“अशांची कधीच वाट पाहू नका, जे तुमच्यापेक्षा दुसर्यांसोबत जास्त खुश असतात.”
मधुश्री देशपांडे गानू
“जब भी जी चाहे,
नयी दुनिया बसा लेते हैं लोग…..
एक चेहरे पे कई चेहरें,
लगा लेते हैं लोग……….”
मुखवटे… खरा माणूस हा मुखवट्यांआडच दडलेला असतो. प्रत्येक जण असे अनेक मुखवटे चढवूनच जीवनात वावरत असतो. खरा, सच्चा माणूस तुमच्या आयुष्यात कायम साथ द्यायला मिळाला तर तुम्हीं भाग्यवान आहात!! पण आता स्वार्थीपणा, अप्पलपोटेपणा आणि अहंकाराचा कळस झालेल्या जमान्यात तुम्हीं अशा व्यक्तीची वाट पाहणे, अपेक्षा करणे खरंच वास्तविक आहे का?? मला मान्य आहे, अजून माणुसकी जिवंत आहे म्हणून हे जग चाललंय.पण तरीही तुमच्या आयुष्यात येणाऱ्या आणि तुम्हीं जीव लावलेल्या किती व्यक्ती तुमची खरंच साथ देतात?? नाहीच देत. हो ना!
कितीही मी एकटा/ एकटी समर्थ आहे असं तुम्हीं म्हणालात, तरी मनापासून तुम्हांला आपल्याला सर्वार्थाने समजून घेणारी, आहे तसेच स्वीकारणारी, आपलंसं करणारी माणसं आपल्याजवळ हवी असं वाटत असतं. माणूस या प्राण्याच्या दोनच मूलभूत नैसर्गिक गरजा आहेत. भूक आणि प्रेम. या प्रेमासाठी आजीवन प्रत्येक व्यक्ती आसुसलेला असतो. प्रेमाचे, काळजीचे, विश्वासाचे दोन शब्द मिळावेत यासाठी आयुष्यभर तो नात्यांच्या शोधात असतो. यासाठी धडपडत असतो. नवनवीन नाती जोडत असतो.
जन्मापासूनच आपल्याला मिळालेलं कुटुंब, नातलग आपले असतातच. पण या रक्ताच्या नात्यांचीही शाश्वती देता येत नाहीच. मग मित्र मैत्रिणी, प्रियकर-प्रेयसी, नवरा-बायको यांची कशी देता येईल???
कोणतंही नातं फार गुंतागुंतीचं असतं. एक तर आपली एखाद्या नात्यात प्रचंड प्रेमाची, विश्वासाची गुंतवणूक असते. बहुतेक वेळा आंधळं प्रेमच असतं. अगदी पालक-पाल्य, भावंडं यांच्यामध्ये सुद्धा. सर्वात मोठी चूक आपण कोणत्याही नात्यात करतो ती म्हणजे ते नातं, ती व्यक्ती आपण गृहीत धरतो. कितीही आपलं प्रेमाचं माणूस असलं तरीही ती एक संपूर्णपणे वेगळी स्वतंत्र व्यक्ती आहे हेच आपण विसरून जातो. आपल्या मनाप्रमाणे, अपेक्षांप्रमाणे आपण त्या व्यक्तीची आपल्या मनात एक प्रतिमा बनवलेली असते. आपण त्या प्रतिमेच्याच प्रेमात असतो. मग ती व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे वागली नाही तर आपला अपेक्षाभंग होतो. आणि विसंवादाची ठिणगी पडते. हे असंच राहिलं तर नातं विस्कळीत व्हायला सुरुवात होते. आणि काहीवेळा वाईट पद्धतीने नाती कायमची संपतात. आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचा वेगळा स्वभाव, वेगळा दृष्टिकोन आपण लक्षातच घेत नाही.
आज तर सगळेच सवंग, उथळ झालं आहे. आज नाती ही फक्त स्वार्थ साधण्यासाठी जोडली जातात. ज्यांच्याजवळ फक्त पैशांची श्रीमंती आहे अशाच कुटुंबियांना, नातेवाईकांना मान दिला जातो. त्यांना जवळ केलं जातं. कोणत्याही बाबतीत न्यून असलेल्या व्यक्तींना कायम डावललं जातं. ते चेष्टा-मस्करी चा विषय असतात. प्रेमाच्या खोट्या आणाभाका घेऊन हातोहात फसवणारे तर पावला पावलावर आढळतात.
