दल काय वाटतं यावर ते समाधान टिकणं न टिकणं अवलंबून असतं. दिखावा करण्याची सवय ही काही लोकांना असते , मग तो पैशाचा दिखावा असो वा काही इतर गोष्टींचा . पण मुळातच ही भावना चांगली नाही. आपली स्पर्धा ही आपल्याशीच असावी , तेव्हाच आपल्याला सुख आणि समाधान सहजरित्या मिळू शकतं . इतरांशी तुलना करण्यात आपण सुख, समाधान या भावनांपासून फार दूर जातो आणि ईर्षा , द्वेष अशा भावना आपल्याला येऊन चिकटतात . आपण जगात एकटे येतो आणि जाताना ही एकटे जातो . आपलं आयुष्यं , त्यातले सुख-दुःखाचे क्षण , प्रॉब्लेम्स , challenges सगळंच इतरांपेक्षा वेगळं असतं, त्यामुळे तुलना करण्याचा संबंध तरी येतो का?
खरंतर माणूस हा, अमुक एक गोष्ट मिळाली की मी खूप खुश होईल , तमुक एक गोष्ट पार पडली की मला खूप समाधान मिळेल असं म्हणत राहतो . पण वास्तवात मात्र एका गोष्टीची पूर्तता ही दुसऱ्या गोष्टीच्या इच्छेचा आरंभ असते . असं करत -करत माणसाच्या इच्छा कधी संपत नाहीत ,आणि सुखं -समाधानाचा शोध वस्तूंपुरताच मर्यादित राहतो . कितीही कामे पार पडली आणि कितीही काही मिळालं तरी सुख आणि समाधानाची जागा मात्र रिकामीच राहते.या शर्यतीत माणूस स्वतःच्या अंतःकरणात डोकावून पाहायला सुद्धा विसरतो .
खरा आनंद , सुख आणि समाधान कशाने मिळू शकेल हे त्याला पैशांशिवाय अगदी फुकट स्वतःच्या आत डोकावून पाहिल्यावर सहज मिळू शकेल . पण तो त्या गोष्टी जगातल्या भौतिक सुखांमध्ये शोधू लागतो . आणि कितीही शोधलं , तरी सुख आणि समाधानाला तो पारखाच राहतो . आपण कितीही सामान्य माणूस असलो किंवा श्रीमंत जरी असलो , तरी समाधान किंवा शांती मिळण्यासाठी आपले विचार सकारात्मक असणं आवश्यक असतं . तसेच दुसऱ्याला निस्वार्थीपणाने केलेली मदत नेहमी निरंतर सुखाचा अनुभव देते .
दुःखाचे प्रसंग सर्वांवर येतात . मग माझ्याच वाट्याला हे दुःख का , असे वाटणाऱ्यांचे सांत्वन करणे कठीण , ते ज्याचे त्यानेच करायचे . जीवनाकडे आणि जगाकडे उघड्या डोळ्यांनी पाहायची सवय केली ,थोडे अंतर्मुख होता आले की हे सुखं -दुःखं , समाधान , शांतीचे तत्वज्ञान बसवता येते . जन्म , बालपण, शिक्षण , कुटुंब , मित्रमैत्रिणी , इच्छा, नौकरी , लग्न , मुले , त्यांचे संगोपन , म्हातारपण आणि मृत्यू या व्यतिरिक्त आपण आयुष्याचा वेगळा विचार करतो का ? या सर्व गोष्टी आयुष्याचे महत्वाचे भाग आहेत .
पण संपूर्ण आयुष्यं म्हणजेच हे का ? याचा विचार आपण करतो का ? सगळं सुरळीत असताना मधेच काहीतरी संकट का येतं ? आयुष्यं सुरु झाल्या -झाल्या लहान -लहान संकटांपासूनच त्याची सुरुवात झालेली असते . लहान असतो तेव्हा लहान संकटांना तोंड द्यावं लागतं . त्याचप्रमाणे मोठे झाल्यावर आपल्या आवाक्यानुसारचं संकटे येऊ लागतात . पण ती आपल्याला आपल्यापेक्षा नेहमीच मोठी वाटतात . पण ही संकटे येतातच का ? याचा विचार आपण करतो का ? संकटे नको , प्रॉब्लेम्स नको असं म्हणाल्याने ते येणं बंद कधीच होत नाही . पण तेच आपण ‘right spirit ‘ ने हाताळायला लागलो , संकटांकडे फार सिरिअसली न पाहता , काय यायचं ते येऊदेत, मी माझं १०० % देऊन त्याचा सामना करेन , अजिबात हार मानणार नाही असं म्हणून त्याचा सामना केला तर नक्कीच आपल्याला त्यातूनही सुख आणि समाधानाची प्रचिती येईल .
ते म्हणतात ना शेवटी सुख हे मानण्यात असतं . हा formula प्रत्येकाला जमेलच असं नाही . पण प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे . आयुष्यभर प्रॉब्लेम्ससाठी आपण जेवढं रडतो , तेवढा आनंद चांगल्या गोष्टींचा कधीच लक्षात राहत नाही . आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलता आला तर ? जरा आपल्या आजूबाजूच्या लोकांकडे थोडया वेगळ्या दृष्टिकोनातून बघा , त्यांचे प्रॉब्लेम्स , त्यांची संकटे , त्यांची जीवनशैली , त्यांचे आचार -विचार इत्यादीचे निरीक्षण करा, अगदी कोणत्याही judgemet शिवाय ….
या सर्व गोष्टींनी आपल्याही जीवनात खूप फरक पडलेला तुमच्या लक्षात येईल . आपल्याला मिळालेल्या चांगल्या गोष्टींची नव्याने जाणीव होईल , खरंच आपण किती सुखी -समाधानी आहोत याची नव्याने ओळख होऊन छान वाटेल . सुख , समाधान , दुःख या आणि अशा इतर अनेक भावना , permanently वास्तव्यास आणणं खरंच कठीण आहे . त्यासाठी खरंच साधू -संतांएवढी घोर तपश्चर्या करावी लागेल .
कारण छोट्या- छोट्या गोष्टींमध्ये आनंद मानणारी , आणि त्यांचं दुःख ही होणारी अशी साधी माणसे आपण . सुख आणि समाधान नेहमीच अनुभवणं म्हणजे किती मोठी तपश्चर्या करावी लागेल , नाही ? पण एक मात्र आपण नक्कीच करू शकतो . ते म्हणजे जास्तीत जास्त वेळ हे सुख आणि समाधान आपल्याजवळ कसं राहील , आणि कधी परत हरवलंच तरी ते स्वतःहून येईल अशी वाट त्याला कशी करून देता येईल , याबद्दल आपण काहीतरी करू शकतो .
आणि ते म्हणजेच जरा चाकोरीबद्ध आयुष्यं सोडून त्याचा वेगळ्या पद्धतीने विचार करणे , स्वतःकडे असणाऱ्या चांगल्या गोष्टींची स्वतःला आठवण करून देणे , त्याबद्दल आभार मानणे . मग निरोगी शरीर आणि मनापासून ते रोजच्या मिळणाऱ्या दोन वेळच्या जेवणापासून ते आपल्या जवळच्या , आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांपर्यंत सगळ्याच गोष्टी यात येतील .
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
