Skip to content

सतत समजून घेतलं की आपल्या मताला स्वतंत्र अस्तित्व उरत नाही.

सतत समजून घेतलं की आपल्या मताला स्वतंत्र अस्तित्व उरत नाही.


मेराज बागवान


‘समजूतदारपणा’ हा सर्वात महत्वपूर्ण गुण आहे.ज्यामुळे अनेकदा सुख-समाधान मिळते.नाती टिकून राहतात.आणि आयुष्य शांतीमय होते.पण कधी कधी अति समजूतदारपणा देखील खूप महागात पडू शकतो. समजुतदारपणा कुठे, कुणासाठी आणि किती प्रमाणात असावा ह्याला देखील काही हद्द असते.

कारण नाते टिकवणे जरी महत्वाचे असले तरी देखील स्वत्व जपणे, स्वाभिमान जपणे हे देखील फार महत्वाचे असते.आणि आपण च जर सतत समजून घेत राहिलो तर आपल्याला अनेकदा गृहीत धरले जाण्याची शक्यता दाट असते.

अनेकदा नात्यांमध्ये गैरसमज , भांडणे, वाद-विवाद होतात.मग दोन व्यक्तींमधील एक व्यक्ती जरा समजुतीने घेते आणि नाते पुन्हा जोडले जाते.पण जर सतत असे होत राहिले आणि ही व्यक्तीच प्रत्येक वेळी समजून घेत राहिली तर त्या व्यक्तीची देखील काही बाजू असू शकते , तिचे देखील काहीतरी मत असू शकते , हा विचारच दुसरी व्यक्ती करत नाही.आणि मग प्रत्येकवेळी जणू समजून घेणारीच व्यक्ती चुकीची आहे असे देखील मत होऊ शकते.आणि मग सतत समजून घेणाऱ्या व्यक्तीला स्वतःचे असे मतच राहत नाही.

टाळी कधी एका हाताने वाजत नाही.जेव्हा जेव्हा काही तरी चुकीचे होते, तेव्हा तेव्हा फक्त एकाच व्यक्तीची चूक असते असे होत नाही. पण मग अशा वेळी समजून कोणी घ्यायचे हा प्रश्न उभा राहतो.मग कोणीतरी एक जण समजून घेऊन परिस्थिती पूर्ववत करण्याचा प्रयत्न करतो.मग कधी कधी अशा वेळी दुसऱ्या व्यक्तीला वाटते की, मी बरोबरच आहे.आणि जो समजून घेत आहे त्याचीच चूक आहे.असे देखील मत होऊ शकते.

प्रत्येक व्यक्ती ही स्वतंत्र असते.’नवरा-बायको’ हे जरी दोन शरीर आणि एक मन असे नाते मानले जात असले,तरी ते दोघे संपूर्णतः वेगळे असतात.’नवरा म्हणेल तेच झाले पाहिजे’ किंवा ‘बायकोला जे वाटते तेच नेहमी झाले पाहिजे’ असे नसते.कारण , परिस्थिती नेहमी आपल्या मनाप्रमाणे नसते.मग अशा वेळी कामी येतो तो ‘समजुतदारपणा’.पण हा समजूतदारपणा असा असावा की त्यामधून दोन्ही व्यक्तींची मते विचारात घेतली जातील आणि फक्त एका कुणावर तरी मते लादली जाणार नाहीत.

‘जवळचे नाते’ म्हणून अनेकजण सतत समजून घेतात.मग अशा जवळच्या नात्यात देखील, कुणाची तरी एकाची मते कायम दाबली जातात.मग हळू हळू ती व्यक्ती तिचे स्वत्व च हरवून बसते.आणि काहीही झाले तरी आपण समजूनच घ्यायचे हाच स्वभाव जणू त्या व्यक्तीचा होतो.

बऱ्याचदा जवळच्या नात्यात च असे घडते.आणि आपली मते कुठेतरी हरवत चालली आहेत याचे भान देखील त्या व्यक्तीला राहत नाही.आणि जेव्हा कधी याची जाणीव त्या व्यक्तीला होते, तेव्हा तिला स्वतःचे असे एक अस्तित्व जाणवायला लागते. पण तोपर्यंत समोरची व्यक्ती मात्र तिचे स्वतंत्र अस्तित्व विसरून गेलेली असते.

जी व्यक्ती सतत समजून घेत असते.तिच्याकडूनच जग सतत अपेक्षा ठेवायला लागते.ह्या व्यक्तीने हे माझ्यासाठी केलेच पाहिजे.किंवा ही व्यक्ती अमुक एक गोष्ट माझ्यासाठी करणारच असे गृहीत धरले जाऊ शकते.आणि कधी अचानक जर का समजून घेणाऱ्या व्यक्तिकडून ‘नकार’ आला की दुसरी व्यक्ती लगेच तिचा रागराग करू लागते किंवा काहीतरी तक्रार करू लागते.मग अशा वेळेस १०० पैकी ९९ वेळा त्या व्यक्तीसाठी केलेली गोष्ट ही दुसरी व्यक्ती पार विसरून जाते.

असे प्रत्येक ठिकाणी घडु शकते.फक्त कौटुंबिक नात्यातच नाही तर कार्यालयीन जीवनात, सर्वाजनिक जीवनात देखील असे सतत घडत असते.कामे वेळेवर पूर्ण व्हावीत, शांतता भंग होऊ नये म्हणून अनेकजण प्रत्येक वेळी समजून घेतात.पण हे कलयुग आहे.प्रत्येक नात्यात आज ‘प्रॅक्टिकल’ दृष्टिकोन आलेला आहे. आणि मग अशात कोणी ‘भावनिक’ राहून सतत समजून घेत असेल तर आज त्या समजुतदारपणाला देखील काही किंमत उरलेली नाही.

कोणी जर अति समजूतदारपणा दाखवत असेल ,तर तो किंवा ती इतकं का समजून घेत आहे यावर देखील शंका घेतली जाते.असे हे आजचे जग आहे.जिथे कोणतीच गोष्ट कायम नाही.जगाच्या ह्या महाजालात टिकायचे असेल तर प्रत्येक व्यक्तीसाठी स्वत्व जपणे ही आजची गरज आहे.आणि प्रत्येक व्यक्तीने स्वतःचे असे अस्तित्व कायम टिकवून ठेवलेच पाहिजे.अन्यथा फक्त समजूतदारपणा असून देखील काही उपयोग नाही.

काही व्यक्ती खूप हट्टी असतात.’मी नाही स्वतःला बदलणार’.असा त्यांचा दृष्टिकोन असतो.पण म्हणून ही माणसे वाईट असतात असे नाही.फक्त आयुष्यातील काही प्रसंगामुळे, घटनांमुळे आणि परिस्थितीमुळे ती अशी अंतर्मुख झालेली असतात. अनेकदा त्यांना प्रचंड गोष्टी सहन कराव्या लगलेल्या असतात.

मग अशा व्यक्ती इतरांबरोबर वागताना बऱ्याचदा ‘समजून’ घेण्याच्या मनस्थितीत नसतात.’हे असेच आहे , मी असाच आहे आणि मग मला समजूनच घ्यायचे नाही’ असे ती म्हणत असतात.त्यांचा तो स्वभावच जणू बनलेला असतो.पण या सगळ्यात नकळत ते समोरच्या सतत समजून घेणाऱ्या व्यक्तींना गृहीत धरत असतात. जरी त्यांनी खूप हलाखीची परिस्थिती आयुष्यात पाहिलेली असली, खूप जास्त त्रास सहन केलेला असला तरी देखील समोरच्या व्यक्तीला गृहीत धरणे आणि त्या व्यक्तीचे अस्तित्व नाकारणे हे बरोबर नाही.

म्हणूनच, प्रत्येक व्यक्तीने आज कणखर बनले पाहिजे.समजुतदारपणा जेवढा गरजेचा आहे तेवढाच असावा.कारण कोणतीही चांगली गोष्ट जरी ‘अति’ झाली की त्याचे विष बनते.आणि आपला अति समजूतदारपणा देखील समोरच्याला खुपु लागतो.त्यामुळे स्वतःची ओळख जपणे, स्वतंत्र मत असणे जरुरी आहे. प्रत्येक व्यक्ती ही एकमेव असते.

निर्सगाने प्रत्येकामध्येय काही ना काही वेगळे असे बनवलेले आहे.आणि ती वेगळी गोष्ट ओळखून स्वत्व जपणे आवश्यक आहे. आपले संविधान देखील आपल्याला अनेक हक्क , अधिकार देते.त्याचप्रमाणे आपण स्वतः देखील स्वतःसाठी काही तरी केले पाहिजे.स्वतःची तत्वे जपली पाहिजेत. कारण ‘स्वतःचे असे एक तत्व जपणे’ हेच आयुष्य जगण्याचे ध्येय असते. आणि त्यानुसार आपण आपली जीवनाची वाटचाल करायची असते.

चला तर मग इतरांना समजून घेता घेता जरा स्वतःला पण समजून घेऊयात.कारण प्रत्येक व्यक्ती खूप मौल्यवान आहे.

3 thoughts on “सतत समजून घेतलं की आपल्या मताला स्वतंत्र अस्तित्व उरत नाही.”

  1. असाच समजूतदारपणा मला भोवला आहे.

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!