प्रत्येक अस्वस्थ व्यक्तीने स्वतःच्या मनात एकदातरी डोकावून पहावं.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“जा ग रिया नको बर त्रास देऊ मला! आधीच मला काही कमी त्रास आहे का? जा बाहेर जाऊन खेळ.” मनीष जरासा वैतागुनच बोलला. त्यावर रिया हिरमुसली. ती तशीच आईकडे जाऊन बोलू लागली. “आई बघ ना, बाबा कसा करतो, मी त्याला खेळायला बोलवते तर तो येतच नाही आणि मलाच ओरडतोय बाहेर जा म्हणून. तु सांग ना त्याला. परवा पण त्याने तसच केल. तो हल्ली माझ्यासोबत खेळत पण नाही आणि नीट बोलत पण नाही.” शेवटचं वाक्य बोलताना रियाच्या डोळ्यात पाणी तरळून गेलं. आरतीला पण हे समजत होत. पण ती तरी काय बोलणार होती, काय सांगणार होती रियाला.
काही प्रश्नांची उत्तरं तिला स्वतः लाच अजून मिळाली नव्हती. तिला गप्प राहिलेले पाहून रिया तिचा हात ओढू लागली व म्हणाली, “आई बोल ना! बाबा का अस करतोय?” त्यावर आरती म्हणाली, “रिया अग बाबाला हल्ली खूप काम असत ना म्हणून तो दमतो, तू कशी शाळेतून आल्यावर कधी कधी दमतेस तसच तो दमतो. म्हणून येत नाही. तु आता एक काम कर बाहेर जाऊन खेळत बस. बाबा फ्री झाला ना की येईल हा!” रिया जरा खुलली व म्हणाली, “ओके. मी जाते खेळायला, बाबा बाहेर आला की त्याला पाठव.” बोलत बोलत ती बाहेर खेळायला निघून सुद्धा गेली.आरती मात्र तिथेच बसून विचार करू लागली. हल्लीच्या हल्ली मनीष मध्ये बदल तर जाणवत होता. सारखा अस्वस्थ दिसायचा. दिवसभर कामात असतो, त्याचा ताण असू शकतो हे सर्व मान्य;
पण अशी कोणती गोष्ट होती जो तो तिला सांगू शकत नव्हता. मुळातच त्याचा स्वभाव काही फार मनमोकळा, झालेले सर्व सांगावं, शेअर करावं असा नव्हता. तरी आताची त्याची चिडचिड, चेहेऱ्यावर असलेला उदासपणा मात्र हल्लीच जाणवू लागला होता. काही विचारायला गेलं तर नीट बोलायचा देखील नाही. एकच म्हणण, मला डिस्टर्ब करू नको, एकट सोड. बर त्याचा फार कोण मित्रपरिवार नसल्याने विचारायची पण सोय नव्हती, की नेमक झालय काय? त्याच्या अश्या वागण्याचा अर्थातच बकीच्यांवर परिणाम होतच होता.
आरतीला त्याची ही अवस्था पाहवत नव्हती, तिला वाईट वाटत होत की आपला नवरा कसल्यातरी त्रासात आहे आणि आपण मात्र त्याच्यासाठी काही करू शकत नाही. त्यात तो रिया शी पण नीट वागत नव्हता त्यामुळे तिला अजून त्रास होत होता. कारण या सगळ्यात विनाकारण मुलगी फरफटली जात होती. आणि आज तर तो तिच्याशी नीट बोलला पण नाही.
तिने ठरवलं एकदाच काय ते मनीषला विचारावं. अस काय आहे की जे त्याला इतकं अस्वस्थ करतय? ज्यामुळे तो आपल्याशी, आपल्या मुलीशी नीट बोलत नाहीये. ती खोलीत गेली तेव्हा तो एकटाच कसल्यातरी विचारात असल्यासारखा बसला होता. आरती आत गेली व तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने दचकून बाजूला पाहिले व आरतीला पाहून परत आपल्या विचारात हरवला. ती त्याच्या बाजूला बसली व त्याला विचारलं, “मनीष काय झालं? कसल्या विचारात आहेस?” त्यावर त्याने नकारार्थी मान हलवली. तिला समजत होत की तो आजही काही बोलणार नाही, तरी ती प्रयत्न करत होती. ती पुढे बोलू लागली, “रिया आली होती तुला खेळायला बोलवण्यासाठी पण तू गेला नाहीस. बर वाटत नाही का?” त्यावर तो फक्त ठीक आहे मी इतकंच बोलला.