आपण मनापासून नाती जपायचा प्रयत्न करतो. पण नातं जपणं, ते सांभाळणं, त्या नात्याची गरज आणि ओढ ही दोन्हीं कडून समान पातळीवर असायलाच हवी. नाहीतर एकाने नातं सांभाळायचं आणि दुसरा मात्र दुसरीकडे नातं जोडून खुश असतो. अशावेळी आंधळेपणाने विश्वास न ठेवता संपूर्ण जागरूकतेने नाती वेळोवेळी तपासावीत. समोरच्या व्यक्तीचे बदललेले वर्तन याकडे काणाडोळा करू नये. आता तुम्हांला ती व्यक्ती पूर्वीसारखा वेळ देत नाही, तुमची काळजी घेत नाही, तुमच्या दोघांमध्ये साध्या गोष्टींबद्दल ही एकवाक्यता होत नाही, संवाद कमी कमी होत जातो.
ही व्यक्ती तुम्हांला टाळू लागते, वेळोवेळी खोटं बोलते, अशा गोष्टी जेंव्हा वारंवार घडायला लागतात, तेंव्हा समजुन जा की त्या व्यक्तीच्या आयुष्यात आता तुम्हांला काही स्थान नाही. नवीन माणसांमध्ये ती व्यक्ती जास्त खुश आहे. माणूस परिवर्तनशील आहे. तुमची भावनिक गुंतवणूक समोरच्याची पण असेल असं नाही ना! कालांतराने नात्यातील ओढ संपू शकते. समोरची व्यक्ती बदलते. आश्चर्य वाटेल इतकी बदलते… “सर्वात महत्त्वाचं स्वतःचं मूल्य जाणायला हवं.”
उगाचच “Emotional Fool”होऊन कुढत बसण्यापेक्षा, दुःखी होण्यापेक्षा त्या व्यक्तीचं बदलणं तुम्हीं मान्य करायला हवं. हे वास्तव लवकर स्वीकारलं तर पुढे होणारे तुमचे मानसिक त्रास कमी होतील.
अशा दुसर्यांसोबत जास्त खुश असणाऱ्या स्वार्थी व्यक्तींची वाट पाहण्यात स्वतःचं मौल्यवान आयुष्य खर्ची घालू नका. तर असे नात्यांचे विझलेले दिवे लवकरात लवकर गंगेवर सोडून द्या. या गुंतवणुकीतून स्वतःला लवकर सोडवून घ्या. काही नाती ठराविक काळच, स्वार्थासाठी आपली सोबत करतात, हे वास्तव स्वीकारा. आज जी जीवापाड प्रेमाची नाती आहेत ती उद्या अनोळखी होतात हे कटू सत्य आहे. जीवन चलने का नाम!!!
मी नेहमी सांगते,” स्वतःचा स्वाभिमान पायदळी तुडवून कोणतंही नातं स्वीकारू, सांभाळू नका.” अशा नात्यांकडे परत पुन्हा वळूनही पाहू नका. कारण दुःखाशिवाय, मनस्तापा शिवाय काहीच हाती लागणार नाही. तुमचं आयुष्य, तुमचा आनंद हा सर्वस्वी तुमच्या हातात आहे. अशा स्वार्थी, अर्धवट वाटेवर सोडून जाणाऱ्या नात्यांच्या हातात नक्कीच नाही..जे तुम्हांला सोडून दुसऱ्यां सोबत खुश आहेत त्यांना तिथेच राहू द्या. अशांसाठी तुम्ही थांबू नका. या सुंदर आयुष्याच्या वाटेवर अनेक सुंदर अनुभव, नवी नाती तुमची वाट पाहत असतात. नव्या अनुभवांसाठी सज्ज व्हा. स्वतःला सर्वोपरि मानून स्वतःच्या आनंदासाठी जगा. तुमच्या आनंदाची किल्ली कोणाच्याही हातात देऊ नका. मग बघा! तुम्हांला कायम प्रेमाने साथ देणारी मोजकी का असेना, पण तुमची प्रेमाची, आपली माणसं तुमच्या आयुष्यात बहार आणतीलच… खात्री आहे…
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

नक्कीच आणि हे अगदी खरं आहे
खूपच सुंदर