नेहमी मीच बरोबर असं सदैव वाटणाऱ्या लोकांचं पुढे नियती काय करून ठेवते बघा.
अपर्णा कुलकर्णी
वसुधा गॅलरीत चहा पीत बसली होती. कालच तिने पासष्टी पूर्ण केली होती. तिच्यासाठी सर्वस्व असणाऱ्या तिच्या एकुलत्या एक मुलाने तिचा पासश्ठावा वाढदिवस अगदीच थाटात साजरा केला होता. हा इथे रोषणाई, दिव्यांचा झगमगाट, मोठा केक, जंगी पार्टी असे काहीच नव्हते. तर वसुधाच्या इच्छेचा मान ठेवून अर्पितने एका अनाथ आश्रमात देणगी, कपडे आणि खाऊ वाटला होता. त्यांच्या सोबत सगळा दिवस घालवला होता. आपण समाजकार्य करावे ही वासुधाची खूप जुनी इच्छा होती. पण आजवर तिला ते जमले नव्हते. पण तिच्या मुलाने अर्पितने मात्र तिची इच्छा लक्षात ठेवून आईला छान सरप्राइज दिले होते.
हे सगळे क्षण आठवत वसुधा गॅलरीत बसुन होती. मुलगा, सून दोघेही कामाला गेले होते आणि ती घरात एकटी शांतपने बसून होती. बघता बघता ती भूतकाळात गेली. लग्न झाल्यावर नव्याचे नऊ दिवस सरताच नियतीने विवेकच्या रुपात किती घाव दिले होते तिला.
वसुधा विवेक सोबत लग्न करून घरात आली. विवेक सोबत हे तिचे दुसरे लग्न होते. विवेक सोबत पुन्हा लग्न बंधनात अडकण्या आधीच तिने सगळा भूतकाळ विवेकला संगीलता होता. त्यानेही आणि त्याच्या घरच्यांनी ही खूप मोठ्या मनाने सगळे स्वीकारले होते. वसुधाने पण विवेक सोबतचे नाते, त्याच्या घरचे लोक सगळ्यांचा मनापासून स्वीकार केला होता. लग्न झाल्यावर महिन्या भरातच वसुधाला दिवस गेले. बघता बघता गोंडस राजकुमार त्यांच्या पोटी जन्माला आला. वसुधा आई झाली. तिला आईपण देणारा हा लहानगा जीव तिचे सर्वस्व होऊन गेला. जगातली सगळी सुख देवाने तिच्या पदरात टाकली आहेत आणि जगातील सगळ्यात नशीबवान मुलगी असल्याचे तिला आणि तिच्या आई बाबांना वाटू लागले.
पण काहीच दिवसात विवेकचे वागणे खूपच बदलले. सतत चिडचिड, लहान सहान गोष्टीवरून वाद, कधी कधी मारहाण सुरू झाली. लग्न जमल्यापासून मुल होईपर्यंत वागणारा विवेक आणि आताचा विवेक किती फरक होता दोघात ? कोणतं रूप खरे ?? बिचारी वसुधा गोंधळात पडली होती. पहिल्या नवऱ्याने मारले होते म्हणूनच तिने ते नाते स्वतःहून संपवले होते. वाट्टेल ती गोष्ट सहन करेन पण नवऱ्याचा मार खायचा नाही असे तिने ठरवले होते. पण आज त्याच विवेकने मुलगा रडतोय या करणाखली तिला लाथा मारल्या होत्या.
स्वतःच्या कोवळ्या जीवाकडे पहात ती सगळे मुकाट्याने गिळत होती. अचानक एक दिवस विवेकचा मोठा अपघात झाला आणि त्याच्या पायात रॉड घालण्याची वेळ आली. नियतीने त्याच्या वागण्याची शिक्षा त्याला दिली होती. पण त्याला ते मान्यच नव्हते. हॉस्पिटलमधून घरी आला तसे त्याने पुन्हा तसेच वागायला सुरुवात केली. वसुधा मुलाचे खाणे पिणे, त्याचा सांभाळ शिवाय नवऱ्याच्या खाण्या पिण्याच्या वेळा , काय हवं नको ते सगळं बघत होती. तरीही विवेक चिडून जवळ असेल ती वस्तू तिच्या अंगावर फेकून मारत होता. त्याच वेळी वसुधाला ॲपेंडिक्स झाला आणि तिला माहेरी यावे लागले. सासरी कोणीच बघणारे नव्हते. या काळात तिच्या सासरच्या कोणीही आणि विवेकने ही तिचीच काय तिच्या मुलाची ही चौकशी केली नाही. विवेक फोन करत असे पण फक्त मुलाशी बोलण्यासाठी.
