Skip to content

नको त्यात मन गुंतलं की नको ते भोगावं लागू नये यासाठी काय करावं ?

नको त्यात मन गुंतलं की नको ते भोगावं लागू नये यासाठी काय करावं ?


गीतांजली जगदाळे


मन ही अशी गोष्ट आहे की किती कंट्रोल मध्ये करायची म्हटलं तरी कुठे जाईल , कशात गुंतेल , कशाचा विचार सतत करत राहील आणि त्या विचारांच्या जाळ्यात किती खोलवर जाईल सांगताच येणार नाही. मन हे शास्त्रज्ञांना ही न उकलेलं कोडं आहे. असं जरी असलं तरी बऱ्याचं वेळा कशाच्या नादी लागू नये किंवा कशावर फोकस करायचा हे आपल्याला बरोबर कळत असतं . एवढं कळत असूनदेखील मनावर नियंत्रण ठेवणं मात्र आपल्याला खरंच फार कठीण जातं !

ज्या गावाला जायचं नसतं , त्याच गावाचा रस्ता धरून आपण फार लांब चालत गेलेलो असतो आणि मग जेव्हा चूक केली असं लक्षात येतं तेव्हा मात्र फार उशीर झालेला असतो. आणि एकदा कृती घडून गेली की त्याच्या होणाऱ्या परिणामांवर मात्र आपल्याला कंट्रोल ठेवता येणार नसतो , किंबहुना ते आपल्या हाताबाहेर असतं . आणि त्यामुळे आपल्याच कृतीचे भोग आपल्याला भोगावे लागतात. हे सगळं एकाच गोष्टीमुळे झालेलं असतं , ते म्हणजे आपण आपल्या मनाला आवर घालायला पूर्णपणे अयशस्वी ठरलेलो असतो.

हे सगळं टाळण्यासाठी आपलं मन आपल्या कंट्रोल मध्ये असणं फार गरजेचं असतं . मन कंट्रोल मध्ये असेल तर मनात जेव्हा नेगेटिव्ह विचार येतात तेव्हा त्यांना आपण व्यवस्थित हॅन्डल करायला शिकतो , जेणेकरून आपल्याला त्यापासून काही त्रास न होता ताटात येणाऱ्या केसाप्रमाणे त्यांना बाजूला करता येते. ज्यामुळे आपण आयुष्यातल्या पॉसिटीव्ह गोष्टींवर जास्त फोकस करतो , आणि आपल्याकडे काय-काय आहे याकडे लक्ष द्यायला शिकतो , ज्याने आपल्याला त्या मिळालेल्या गोष्टींबद्दल कृतज्ञता वाटायला लागते . आणि या सगळ्या गोष्टींची जाणीव किंवा विचार हा आपला आत्मविश्वास वाढवण्यासाठी महत्वाचे असतात.

नको त्यात मन गुंतलं की काय-काय गोष्टी भोगाव्या लागू शकतात याची आपल्या सर्वानाच कल्पना असते. त्यामुळे ते टाळण्यासाठी , नको त्यात मन गुंतू नये यासाठी आपल्याला काय करता येईल , कशी काळजी घेता येईल हे आपण पाहुयात:-

१. भावनिक न होता आयुष्यात येणाऱ्या परिस्थितीकडे इमोशनली आणि प्रॅक्टिकली अशा दोन्ही बाजूने बघायचा प्रयत्न करा. भावनांच्या भरात काही वेळा आपण ज्यात गुंतू नये अशा गोष्टींमध्ये अडकून बसतो . पण जेव्हा दोन्ही बाजूने विचार केला जातो तेव्हा त्याच्या परिणामांचीही जाणीव आपल्याला होते आणि मग मनाला आवर घालणं शक्य होतं .

2. आपल्या मनात येणारे सर्व विचार हे पर्मनंट नसतात . याचाच अर्थ असा की काही गोष्टींबाबतीत क्षणिक आकर्षण निर्माण झालेले असते. अशावेळी तेवढा मोहाचा क्षण नीट सांभाळता आला आणि तो मोह टाळण्यात आपण यशस्वी झालो तर हळू हळू नको त्यात न अडकणं किंवा गुंतणं आपल्याला अपोमत जमून जाईल , म्हणजेच काही दिवसांनी त्यासाठी फार विचार करून वागायची गरज देखील पडणार नाही.

3. आयुष्यात संकंटांचा काळ चालू असताना किंवा मन स्थिर नसताना कशात गुंतू नये किंवा कशात गुंताव हे ठरवणं आणि त्याचबरोबर कंट्रोल करणं फार अवघड जात. आणि त्यामुळे कित्तेकदा आपण चुकीची निवड किंवा चुकीचे निर्णय घेऊन बसतो. त्यामुळेच तर म्हणतात रागात किंवा दुःखात निर्णय घेऊ नयेत . मानसिक स्थिरता निर्णय घेताना फार महत्वाची ठरते .

4. एक नकारात्मक विचार हा अनेक नकारात्मक विचारांना आमंत्रण देत असतो. हे लक्षात घेऊन एक नकारात्मक विचार येईल तेव्हा त्याला तिथेच थांबवायला हवं. आता हे करण्यासाठी स्वतःला दुसऱ्या एखाद्या गोष्टीत गुंतवले असता आपले distraction होईल आणि तोपर्यंत ते नेगेटिव्ह विचार निघून गेलेले असतील. त्यामुळे अति विचारांच्या जाळ्यात न अडकता आपण नको त्यात गुंतण्यापासून स्वतःला वाचवू शकू.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!