Skip to content

Online अभ्यासाचा मुलांच्या भावनिकतेवर झालेला परिणाम!!

Online अभ्यासाचा मुलांच्या भावनिकतेवर झालेला परिणाम!!


डॉ. सुमेधा मनीष हर्षे I 9922477041


गेल्या दीड वर्षापासून, Covid-19 च्या प्रादुर्भावामुळे शाळा बंद आहेत. ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. सुरुवातीला मुलांना, पालकांना ऑनलाइन शिक्षण प्रणाली खूप चांगली वाटली पण आता जेव्हा त्याचे दुष्परिणाम समोर येताहेत तेंव्हा कधी एकदाच्या शाळा सुरू होतात असं झालयं.

शालेय शिक्षण हे मुलांच्या सर्वांगीण विकासाचा अविभाज्य घटक आहे. अगदी पुरातन काळापासून गुरुकुल पद्धती प्रचलित होती. तेव्हाचे विद्यार्थी हे गुरुगृही शिकायला जायचे. म्हणजे एक प्रकारचे आत्ताचे हॉस्टेलच म्हणा ना! आणि गुरुकुल मध्ये त्यांना सर्व प्रकारचं शिक्षण दिलं जायचं. त्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जायचा. त्यांना एक जबाबदार नागरिक कसे होतील हा अध्यापनाचा हेतू असायचा. म्हणजे पुरातन काळापासूनच शाळेचे महत्त्व मान्य केले गेले आहे.

Covid-19 च्या प्रादुर्भावापूर्वी अनेक पालकांचे असे मत होते की, इतके तास शाळेत जायची गरजच नाही. सगळं ज्ञान घरबसल्या ऑनलाईन मिळू शकतं, अधिक चांगल्या पद्धतीने मिळू शकतं. वेळेचा दुरुपयोग होतो. पण आता दीड वर्षानंतर ऑनलाइन शिक्षणाचे दुष्परिणाम जाणवू लागले आहेत.

शाळा संस्काराचे केंद्र आहे. तिथेच विद्यार्थ्यांची जडणघडण होते. लहानपणी मुलांना कदाचित शाळा आवडत नसेल, पण नंतर म्हणजे पौगंडावस्थेत शाळा, शिक्षक, मित्र-मैत्रिणी हे मुलांचं विश्व बनतं. ते या विश्वात पूर्णपणे रमून जातात. माझ्या मते मुलांना समवयस्कांमध्ये, अनोळखी लोकांमध्ये मिसळण्याची संधी शाळेमुळे मिळते. शाळेमध्ये वेळापत्रक, परीक्षा, गृहपाठ हे सर्व असतेच, पण त्यामुळे मुलांना एक प्रकारची शिस्त लागते.

वेळच्या वेळी उठणे, आपले दप्तर आवरणे व भरणे, अभ्यास ठरलेल्या वेळी पूर्ण करणे वगैरे. अनुशासनाची सवय मुलांना शाळेतूनच लागते. ह्या शिस्तीचा पुढील आयुष्यात खूप उपयोग होतो. शालेय जीवनात काही शिक्षक मुलांचे ‘रोल माॅडेल’ असतात. त्यांचेच अनुकरण मुलं आपल्या जीवनात करतात.

शाळेमध्ये निबंध, वक्तृत्व, चित्रकला अशा वेगवेगळ्या स्पर्धा असतात. स्नेहसंमेलने असतात. विज्ञान प्रदर्शने भरवली जातात. सहली असतात. शाळेतच मुलं शेअरींग (sharing) शिकतात. या सर्व गोष्टींमुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो, त्यांचा आत्मविश्वास वाढतो. चार लोकांसमोर कसे वागावे, बोलावे हे समजते. सभाधीटपणा येतो. नेतृत्वगुणाची वाढ होते. मुले आपापल्या आवडीप्रमाणे या उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतात. या सर्व उपक्रमांचा पुढील आयुष्यात नोकरी मिळविताना, मुलाखतीला सामोरे जाताना उपयोग होतो.

खरे सांगायचे झाले तर शाळेचे जीवन खूप छान असते. त्या काळात झालेली मैत्री ही नि:स्वार्थ मैत्री असते. निर्व्याज, निरागस प्रेम या मैत्रीतून मिळते व पुढच्या स्पर्धेच्या, कटकटीच्या धावपळीच्या युगात ही मैत्री वाळंवटातील हिरवळीप्रमाणे मदत करू शकते.

