पार्टनरला कधीतरी आपली पण काही चूक झाली आहे का हा प्रश्न विचारला पाहिजे.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“प्राची अग कितीवेळ झालाय तुला कॉल करतोय. आहेस कुठे? नेमक महत्त्वाचं काहीतरी काम असल तर जागेवर नसतेस. माणूस इतक्या वेळा कॉल करतोय म्हटल्यावर अर्जंट काहीतरी असू शकत इतकी साधी गोष्ट तुला समजत नाही का?” यश जवळजवळ प्राचीवर ओरडलाच. पण ती शांत होती. तिला हे सवयीचं झाल होत. घरात, बाहेर काहीही झालं तरी बॉम्ब फुटायचा तो प्राचीवरच. काहीही झालं तरी तिची चूक. तिचं बोलणं तो ऐकून घेतच नसे.
आता पण तो बोलून बोलून शांत झाला तेव्हा प्राची बोलू लागली. “तुझ ओरडुन झालं असेल तर माझं ऐकशील का? मी किचन मध्ये काम करत होते त्यामुळे मला फोन आलेला ऐकू आला नाही. जेव्हा तुझी मिस कॉल पाहिले तेव्हा मी लगेच कॉल केला.” त्यावर परत यश ओरडला, “ही तुझी नेहमीची कारण आहेत. आधी चुका करायच्या आणि नंतर त्याची कारण द्यायची.” त्यावर प्राची म्हणाली, “ठीक आहे मी नाही उचलला कॉल. पण आता बोलते आहे ना!
आता सांग ना इतकं काय होत महत्त्वाचं म्हणून एकसारखे फोन करतो आहेस?” प्राचीने अस विचारल्यावर त्याला आठवलं की आपण काहीतरी विचारायला कॉल केला होता. त्याने परत सुरू केलं, “बघ तुझ्या या बोलण्यात मी मुख्य मुद्दा विसरून गेलो. माझी आता थोड्याच वेळात एक मीटिंग आहे. आणि मी फाईल घरी विसरलोय बहुतेक. पटकन ती शोध आणि मला आणून दे.” प्राचीने फाईल कोणत्या कलरची होती अस विचारल्यावर तो म्हणाला, “अग निळ्या कलरची फाईल आहे. जरा बघ लगेच.” फाईलच वर्णन सांगितल्यावर प्राचीला आठवलं की त्याने ती फाईल बॅग मध्ये घातली होती. ती लगेच बोलली, “अरे तू ती फाईल बॅग मध्ये ठेवली आहेस सकाळीच. मी पाहिलं तुला ठेवताना.
तु बॅग मध्ये पाहिलं का?” यश आधीच ती फाईल मिळत नव्हती म्हणून वैतागला होता. बॅग त्याने चेक केली होती पण त्याला काही फाईल मिळाली नव्हती. त्यात प्राची अस बोलल्यावर तो परत भडकला. “प्राची बॅग मध्ये जर फाईल असती तर मी का कॉल केला असता तुला? तु मला मूर्ख समजते का? सांगतोय ते कर ना! का माझा वेळ वाया घालवते? एकतर तूच माझ्या वस्तू सफाईच्या नावाखाली इकडून तिकडे करून ठेवते. आणि मग असा गोंधळ होतो.”
प्राचीला माहीत होत की वाद घालून काहीही होणार नाही. म्हणून ती फाईल शोधायला तयार झाली. यशने सुद्धा फोन ठेवला आणि परत एकदा बॅग पाहू म्हणून हातात घेऊन सर्व काढून पाहू लागला. त्यात एक पिशवी होती. जेव्हा त्याने त्यात हात घालून चाचपले तेव्हा त्याच्या हाताला फाईल सारखच काहीतरी लागलं. काढून पाहिल्यावर त्याने स्वतःच्या डोक्यावर हात मारला. कारण ही तिच फाईल होती जी यश इतका वेळ शोधत होता आणि जिच्यासाठी तो आता विनाकारण प्राचीला ओरडला होता.
तोच खरतर विसरला होता आणि ओरडा मात्र प्राचीला बसला. पण आता सांगणार तरी तस? आपली चूक आहे म्हटल्यावर त्याला काय बोलायचं हे सुचेना. इकडे प्राची फाईल शोधत होती. तिला खात्री होती की यशने फाईल बॅग मध्ये ठेवली होती. पण त्याच्या आग्रहाखातर ती शोधत होती. शेवटी कितीही शोधून ती मिळेना तेव्हा तिने कंटाळून यशला कॉल लावला व म्हणाली, “यश अरे मी सगळीकडे शोधली पण मला मिळाली नाही. तु जरा परत एकदा बॅग मध्ये पाहा ना!”