हळू हळू लग्नाला पाच वर्षे झाली. पण विवेक मात्र आहे तसाच वागत होता. एकदा काहीच कारण नसताना त्याने वसुधाला बेडरूममध्ये ओढत न्यायला सुरुवात केली. तिला बेडवर पाडले आणि शारीरिक सुखाची अपेक्षा करू लागला. ती नकार देते म्हटल्यावर त्याने मारायला सुरुवात केली. खूप टॉर्चर केले. वसुधाने कसेबसे स्वतःची आणि मुलाची सुटका करून पोलिस स्टेशन गाठले. कोर्ट कचेरी सगळे झाले. पण पदरात मुल आणि सासर अशा रीतीने सोडून आलेल्या मुलीला किती काळ आई बाबा तरी आधार देणारे असतात. शेवटी मुलासाठी नात्याला एक संधी द्यावी या विचाराने ती घरात आली. याच दरम्यान तिचे सासरे गेले. पण आतातरी आपण नीट वागावे हे विवेकच्या लक्षात आले नाही. स्वतःच्या बाबांच्या मृत्युला त्याने वसुधाला जबाबदार धरले. दरम्यान बाबांच्या मिळालेल्या पैशातून त्याने फ्लॅट घेतला. तो घेताना त्याने वसुधाचे साधे मत विचारात घेतले नाही. अजूनही त्याचा माज जिरला नव्हता.
त्यात अजून एक नवे संकट म्हणजे विवेकची नोकरी धोक्यात होती. त्यामुळे बँकेचे हफ्ते वेळेवर जात नव्हते. ते लोक दारात येऊन चौकशी करत. पण तोंड मात्र वसुधाल द्यावे लागत असे. विवेक ऑफिसमध्ये जात आणि बँकेचे फोन उचलत नसे. पण तरीही घरात आरेरावी, माज, वाटेल तसे वागणे चालूच होते. त्यात त्याने स्वतःच्या मुलाला अर्पितला खूप चुकीचे सांगितले होते त्याच्या आई बद्दल. त्यामुळे तो ही आईशी नीट वागत नसे.
बघता बघता लग्नाला दहा वर्षे झाली. अधून मधून भांडणे चालूच होती. नेहमी कोणत्याही गोष्टीला विवेक वसुधालाच जबाबदार धरत असे, भूतकाळ पुन्हा पुन्हा उकरून काढत असे. ज्या गोष्टी वसुधा कटाक्षाने विसरण्याचा प्रयत्न करत होती, त्या तिच्या मनाच्या कोपऱ्यातील जखमा उकरून काढून त्याला तिखट मीठ लावणे हे विवेकचे आवडीचे काम होते. वसुधा आतून खूप तळमळत होती, देवाकडे स्वतःसाठी मरण मागत होती. ही मेंटल हरशमेंट तिला सहन होत नव्हती आणि आता पुन्हा पुन्हा तेच तेच आई बाबा ना सांगण्याची तिची इच्छा राहिली नव्हती. विवेक जवळ शिक्षण नव्हते, रूप नव्हते, मॅनर्स नव्हते, पैसा नव्हता पण तरीही इतका माज आणि इगो कशाच्या जोरावर दाखवत होता तेच वसुधाला समजत नव्हते. माणसाकडे या सगळ्या गोष्टी असल्या तरीही माज करू नये, स्त्रियांचा आदर करावा, वागण्याने माणसांची मने जिंकावीअसेच वसुधाचे मत होते. पण कशात काहीच करू शकत नसताना इतकी उर्मट वृत्ती कशी असू शकते एखाद्या माणसात आणि जर माज दाखवायचा असेल तर तेवढे गुण असायला हवेत. पण विवेकच्या बाबतीत सगळ्याच बाजूंनी बोंब होती.
पण वसुधा चा अर्पित आता मोठा होत होता. शाळेत जाऊन चांगलं काय वाईट काय, बरोबर काय चूक काय हे समजू लागला होता. त्यामुळे तो विवेकला त्याच्या आईशी चुकीचे वागू देत नसे. आता खऱ्या अर्थाने नियती माझ्या बाजूने आहे असे वसुधाला वाटू लागले. पण विवेकने तिच्यावर आरोप केले. माझ्या मुलाला तू माझ्या पासून हिरावून घेतले असे सतत तो बोलत असे. सुंभ जळला तरी पिळ जळत नाही असे झाले होते त्याचे. काळ पुढे सरकत होता, अर्पित मोठा होत होता. अर्पितला त्याचे बाबा कसे आहेत हे चांगलेच समजले होते. पण माणसाने आपले कर्तव्य कधीच चुकू नये ही आईने दिलेली शिकवण तो विसरू शकत नव्हता. म्हणून काही गोष्टी सहन करत होता.
एक दिवस विवेकला घरातच अर्धांगवायूचा झटका आला आणि त्यात त्याची डावी बाजू निकामी झाली. एकाच जागी अंथरुणात पडून राहिला होता तो. नियती झटके देत होती पण त्याची बुद्धी मात्र ते समजून घ्यायला मान्य करायला तयारच नव्हती. अंथरुणात पडून पडून तो तोंडाला येईल ते बोलत असे वसुधाला. एकदा तर त्याने त्याच्या उशाशी असलेला तांब्या तिच्याकडे भिरकावून तिला मारण्याचा प्रयत्न केला. पण सुदैवाने वसुधा बाजूला झाली आणि तांब्या भिंतीवर आपटला.
आवाज ऐकून अर्पित बाहेर आला. त्याने सगळा प्रकार पाहिला आणि रागाने त्याच्या मुठी आवळल्या गेल्या. आज वसुधा खूप शांत होती. हळू हळू ती विवेकच्या जवळ गेली आणि तिने सणसणीत थोबाडीत दिल्या विवेकला. हाताला लागेल त्या वस्तूने त्याला मारत राहिली. तिचा आवेग आणि राग पाहून अर्पित क्षणभर चकित झाला आणि भानावर येत त्याने आईला सावरले.थांब अर्पित आज मला थांबवू नकोस. या माणसाने लग्न झाल्यापासून आजपर्यंत माझे जगणे मुश्कील केले आहे.
माझा भूतकाळ माहीत असूनही माझ्याशी लग्न केले आणि त्या जखमा कुरतडत राहिला. बायको म्हणून कधीच मान, आदर दिला नाही. बायांकाचा आदर करावा ही शिकवण तुला कधी दिली नाही सतत मी निर्बुद्धअसल्या सारखे मला हिणवत आला. माझी अवहेलना केली, अपमान केला. कशात काहीच नसताना इतका माज याच्याकडे का होता आणि कुठून आला काय माहित. याच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक चुकीच्या घटनेचे खापर याने माझ्या माथी फोडले नेहमी मीच योग्य आणि माझेच म्हणणे वागणे बरोबर याच अहंकारात अनेक चुकीचे निर्णय घेऊन तुझ्या आणि माझ्या आयुष्याची वाट लावली. आजवर याला स्वतःच्या चुका कधी समजल्याच नाहीत आणि मी जाणीव करून दिली तर कधी त्याने त्या मान्य केल्या नाहीत. माझेच बरोबर आहे आणि माझ्याच मागे तुम्ही आले पाहिजे असाच अट्टाहास आजही आहे याचा. नियतीने दिलेले संकेत याला कधीच समजले नाहीत. मला याने कधीच समजून घेतले नाही, माझ्याशी कधी मोकळेपणाने बोलला नाही, कोणत्याच गोष्टीत माझे मत विचारात घेतले नाही. आज माझ्या संयमाचा बांध फुटला अर्पित.