पण कोव्हिड -19 प्रादुर्भावामुळे जेव्हा शाळा बंद झाल्या तेंव्हा बहुतांश पालकांना, मुलांना ऑनलाइन शिक्षण पद्धती खूप सोयीस्कर वाटायला लागली. घरातल्या घरात बसून मुले शिक्षण घेऊ शकत होती. वेगवेगळ्या साइट्सवर हव्या त्या विषयाचे ज्ञान सहज उपलब्ध असल्याने मुलांना ते खूपच फायदेशीर होत होतं.

पण जसजसा काळ जायला लागला, तसतसे त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले. कारण इतका वेळ स्क्रीन वापरल्याने मुलांमध्ये डोळ्यांच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत. डोळे लाल होणे डोळ्यातून पाणी येणे, डोके दुखू लागणे अशा त्यांच्या तक्रारी चालू झाल्या आहेत.

ऑनलाइन शिक्षण घेतांना मुलांना लक्ष केंद्रित करणं कठीण जातंय. एकाग्रता कमी होते आहे. शिक्षकांचा काहीही धाक राहिला नाही. मुलं अनुशासनात रहाणं विसरत चालली आहेत. शिक्षक समोर नाहीच आहेत त्यामुळे त्यांना काय घाबरायचं अशी एक वृत्ती तयार झली आहे. त्यांनी काही विचारलं तर कॅमेरा, आवाज बंद करून टाकायचा, मग कुठल्याच प्रश्नाला सामोरे जाणेच नको..

त्यामुळे मुलांच्या मनात परिक्षांबद्दल गांभीर्यच उरलेलं नाही. अभ्यासाच्या बाबतीतही मुलं उदासीन व्हायला लागलेली आहेत. नाही केला अभ्यास तर चालून जातं, शिक्षक कुठे समोर आहेत? अशी वृत्ती तयार झाली आहे. त्यामुळे मुलांचे शैक्षणिक नुकसान होतं आहे .

शाळेमध्ये जे व्यक्तिमत्त्व विकासासाठी पोषक वातावरण असतं, मित्रांबरोबर जो आनंद मिळतो, ताण तणावाच्या निचरा होतो त्या सगळ्या अनुभवांना ते मुकत आहेत. आई-वडिल मुलांवर पूर्णवेळ लक्ष ठेवू शकत नाहीत. त्यांना वाटतं मुलं ऑनलाईन अध्ययनात व्यस्त आहेत. पण बरेचदा काही मुलं त्याचा गैरफायदा घेताहेत. मोबाईलवर गेम्स किंवा इतर ॲप उघडून नको त्या गोष्टींच्या आहारी जात आहेत. त्यांच्या हातात आयतं कोलीत सापडलं आहे.

मुलांच्या कल्पनाशक्तीवर, सर्जनशीलतेवर हा घाला आहे. शिक्षकांबरोबर, मित्रांबरोबर संभाषण ( communication) कमी झालं आहे. मुलं तुसडी बनत चाललेली आहे, एकलकोंडी होत आहेत, नैराश्य, उदासनीतेकडे त्यांची मनं झुकत चालली आहेत.

ऑनलाइन शिक्षणाचे जसे फायदे आहेत तसे तोटेही खूप आहेत हे आता कळत आहे.. मुलांच्या मनावर जरी एकप्रकारची मरगळ चढली आहे तरी त्यांनाही आता शाळेची आठवण यायला लागली आहे.

हे सगळं बघून पालकांना शाळा लवकर सुरू‌ व्हाव्यात असं वाटतंय. नवीन तंत्रज्ञानाचा आधार तर घ्यायलाच हवा पण त्याचा अतिरेक करू नये, नाही तर त्याचे दुष्परिणाम होणारच. नव्या जुन्याच्या संगमातूनच उज्वल भवितव्याकडे वाटचाल शक्य आहे.


आजच मुलांचं योग्य करीअर कॉउन्सिलिंग करून घ्या. यासंदर्भात खालीलप्रमाणे संपूर्ण माहिती नमूद करण्यात आलेली आहे. Online Career Counseling द्वारे निरनिराळ्या मानसशास्त्रीय किंवा करिअर चाचण्या घेऊन मुलांची योग्य करिअरची दिशा ठरवूया. Online असल्याने पालकांना आणि मुलांना कोठेही यायची-जायची गरज नाही.


Online Career Counseling साठी !

👇👇

क्लिक करा



करीअर काउंन्सिलिंगचा नेमका अर्थ समजून घ्या!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “Online अभ्यासाचा मुलांच्या भावनिकतेवर झालेला परिणाम!!”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!