Overthinking हे नसलेल्या समस्यांची निर्मिती करतात.
काव्या धनंजय गगनग्रास
(समुपदेशक)
“सुधा अग किती काळजी करतेस? वाटेत कुठेतरी अडकले असतील ते म्हणून फोन लागला नसेल! जरा एकाजागी शांत बस. मिहिर स्वतःहून करेल फोन. तू नको काळजी करू, हे घे पाणी पी.” गिरिशराव सुधाला समजावत होते. “अहो, अस कस म्हणता तुम्ही? काळजी वाटल्याशिवाय कसं राहील? मुलं इतक्या लांबच्या प्रवासाला गेली आहेत. मिहिरचा एक फोन लागत नाही, पण दिशाचा पण लागू नये. अस कस काय होईल? २ पर्यंत ही दोघंही शकू कडे पोहोचायला हवी होती. आता वाजले बघा किती? चार! शकुला फोन लावला तर ती म्हणत्ये तिचा फोन देखील उचलला जात नाहीये. काय करायचं आता सांगा?” सुधा खूप टेन्शन मध्ये येऊन बोलत होती.
शकू म्हणजे शकुंतला, ही सुधाची धाकटी बहीण. मिहिर आणि दिशाच लग्न झालं तेव्हापासून ती त्या दोघांच्या मागे लागली होती की आमच्या घरी येऊन जा, येऊन जा. शकुंतलाला मुल बाळ नव्हते. तरी तिला त्याची कधी उणीव भासली नाही. अगदी स्वतःच्या मुलाप्रमाणे तिने मिहिरला सांभाळलं होत. तिच्या समोर तो मोठा झाला होता. त्यामुळे तिचा मिहिरवर खूप जीव होता. त्यावेळी ती दोघंही एकाच शहरात राहत होती. मिहिरची पण ही लाडकी मावशी होती. लहानपणी तो तिच्या मागे माशी माशी म्हणत पळायचा. ती सवय तशीच राहिली आणि पुढे मोठ झाल्यावर देखील तो तिला शकू माशीच म्हणू लागला.
पुढे शकू मावशी आणि तिचे मिस्टर दुसऱ्या शहरात राहायला गेले. भेटणं पण कमी झाला आणि मिहिर पण आता शिकून कामाला लागला होता. त्याच्या लग्नाच्या वेळी मात्र ती त्यांच्याकडे येऊन राहिली होती. तेव्हापासून तिचं एकच म्हणणं होत लग्न झाल्यावर आमच्याकडे राहायला यायचं. मला माझ्या सुनेचे आणि मुलाचे सर्व लाड करायचे आहेत. पण काही ना काही कारणाने ते राहून जात होत. त्यात आता शकू मावशीची तब्येत पण जरा खालावली होती. सारखी मिहिरची आठवण काढत बसायची. म्हणून मिहिरने विचार केला की आपण गेल्यावर माशीला बर वाटेल आणि आपल्यासोबत तिचा छान वेळ जाईल, तब्येत पण जरा बरी होईल. असा विचार करूनच ती दोघं आज जायला निघाली होती. पण ज्या वेळेत जायला पाहिजे ती वेळ निघून गेली तरी ती दोघं पोहोचली नव्हती. त्यात फोन लागतं नव्हता. मिहिरचे बाबा तसे शांत आणि संयमी स्वभावाचे होते. कोणतीही गोष्ट झाली तरी ते गोष्टी शांततेने हाताळत.
पण याउलट सुधा म्हणजे मिहिरची आई होती. कोणत्याही गोष्टीवर अतिविचार करण आणि उगाच टेन्शन घेत बसणं या तिचा स्वभावधर्म होता. जरा काही मागे पुढे झालं की तिच्या विचारांची गाडी धावायला लागे. तिला स्वतः ला या गोष्टीचा त्रास तर होईच. एकसारखं विचार करून डोकं दुखे, दुसऱ्या कोणत्याही गोष्टीत मन लागत नसे. तेच तेच परत बोलत राहायचे, कोणतेही अंदाज लावायचे. यातून स्वतःला त्रास करून घ्यायचा आणि दुसऱ्याला पण स्वस्थता मिळायची नाही. कशी मिळणार? तिला टेन्शन मध्ये पाहून बाकीच्यांना पण बर वाटत नसे.
मिहिर लहान असताना अशीच एक गोष्ट झाली होती. त्याला शाळेत न्यायला आणि घरी सोडायला रिक्षा येत असे. एक दिवस असच त्याला शाळेतून यायला वेळ झाला. तर सुधाने अख्ख घर डोक्यावर घेतलं. गिरीषराव ऑफिस मध्ये होते तर त्यांना फोन केला. त्यांनी खूप समजूत घातली, रिक्षावाल्याला फोन करायला सांगितलं पण तिने काही ऐकले नाही. शेवटी तेच घरी आले. शेवटी रिक्षा आली आणि तेव्हा समजलं की शाळेतच मुलांना थांबवून घेतल होत. पुढच्या महिन्यात gathering होत. त्याच्या सूचना देण्यासाठी मुलांना थांबवलेले होत. उशीर तरी किती झाला होता तर फक्त अर्धा तास. तरी शाळा सुटल्यानंतर रिक्षावाल्याने सर्वांना लवकर गाडीत बसवून सोडायला सुरुवात केली. मिहीरचे घरचं शेवटचे असल्याने त्याला जास्त वेळ लागला. पण अस काही होऊ शकत, एखादवेळी शाळा उशिरा सुटू शकते हा विचारच सुधाने केला नाही. मुलाच्या बाबतीत अस होऊ शकत म्हटल तर ती बहुतेक सर्वच गोष्टीत अस करायची.
अतिविचार करून टेन्शन घेणे हा तिचा स्थायीभाव होता. आपल्याला वाटत त्याहून वेगळ काहीतरी, कधीतरी घडू शकत हेच तिला पटत नसे. मिहिर आणि गिरीष तिला खूप समजावयाचे. पण तिच्यावर त्याचा काहीही परिणाम व्हायचा नाही. उलट ती त्या दोघांना म्हणायची, तुम्हाला माझं मन कुठे समजत? मी हे सर्व करते ते काळजीपोटी. पण तुमच्या ते कधी लक्षात येणार नाही. खरी गोष्ट ही होती की ती स्वतःच नको तितका विचार करून त्रास करून घेत होती आणि त्या दोघांना काळजी होती म्हणून ते तिला समजवयाचे.
पण माणूस बदलतो कधी जेव्हा त्याला समजत की आपलं काहीतरी चुकतय. सुधाला याची जाणीव कधी झाली नाही. आता देखील ते पोहोचले नव्हते तर तिचा जीव कासावीस झाला होता. जेवली पण नव्हती आणि काही घेत पण नव्हती. एकसारखं फोन आला नाही, काय झालं असेल आणि अचानक त्यांच्या सोबत काही बरंवाईट झालं नसेल ना या विचाराने रडूच लागली. गिरीशला तिला शांत करण अवघड जात होत. आता त्यांना पण थोडीफार काळजी वाटू लागली होती. पण ते मनाने खूप स्ट्रोंग होते. लगेच कोणत्याही निष्कर्षाला जाण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. ते सुधाला समजावू लागेल, “अग रडू नको अशी, आता फक्त दोन तास झालेत, कदाचित गाडी बंद पडली असेल किंवा कुठेतरी थांबले असतील आणि नेटवर्क नसेल फोनला आपण वाट पाहू! येईल त्यांचा फोन.”
