न ताणता माफ करून सोडून द्या, कारण तेव्हाच अंतरिक शांतता मिळू शकेल.
अपर्णा कुलकर्णी
रीचा आणि रुही दोघीही अगदी बालपणीच्या मैत्रिणी. दोघीही एका जीवाने एकत्र रहात होत्या. दिसायला दोघीही खूप सुंदर होत्या. रीचा जरा मॉडर्न राहणारी होती आणि रूही देखणीच होती पण तिचे राहणीमान अगदीच सालस आणि लोभसवाणे होते. लांबसडक केस, कमानीय बांधा, टपोरे डोळे आणि हसरा चेहरा. मग कोणी तिच्या प्रेमात पडले नाही तरच नवल म्हणावे लागेल.
कॉलेजमध्ये अनेक सुंदर मुलींच्या गर्दीत रचीतला एका क्षणार्धात रूही आवडली होती. रुहि दिसायला तर सुंदर होतीच पण माणुसकी अगदी कुटून कुटून तिच्यात भरलेली होती. त्यामुळे दिसण्यासोबतच तिचे गुण पण प्रेमात पाडतील असेच होते. रचित तर तिच्यावर फिदाच झाला होता. कॉलेजच्या शेवटच्या दिवशी प्रपोज करायचे ठरवून त्याने रूहिला लग्नाची मागणी घातली होती. रचित खूप देखणा होता शिवाय खूप श्रीमंत होता. त्यामुळे कोणत्याच मुलीकडे रचितला नाकारण्याचे कारण नव्हतेच. पण रुहिला त्याची श्रीमंती नको होती तर त्याचा गोड स्वभाव आणि आतापर्यंत मिळत आलेला पाठिंबा हवा होता.
रचितनेही ते हसत हसत मान्य केले होते. कारण रुही पहिल्यापासूनच महत्वकांक्षी मुलगी असल्याचे त्याला माहित होते. रूही खूपच आनंदी होती आणि या आनंदात तिला तिच्या अगदी जवळच्या मैत्रिणीला म्हणजे रिचाला सहभागी करून घ्यायचे होते. रचित आणि तिच्या लग्नाबद्दल जेंव्हा रिचाला समजले तेंव्हा तिलाही खूप बरे वाटले.
बघता बघता रुही आणि रचितच्या संसाराला सुरुवात झाली. काहीच दिवसात घरात सगळ्यांशी भांडून रिचाने घर सोडले आणि हे रूहीला समजताच रुही तिला सासरी घेऊन आली. त्यात ती रचितची ओळख सांगून घरात रहात होती हे रचितला आवडत नव्हते. कारण पहिल्यापासूनच रचितला रिचाचा स्वभाव काही आवडत नव्हता. तिची बघण्याची नजर, सतत रुही आणि तिच्यात होणारी लुडबुड त्याला पटत नव्हती पण रूही दुखावली जाईल म्हणून तो काही बोलत नव्हता.
रचितने बऱ्याचदा रिचाला समजावण्याचा प्रयत्न केला होता पण तिच्या वागण्यात काहीच फरक पडला नव्हता. रचितला मात्र ते सगळेच खूप चुकीचे घडत असल्याची जाणीव होत होती पण रुहिला कसे सांगावे हे मात्र समजत नव्हते. एकदा अचानक रुहीच्या बाबांनी तिला भेटायला बोलावले असल्याने ती दोन दिवसांसाठी बाबांकडे गेली होती. त्यावेळी रिचाने पण तिच्याच सोबत माहेरी यावे असे तिला वाटत होते पण रिचाने कामाचे निमित्त पुढे करून तिथेच थांबण्याचा निर्णय घेतला.
रचित त्याच्या रूममध्ये बसलेला असताना रिचा मुद्दाम रचितकडे आली आणि गप्पा मारू लागली त्याच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करू लागली. रूही घरात नसताना रिचाने असे येणे त्यात जवळीक साधण्याचा प्रयत्न करणे रचितला आवडले नव्हतेच. त्याने तसे बोलून दाखवून पण रिचा काही केल्या जायला तयार नव्हती. शेवटी रचितने तिच्या बागण्यामागचे कारण काय ते विचारले तेंव्हा रिचा म्हणाली, मी आधीपासूनच तुझ्यावर प्रेम करत होते, मला तू आवडत होतास पण तू मला नाही रूहिला लग्नाची मागणी घातली आणि तिच्यासोबत संसाराला लागलास.
पण माझे काय ?? तू माझा विचारच केला नाहीस. अजूनही मी तुझ्यावर तीतकेच प्रेम करते आहे. रचित म्हणाला, तू माझ्यावर प्रेम करत होतीस आणि आहेस हे मला आत्ता समजले आहे, तेंव्हाच बोलून दाखवले असतेस तर मी तुझ्यावर नाही रुहीवर प्रेम करतो हे स्पष्ट सांगितले असते. मग इतके दिवस आमच्या लग्नामुळे खुश असल्याचे का दाखवत होतीस. पण रूही तर तुझी मैत्रीण आहे ना तरीही तू असे कसे बोलू शकतेस ?? ते काहीही असले तरीही माझे तुझ्यावर आजही तितकेच प्रेम आहे ही वसतुस्थिती बदलत नाही रचित आणि मला तू हवाच आहेस.
तिच्या या बोलण्यावर दारातून हे सगळं ऐकत असलेल्या रूहिच्या हातातून बॅग खाली पडली आणि तिच्या चेहऱ्यावरील भाव बघून तिने सगळे ऐकले आहे हे समजायला रचित आणि रीचाला वेळ लागला नाही. त्यामुळे रचित खूप घाबरला पण रूहीने त्याच्याकडे न बघता सरळ रिचाला थोबाडीत मारली आणि दुसऱ्याच दिवशी तिला घरातून आणि आयुष्यातून कायमचे बाहेर काढले.
रचित रूहीला कसे बोलावे याचा विचारत असतानाच रूही त्याच्याशी एकदम काहीच घडले नसल्यासारखे बोलत होती आणि रचितला त्याचीच भीती वाटत होती. कारण मनाला कितीही लागले तरीही कोणाला न दुखवता आतल्याआत कुढत राहण्याची तिची सवय होती. जोपर्यंत ती बोलून मोकळी होणार नाही तोपर्यंत तिची घुसमट कमी होणार नाही हे रचीतला माहीत असल्याने त्याने तिला बाहेर नेले.
पण रूही शांत होती, शेवटी रचित म्हणाला, झाल्या प्रकरात माझी काहीच चूक नव्हती पण तुला माझा राग आला असेल तर मी तुझी माफी मागतो रुही. तुझी चुक नाही रचित पण माझ्या बालपणीच्या मैत्रिणीने माझ्या संसारात विष कालवावे, माझ्या प्रेमावर स्वतःचा हक्क गाजवावा हेच मला सहन होत नाही रुही म्हणाली. त्यावर रचित म्हणाला जे झालं गेलं ते न ताणता माफ करून सोडून दे, कारण तेंव्हाच तुला आंतरिक शांतता मिळू शकेल.
गोळ्या घेण्यापेक्षा मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