तू हे सगळं खूप आधी करायला हवं होतास आई अर्पित म्हणाला. तसे वसुधाने त्याच्याकडे पाहिले आणि म्हणाली मनात खूप राग होता पण बळ नव्हत बाळा. कळतंय पण वळत नाही अशी अवस्था झाली होती माझी. सतत माझी तुलना इतरांच्या बायकांशी करत आला पण बाकीचे नवरे कसे वागतात हे याच्या कधीच लक्षात आले नाही. सासरी राहायची इच्छा नव्हती आणि माहेरी राहू शकत नव्हते. तुला त्यावेळी समज नव्हती, तुझे बाबा तुला हवेच होते. तुला बघणार कोणी नाही म्हणून जॉब करत नव्हते. तुला घेऊन एकटीने या समाजात राहणे कठीण होते बाळा, पुढे येणाऱ्या अडचणींना माझ्या इतकेच तुलाही तोंड द्यावे लागले असते. तू बाबसोबत का नाही रहात तिथेच राहायचं ना ?? असे प्रश्न तूच केले असतेस अर्पित. त्यावेळी तुझ्या साठी मी नात्याला संधी दिली नाही असे मला वाटायला नको होते. तुझ्या डोळ्यात डोळे घालून मला सगळ्या गोष्टी ची उत्तरे देता यावीत तसेच तुझ्यासाठी मी असे केले असते तर …. असे वाटायला नको होते मला. म्हणून मी इथे थांबले आणि तू म्हणतोस तसे केले असते तर सगळेच संपले असते. म्हणून तू मोठा होण्याची वाट बघणं इतकंच हातात होते. कारण आमच्या भांडणात तुझी फरफट मला होऊ द्यायची नव्हती अर्पित. तिने अर्पितला मिठी मारून अश्रूंचा बांध मोकळा केला होता आज.
आजवर आईची सगळीकडूनच झालेली घुसमट पाहून अर्पित ही स्वतःला थांबवू शकला नव्हता. पण हे बाबांचं वागणं त्याच्या डोक्यात गेलं होत. त्याने दुसऱ्याच दिवशी त्याच्या बाबांना हॉस्पिटलमध्ये ठेवले होते आणि तिथल्याच लोकांना त्यांची काळजी घ्यायला म्हणजे खाणे पिणे पाहायला सांगितले होते. वसुधाने या विषयी अर्पितशी बोलण्याचा प्रयत्न केला होता पण अर्पितने काही ऐकून घेतले नाही. जितके कर्तव्य करायचे होते ते केले आता त्यांचे कर्मच त्यांना इथे घेऊन आले आहे. इतकेच तो म्हणाला होता. काही महिन्यांनी विवेक गेल्याचा फोन आला तेंव्हा कर्तव्यपुर्ती म्हणून अर्पितने अंत्यसंस्कार केले होते विवेकचे.
अर्पित घरी आला तर आई अजूनही गॅलरीतच बसून होती. तो पटकन गॅलरीत गेला, अग आई तू सकाळ पासून इथेच अशी का बसून आहेस ?? बरं वाटत नाही का तुला ?? आईचा ताप चेक करत त्याने विचारले. अरे नाही बाळा, गेल्या काही वर्षांचा आढावा घेत होते, अनेक प्रसंग डोळ्यासमोरून गेले त्यात संध्याकाळ कधी झाली काही समजलेच नाही. आता वसुधाचे डोळे पुन्हा पाणावले तसे अर्पितने तिला जवळ घेतले आणि तिला शांत करत म्हणाला, नेहमी मीच बरोबर असं सदैव वाटणाऱ्या लोकांचं नियती असेच काहीतरी करणार ना आई ?? त्यांच्या कर्माचे भोग त्यांना भोगावेच लागणार.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

Jashas tase barobar ahe.
Khup chhan aasya lokan barobar asacha vhyala pahije
Khup bodhprad lekh aahe.
Khup chhan Ani he khare ahe
खुप छान आणि रियल