आता यशला सांगण्यावाचून पर्यायच नव्हता. तो प्राचीला म्हणाला, “ठीक आहे मला मिळाली फाईल. होती बॅग मध्ये. ती आधीच मिळाली असती पण तुझ्यामुळेच झालं.” प्राचीला आश्चर्य वाटलं, “अरे मी काय केलं?” त्यावर यश म्हणाला, “मग काय सकाळी किती बडबड चालू होती तुझी. त्यामुळे माझ्या लक्षात राहील नाही मी फाईल एका पिशवीत घालून ठेवली ते. असुदे आता माझी मीटिंग आहे. ठेवतो मी अस म्हणून यशने फोन ठेवला सुध्दा.” प्राची हसली व तिच्या कामाला निघून गेली. हे सर्व तिच्यासाठी नेहमीच झालं होत. यश स्वतः काहीतरी करून ठेवत असे आणि तिच्यावर त्याचा राग काढत असे.
काहीही झालं तरी त्यात तिचीच चूक आहे अस त्याला वाटे. सुरुवातीला प्राचीला त्याच्या या स्वभावाचा खूप त्रास व्ह्यायचा. ती त्याला म्हणायची देखील, तू स्वतःच वागणं न पाहता सरळ सरळ मलाच कसं बोलतोस? आधी नेमक काय झालंय ते पाहत तरी जा! पण तिच्या या बोलण्याचा त्याच्यावर काहीही परिणाम होत नसे. त्याच एकच काहीही झालं तरी प्राचीची चूक. बर जेव्हा त्याला समजायचं की आपणच काहीतरी गोंधळ घातला आहे तेव्हा तो तिला साधं सॉरी देखील म्हणत नसे. त्याला तो कमीपणा वाटत असे. प्राचीला वाईट वाटायचं ते याचच. माणूस आहे म्हटल्यावर चूक होऊ शकते हे तिला पण समजायचं.
पण निदान जर आपली चूक आपल्या लक्षात येत आहे तर ती स्वीकारावी अस तिला वाटायचं. पण यश ते देखील करत नसे. आता या सर्व गोष्टी तिच्या सवयीच्या झाल्याने तिला त्याच फारस काही वाटत नसे. पण यामुळे यशला तिला गृहीत धरायचा स्वभाव अजून वाढला. इथे यशचा स्वभाव असा असला तरी प्राची समजूतदार होती म्हणून हे नात चांगल टिकलं होत. पण सगळीकडे अस होइल अस नाही.
छोट्या मोठ्या गोष्टीवरून एकमेकांच्या चुका काढण हे नवरा बायकोमध्ये होतच असत. पण अनेकदा अस होत की तूच कशी चूक आहेस किंवा तूच कसा चुकीचा आहेस हे दाखवण्यावर जास्त भर असतो. प्रत्यक्षात अस घडलेलं असेलच अस नसत. अशी अनेक जोडपी असतात ज्यामध्ये कोणा एकावरच सारखं दोषारोपण चालू असत.
पण इथे आपली पण काहीतरी चूक झालेली असू शकते हा आपण विचार करत नाही. जो केला पाहिजे. आणि झालेली चूक समजली तरी ती स्वीकारली जात नाही कारण चूक स्वीकारणं म्हणजे नवरा किंवा बायकोला शरणागती पत्करल्यारख वाटत. पण अस आहे का? नाही! चूक मान्य केल्याने कोणी लहान होत नाही. उलट त्यातून नात सुधारत, वाद विवाद कमी होतात. दोन व्यक्ती एकत्र आल्यावर छोटी मोठी भांडण होतातच आणि त्यातच मजा असते.
पण ती कोणत्या मर्यादेपर्यंत ठेवायची हे आपल्या हातात असत. समोरचा ऐकून घेतो म्हणून त्याला गृहीत धरून एकसारखं बोलत राहील तर एका टप्प्यानंतर नात्यात दुरावा येऊ शकतो. म्हणूनच नात्यात चार पावलं पुढे जायचं असेल तर कधी कधी आपली चूक मान्य करून दोन पावलं माघार पण घेतली पाहिजे. चूक भूल द्यावी घ्यावी अस म्हणून संसार केला तर तो टिकतो.
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
