Skip to content

नवीन काही करण्याच्या विचारात असाल तर काही काळ नकारात्मक व्यक्ती आणि प्रसंगापासून दूर रहा.

नवीन काही करण्याच्या विचारात असाल तर काही काळ नकारात्मक व्यक्ती आणि प्रसंगापासून दूर रहा.


हर्षदा पिंपळे


“आज मला चित्र काढावसं वाटतय,आयुष्याचं काहीतरी नवीन नियोजन करावसं वाटतय.थोडं कुठेतरी काहीतरी नवीन शोधेन म्हणतेय.पण यार माझं लक्ष लागत नाहीये.त्या सानिकाची अवस्था मला बघवत नाहीये.तिचं ब्रेकप झाल्यापासून ती सतत काहीतरी निगेटिव्ह बोलत रहाते.तासनतास एका खोलीत अंधार करून बसून राहते.कुणाशी काही बोलत नाही, बोललीच तर नीट बोलत नाही.किती समजावलं तिला…पण ती ऐकत नाही. मी किती काळ समजावणार तिला..? तिच्या या अशा अवस्थेमुळे माझं कशातही लक्ष लागत नाही. मलाच कळत नाहीये काय करावं नी काय नाही? ”
प्रिया सारंगला म्हणाली.

आता हे झालं प्रियाचं उदाहरण.आपलीही अवस्था कधीकधी अशीच होते.असं म्हणतात,एखादी गोष्ट करायची असेल तर माणूस कसाही करतो.कोणतीही परिस्थिती असूदे तो त्याच्या गोष्टी पूर्ण करतोच.आता हे जरी खरं असलं तरी कधी कधी आजूबाजूच्या वातावरणाचा परिणामही आपल्या गोष्टीवर होत असतो हेही तितकच खरं.

आयुष्यात प्रत्येकाची कोणती ना कोणती स्वप्न असतात.म्हणजे एकाच क्षेत्रातील करिअर सोडून कितीतरी गोष्टी प्रत्येकाला करायच्या असतात.प्रत्येकाला कोणता ना कोणता छंद असतो.कुणाला गाण्याचा छंद असतो तर कुणाला एखादं वाद्य वाजवण्याचा छंद असतो.चित्रकला, नृत्यकला , हस्तकला अशा वेगवेगळ्या प्रकारच्या कला मनुष्याला अवगत असतात.परंतु अनेकदा कामाच्या व्यापामुळे त्याला या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ नसतो.तर कधी कधी Passion आणि Profession एकच असल्याने स्वतःच्या इतर गोष्टींकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही.

प्रत्येकाला स्वतःच्या आवडीच्या गोष्टी पूर्ण करण्याची इच्छा असते.काहीतरी नवीन करण्याची इच्छा असते.पण या गोष्टी करण्यासाठी प्रत्येकालाच हवहवसं असं पोषक वातावरण हवं असतं.आजुबाजूला असणारं वातावरण जर खेळीमेळीचं असेल तर नवीन गोष्टी करण्याला नवा उत्साह, नवी ऊर्जा निर्माण होते.पण जर हेच वातावरण नकारात्मक स्वरूपाच असेल तर कोणतीही गोष्ट मनुष्याला सहजासहजी करावीशी वाटत नाही.त्याची त्या नकारात्मक वातावरणात काही करायची इच्छाच होत नाही. त्याच्यातील उत्साह कापरासारखा सहज उडून जातो.

तर म्हणून नवीन काही करायचं असेल तर नकारात्मक वातावरण, नकारात्मक विचार, नकारात्मक व्यक्ती यांपासून जरा लांब रहायला प्राधान्य द्या. ज्याप्रमाणे सकारात्मक वातावरणात गोष्टी चांगल्या घडतात त्याप्रमाणे नकारात्मक वातावरणात अनेकदा गोष्टी या नकारात्मक स्वरूपाच्या होत जातात. नाही म्हंटल तरीही या नकारात्मक वातावरणाचा आपल्या गोष्टींवर प्रभाव पडतो.अशा वातावरणात मेंदू व्यवस्थित कार्य करत नाही.त्यामुळेच गोष्टी अर्धवट राहतात.

म्हणून नवीन काही करण्याच्या विचारात असाल तर सर्वात आधी आपल्या आजुबाजूच्या वातावरणाचा एकदा आढावा घ्या.सभोवताली असणारं वातावरण आपल्या गोष्टींसाठी पोषक आहे की नाही हे तपासून पहा.या वातावरणात आपण किती उत्साहाने काम करू शकतो याचा अंदाज घ्या.आणि नंतरच नवीन गोष्टी करण्याला प्राधान्य द्या. जेणेकरून तुमच्या गोष्टींवर ,तुमच्या मनावर त्या निगेटिव्ह वातावरणाचा विपरीत परिणाम होणार नाही.

*नकारात्मक गोष्टींमुळे आपला उत्साह कमी होतो.आपली शारीरिक आणि मानसिक ऊर्जा कमी होते.जर आपला उत्साह आणि ताकदच संपला तर आपण नवीन गोष्टी करणार कशा..? याचा एकदा विचार करून पहा.

*नकारात्मक वातावरणामुळे माणसाची प्रगती खुंटण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्यामुळेच जर प्रगती करायची असेल,काहीतरी नाविन्यपूर्ण करायच असेल तर नकारात्मक वातावरणाला वेळीच दूर करा.

*जसं वातावरण तसे आपण घडतो म्हणून नकारात्मक वातावरणात घडण्यापेक्षा सकारात्मक वातावरणात घडण्याचा प्रयत्न करा.त्याने आयुष्याची जडणघडण चांगली होण्यास मदत होईल.

*नकारात्मक वातावरणात वावर ठेवला तर मन नकारात्मक विचार करायला मागे पुढे बघणार नाही.आणि एकदा का मन नकारात्मक विचार करायला लागलं की माणसाला की सुचत नाही. म्हणून मन जर एकाग्र ठेवायच असेल तर नकारात्मक वातावरणाला गुडबाय करा.

*सकारात्मक वातावरणाच महत्त्व लक्षात घेऊन सकारात्मक वातावरणात रहायला प्राधान्य द्या. सकारात्मक वातावरण नेहमीच काहीतरी सर्जनशील करण्यासाठी पंखात बळ निर्माण करतं.

पहा,विचार करा.नवीन गोष्टी करायच्या असतील तर सकारात्मक वातावरणात रहा.सकारात्मक व्यक्तींच्या सहवासात रहायचा प्रयत्न करा.आयुष्याकडे असणारा दृष्टिकोन सकारात्मक ठेवायचा प्रयत्न करा.

आयुष्यात ठरवलेल्या कितीतरी गोष्टी नक्कीच पूर्णत्वास येतील.


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!