तेव्हढ्यात कोणाचातरी फोन आला. गिरीशरावांनी फोन लगेच घेतला पण नंबर ओळखीचा नव्हता. तरी त्यांनी फोन उचलला. आवाज ऐकला तर तो मिहिरच होता. त्यांनी मिहिर अस म्हटल ते ऐकून सुधाने लगेच फोन काढून घेतला व बोलू लागली. “अरे मिहिर तुम्ही आहात कुठे? मला किती काळजी वाटत होती तुमची. एक फोन तरी करायचा ना! किती वेळ झाला अजून पोहोचला नाही फोन उचलत नाही. काय समजायचं आम्ही. आता कुठे आहात. ठीक आहात ना तुम्ही?” तिच्या आवाजावरून समजल की नेहमीप्रमाणे तिने घर डोक्यावर घेतलं आहे. तो तिला शांत करत म्हणाला, “अग आई आम्ही दोघेही ठीक आहोत. तू जरा शांत हो. मी सर्व सांगतो don’t worry!” त्याने फोन स्पीकर वर ठेवायला सांगितला व घडलेली हकीकत सांगितली.
झालं असं, जाताना वाटेत त्यांची गाडी बंद पडली. जागा पण अशी की फोनला नेटवर्क नाही. जवळपास गैरेन नाही. गैरेज शोधत शोधत ती दोघं गेली, ते देखील मिळालं पण फोन बंदच होते. शेवटी त्याने तिथल्याच एका माणसाचा नंबर घेऊन फोन लावला. कारण इतका वेळ झाला याचा अर्थ आई टेन्शन घेणार हे त्याला माहीत होत. म्हणून गेल्या गेल्या आधी त्याने ते काम केलं. हे सर्व ऐकून गिरीशराव हसुन सुधाकडे पाहू लागले. ती काहीच बोलू शकली नाही कारण जे दर वेळी होत तसच या वेळी पण तिने उगाच इतका त्रास करून घेतला होता.
अशी एकतरी सुधा आपल्यामध्ये असते किंवा आपल्या घरात आजुबाजूला असते. ज्यांना overthinking म्हणजेच अतिवीचार करायची सवय असते. गोष्ट असते खरतर राई इतकी पण त्याचा विचार करून करून डोंगर केला जातो. आणि हे विचार म्हणजे फक्त अंदाज असतात ते देखील चुकीचे, नकारात्मक. ज्याने आपल्याला त्रासच होतो. पण हे अंदाज त्या माणसाला खरेच वाटतात म्हणून जास्त त्रास होतो. नसलेल्या गोष्टी, समस्या मनातल्या मनात निर्माण केल्या जातात ज्याचा खऱ्या आयुष्यात त्रास होतो. म्हणूनच याला आवर घालण्याची गरज असते.
याला आवर घालायचा असेल तर आधी ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हे सर्व माझ्या मनाचे खेळ आहेत, माझे अंदाज आहेत. जसं माझ्या आजूबाजूला गोष्टी घडत आहेत, मला दिसत आहेत तस हे मला दिसत नाही मला जाणवत नाही. त्यामुळे अश्या गोष्टीने त्रास करून घेण्याचा काही अर्थ नाही. दुसरी गोष्ट अश्या वेळी आता आपण काय करू शकत असलो तर आपण ते करून पाहायचं, जसं की आपण फोन करतो, चौकशी करतो. या सर्व गोष्टी आपण करू शकतो जेणेकरून आपल्याला समाधान होईल. त्यावेळी शक्य नाही पण नंतर करू शकतो अस वाटलं तर त्याचा बेत आखुन ठेवायचा आणि चिंता जाऊदेत अस म्हणून दुसऱ्या कामाला लागायचं. पण त्यावेळी आपल्या काहीच हातात नसेल तर आपण विनाकारण त्रास करून घेणे योग्य नाही. अश्या वेळी दुसऱ्या कामात जाणीवपूर्वक स्वतःला शरीर आणि मनाने गुंतवणे खूप गरजेचे आहे.
लक्षात घ्या,
“Man suffers more in imagination than reality!!”
जेव्हा या imagination मधून या कल्पनेतून आपण बाहेर पडू तेव्हा आपले प्रश्न सुटतील.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.