आरतीला पण आता असह्य होत होतं. हे अस किती दिवस चालणार होत? एका घरात राहून एकमेकांना अनोळखी असल्यासारखे ते वागत होते. किंबहुना मनीष तशी वागणूक देत होता. जेवढ्या तेव्हढ बोलण, एकटच राहणं. कुटुंबात हे अस वागणं अपेक्षित नव्हत. तिने शेवटी विचारलेच, “मनीष का वागतोय तु असा? इतकं काय झालं आहे की आपण एका घरात राहूनही वेगळे राहतोय? तुला काही त्रास वाटत असेल, काही प्रोब्लेम असेल तर मला सांग ना!
आपण मिळून तो सोडवायचा प्रयत्न करू. असा एकटा का कुढत बसतोस? यातून तुलाच त्रास होणार आहे. बोल माझ्याशी काय झालंय ते सांग मला.” इतका वेळ गप्प बसलेला मनीष उठला व बोलू लागला पण रागाने. “तुझ्या बोलण्याचा, या बडबडीचा त्रास होतोय मला समजलं. एक मिनिट शांत बसत नाही तू आणि ती रिया. बाहेर कामावर ती लोक मला त्रास देतात घरी तुम्ही दोघी. आणि तुला काय सांगायचा माझा त्रास? तु कोण आहेस की जी माझा त्रास एका झटक्यात दूर करशील? देवदूत आहेस का? आणि मी इतका पण कमकुवत नाही की मला तुझी मदत घ्यावी लागेल. माझा मी समर्थ आहे.
तुझी काहीही मदत मला नको. कृपा करून बाहेर जा आणि मला एकट सोड.” जोरात हात जोडून आणि तिच्यावर ओरडत मनीष म्हणाला. आरती रडत रडत तिथून निघून गेली. तो तसच परत खुर्चीवर बसला. दोन मिनिटे गेल्यावर त्याला समजलं की त्याच्याही नकळत तो आज आरतीला खूप काही बोलून गेला होता. तो जिथे काम करत होता तिथे काहीतरी घोटाळा झाला होता आणि त्यात मनीषच नाव गोवल गेलं होत. मिळून मिसळून राहायचा याचा स्वभावच नसल्याने मदतीला पण कोण आल नाही. फक्त काम आणि आपण इतकंच त्याच्या नजरेसमोर असायचं.
कामात तो प्रामाणिक होताच पण फसवाफसवीची काम पण ती करत नसे. आणि हेच बऱ्याच जणांना खपत नव्हत. एरवी त्याच्याबदल काही बोलण्यासारखं नव्हत मग त्याला अश्या कोणत्यातरी गोष्टीत अडकवून त्याच नाव खराब करता येईल म्हणून त्याला यात गोवल गेलं. पण त्याला देखील माहीत होत त्याने अस काहीच केलं नाही. पुरावे गोळा करायला त्याच्या बाजूने कोणीच नाही. या सर्व गोंधळामुळे तो गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थ होता. पण त्याच्या या त्रासात तो घरातल्यांशी कसा वागत होता याचा त्याने विचारच केला नाही.
आज आरतीशी अस बोलल्यावर पहिल्यांदा त्याने स्वतःच्या मनात डोकावून पाहिले. मान्य आहे आपल्या सोबत चुकीचे होत आहे. पण यात आपल्या बायकोची, आपल्या मुलीची काय चूक होती. आरती तर पहिल्यापासून आपल्याला येऊन विचारत होती पण आपणच तिला आपली मदत करू दिली नाही, खोट्या अहंकारात आपण राहिलो की सर्व काही माझं मी सांभाळू शकतो. पण काय झालं? गोष्टी अजूनच बिघडत गेल्या. समोरचा माणूस आपलं दुःख हलक करू शकतो हे माहीत असून आपण त्याला आपल्या जवळ येऊ दिलं नाही.
आणि रिया तिच्याशी कसा वागलो मी? तिला तर यातल काही समजत देखील नाही. माझ्या त्रासात मी विनाकारण त्या दोघींना ओढल. कुटुंब म्हटल्यावर बोलण पाहिजे, एकमेकांसोबत सुख, दुःखात राहण पाहिजे ही गोष्ट आपल्या कधीच कशी लक्षात आली नाही? इतके दिवस मला वाटत होत की माझ्यासोबत कोणी नाही, ही समस्या मी एकटीच सोडवली पाहिजे, पण अस नाही. माझं कुटुंब माझ्यासोबत आहे आणि त्यांच्या मदतीने नक्की मी यातून बाहेर पडेन. आज मनिषला काहीतरी उमगल होत, जे शक्य झालं स्वतःच्या आत डोकावून पाहिल्यावर, आता तो बाहेर चालला होता, आरतीची माफी मागायला आणि रियासोबत खेळायला.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

खूप छान …..नवरा बायको आणि संसार म्हंतल की या सगळ्या गोष्टी आल्याचं …..पण शेवटी काय तर संवाद महत्वाचा