Skip to content

नाजूक भावनांची काहीही गरज नसते, आपणच फार विचार करून त्या नाजूक केलेल्या असतात.

नाजूक भावनांची काहीही गरज नसते, आपणच फार विचार करून त्या नाजूक केलेल्या असतात.


मेराज बागवान


माणूस भावनांनी बनलेला असतो.भावना आहे म्हणून तो माणूस म्हणवला जातो.म्हणूनच भावना असणे खूप गरजेचे आहे.भावना म्हणजे तरी काय,भावना म्हणजे,राग,प्रेम,अहंकार,सुख-दुःख,लोभ,ईर्षा ह्या काही भावना आहेत.पण ह्या भावनांचे आपण कसे व्यवस्थापन करतो हे सर्वस्वी आपल्या हातात असते.एखादी भावना कुठपर्यंत कुरवाळत बसायची हे त्या व्यक्तीच्या हातात असते.काही वेळेस माणूस भावनांचा अति विचार करतो,तितका विचार करण्याची काही आवश्यकता देखील नसते.पण तरी देखील माणूस स्वतःहून त्या भावनांना जोपासत बसतो आणि नाजूक करतो.

भावना तर असल्याच पाहिजेत.त्याशिवाय आपण जगू तरी कसे शकतो ? पण ह्या भावनांचा अति विचार आपल्याला फार त्रास देऊन जातो.म्हणूनच भावनांचे व्यवस्थापन जमले पाहिजे.आयुष्यात समस्या नाही असे कधी होत नाही.शेवटच्या क्षणापर्यंत समस्या ह्या असणारच आहेत.पण समस्या आल्या की आपण आपल्या भावना कशा हाताळतो हे मात्र खूप महत्वाचे ठरते.समस्या जसे की ,नोकरी जाणे,किंवा व्यवसायात तोटा सहन करावा लागणे,नाती तुटणे,आर्थिक विवंचना,आजारपण यामुळे माणूस निराश होतो.हे साहजिकच आहे.

पण ह्या सगळ्या समस्या असूनही जो माणूस आपल्या भावना नियंत्रित करू शकतो तोच आयुष्यात यशस्वी होतो.खूपच आर्थिक समस्या आहेत,हातात पैसाच टिकत नाही ,म्हणून काही जण वारंवार तेच ते उगाळत बसतात.दुसऱ्याकडे सतत ह्या विषयी बोलून दुःखी होत राहतात,रडत बसतात.पण ही वेळ भावनांना कुरवाळत बसण्याची नसते.तर ही वेळ कामाला लागण्याची असते ,ज्यामुळे समस्या सुटू शकते.पण काही माणसे अनेकदा स्वतःच्या ह्या भावना खूपच नाजूक करून टाकतात. ज्याची खरे तर काहीच गरज नसते.

एखादे नाते,जसे की,प्रेम प्रकरण. काही बाबतीत,मुला-मुलींचे प्रेम जुळते.पण काही काळ एकत्र घालवल्यानंतर, कोणालातरी एकाला हे नाते नको वाटू लागते.नाते इथेच थांबवावे असे वाटत असते.आणि म्हणून मग ते नाते तुटते.मग दुसरा इतका भावूक होतो,की,सतत सतत विचार करीत राहतो.’अरे मी किती केले, तरी ती व्यक्ती मला सोडून गेली.मी स्वतःला विसरून त्या व्यक्तीसाठी किती केले पण त्याला त्याचे काहिच नाही.माझी किंमत च नाही’.

पण खरे तर वास्तव वेगळे असू शकते.जसे की लग्न होऊन नाते तुटण्यापेक्षा आधीच तुटलेले केव्हाही चांगले,अशी भावना सोडून गेलेल्या व्यक्तीची असू शकते.किंवा त्या व्यक्तीला हे नाते तितके खोल आहे,घनिष्ठ आणि विश्वासू आहे ,आपले आहे असे वाटत नसेल आणि म्हणून तिने हा निर्णय घेतला असेल.तिचे काही वेगळे प्राधान्यक्रम असतिल.ह्या सारख्या अनेक गोष्टी त्या व्यक्ती कडे असू शकतील.पण दुसरी व्यक्ती हा सगळा विचार न करता,मला कोणीतरी सोडून गेले हाच विचार सतत करित राहते.एकतर्फी प्रेमात तर असा अतिविचार होण्याची जास्त संभावना असते.पण भावना इतक्या नाजूक करण्याची गरज नसते.गरज असते ती शांतपणे सारासार विचार करण्याची.

अशा विविध गोष्टी आयुष्यात घडत असतात.आणि पुढे पण घडणारच आहेत.क्षणोक्षणी आपल्या भावनांचा कस लागत असतो.पण माणूस अशा वेळी कणखर राहण्याऐवजी,दुसऱ्या व्यक्तीकडे वारंवार काही तरी व्यक्त करीत राहतो.नाहीतर मग सतत विचार करून करून,जे वास्तविकपणे अस्तित्वात देखील नाही अशा गोष्ट पाहू लागतो.आणि आपल्या भावना स्वतःच्याच हाताने नाजूक करून घेतो.जेव्हा जेव्हा अति भावनीकतेचा प्रश्न येतो, तेव्हाच आपली खरी परीक्षा असते.तेव्हा नियतीला अपेक्षित असते की, आपण घडणाऱ्या गोष्टींना निधड्या छातीने सामोरे गेले पाहिजे आणि भावनांना व्यवस्थितपणे सांभाळून ठेवले पाहिजे.

अति विचार करून किंवा तेच ते इतरांकडे उगाळून काहिकज उपयोग नसतो.त्यामुळे समस्या सुटत नाही,तर आणखी गुंतागुंतीची होते.त्यामुळे भावनिक बुध्यांक जपता आला पाहिजे.भावनांचे सुयोग्य व्यवस्थापन करता आले पाहिजे. जेव्हा भावनीकता आयुष्यात प्रवेश करते तेव्हा खूप संयम ठेवता आला पाहिजे.मग ती भावना सुखाची असो किंवा दुःखाची.जे घडणार आहे ते घडतेच. शेवटी ,नियती,देव,नशीब ह्या गोष्टी कुठे तरी दडलेल्या असतातच.पण आपल्या हातात एक गोष्ट कायम असते.ती म्हणजे,’आयुष्याचे सुयोग्य व्यवस्थापन’.आणि हे एकदा जमले की मग भावना नियंत्रित करणे सोपे जाते.

आयुष्यात कधी काय घडेल सांगता येत नाही.निसर्गाचा हा नियम आहे,नियतीचा हा डाव आहे ,नशिबाचा हा खेळ आहे.ह्याने काही फरक पडत नाही. पण जर आपण ‘आयुष्याचा खेळ खेळण्यासाठी तयार असलो तर आणि तरच’.हीच मानसिकता आज प्रत्येकाने जपली पाहिजे. आजच्या ह्या काळात मानसिक आरोग्य जपण्यासाठी आणि आयुष्याची लढाई लढण्यासाठी….


गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

👉🏽 क्लिक करा 👈🏽


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *