Skip to content

“जे तुम्हांला जमणार नाही असं लोकांना वाटतं, ते कसं साध्य करायचं??”

“जे तुम्हांला जमणार नाही असं लोकांना वाटतं, ते कसं साध्य करायचं??”


मधुश्री देशपांडे गानू


एका सुशिक्षित, सुसंस्कृत घरात एक मुलगा जन्माला येतो. जन्मत:च अपंग. मूकबधिर आणि पायातही दोष. आई वडील हादरून जातात. अशा मुलाला कसं वाढवायचं?? याचं कसं होणार?? शेजारीपाजारी, नातेवाईक नको नको ते बोलतात. नातेवाईक संबंध जवळ जवळ तोडून टाकतात. या मुलामुळे कुठेही जाणे येणे शक्य होत नाही. तरीही पालक मोठे जिद्दीचे. परमेश्वराने त्यांना दिलेलं हे चॅलेंज ते स्वीकारतात.

आणि तन-मन-धन ओतून त्या निष्पाप जीवाला जगवण्याचा, त्याच्या आयुष्याला अर्थ देण्याचा अथक प्रयत्न करतात. असं मूल वाढवणे किती कष्टाचं आहे.. शारीरिक, मानसिक, भावनिक पातळ्यांवर थकवणारं आहे, हे ज्याचे त्यालाच माहित! बरोबरची मुलं चेष्टा मस्करी करतात. नावं ठेवतात. तरीही ते प्रयत्न सोडत नाहीत. या मुलाला काहीच जमणार नाही असं लोकांना वाटतं. त्या मुलाला दहावीपर्यंत शिक्षण देतात. त्याला कायमस्वरूपी नोकरी मिळते.

पुढे यथावकाश त्याचं लग्न होतं, मुलगा होतो. सामाजिक दृष्ट्या हा दिव्यांग आर्थिक दृष्ट्या सक्षम, स्वावलंबी आणि संसारी होतो. आज समाधानाने जगत आहे. लोकांच्या, समाजाच्या दृष्टीने अशक्यप्राय वाटणारा हा प्रवास त्या आई वडील आणि मुलाने शक्य, यशस्वी करून दाखवला. आपण अनेक यशस्वी लोकप्रिय व्यक्तींचा जीवन प्रवास वाचतो, ऐकतो. पण ही एका सामान्य माणसाची असामान्य सत्यकथा आहे.

समाजाचे नियम फार क्रूर असतात. समाज नेहमीच तुमच्या दुबळ्या जागेवर प्रहार करतो. आर्थिक, शारीरिक, मानसिक दुबळेपण हे समाजाच्या चेष्टेचा विषय असतो. गॉसिपचा विषय असतो. पण त्याकडे लक्ष न देता लोकांना तुम्हांला जे जमणार नाही असं वाटतं, ते साध्य करण्यातच खरं जीवनाचं सार आहे, यश आहे. “मुळात लोकांना काय वाटतं? याचा आपल्या मनावर अजिबात परिणाम न होऊ देणे हीच पहिली पायरी आहे काही साध्य करण्याची.”

हे जीवन तुमचं आहे. या जीवनाच्या प्रत्येक क्षणावर सर्वस्वी तुमचा हक्क, अधिकार आहे. तुम्ही यशस्वी झालात किंवा अयशस्वी, बोलणाऱ्या लोकांना काहीही फरक पडत नाही. काही वेळा तर तुम्हीं कितीही यशस्वी झालात तरी काही लोक तुम्हांला फक्त नावंच ठेवतात. मग लोक काय म्हणतील? किंवा म्हणतात? याला तुमच्या दृष्टीने काही महत्त्व असण्याचं कारणच नाही. हां! आता तुम्हांला जे जमणार नाही ते कसं साध्य करायचं यावर तुम्हांलाच प्रयत्न करावे लागतील.

प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात एक ध्येय, एक उद्दिष्ट असतंच. ते साध्य करण्यासाठी प्रत्येक व्यक्ती प्रयत्न करत असते. लोक काय म्हणतील? याचा विचार करत बसलो तर आपण आपलं ध्येय साधणार कसं? आणि “लोक काय म्हणतील?” असं काही अस्तित्वातच नसतं. त्यामुळे तुम्हांला जे जमणार नाही असं वाटतं ते तुमच्या आयुष्यात कसं घडेल, त्यासाठी तुम्हीं काय करू शकता ते पाहू.

१) तुमच्या मनाची योग्य, पोषक वृत्ती विकसित करा. तुम्हांला प्रेरित करणाऱ्या व्यक्ती शोधा. मग ते तुमचे पालक, शिक्षक, मित्र-मैत्रिणी कोणीही असू शकेल. त्या व्यक्तीचे गुण लिहून काढा. त्यांनी अडचणींवर कशी मात केली ते लिहून काढा. यशस्वी व्यक्तींचे चरित्र वाचा.

२) स्वतःवर ठाम विश्वास असू द्या. तुमच्या ध्येयाबद्दल तुमची मतं स्पष्ट असायला हवीत. स्वतःचे गुणदोष ओळखता यायला हवेत.

३)समाजाने तुमच्याबाबत निर्माण केलेला साचा मोडून काढा. कधी लोकांसाठी त्यांना हवे तसे बनू नका. तुम्हीं तुमचे तुम्हांला खरे सापडायला हवेत. “find your true self.”

४) तुमच्या आसपासची माणसं सगळी तुम्हांला साथ देतीलच असे नाही. काही विरोध करणारी, नाउमेद करणारी ही असणार, हे आधीच लक्षात ठेवा. नकारात्मक लोकांपासून लांब राहा. लोकांना ज्यातलं कळत नाही आणि स्वतःला करता येत नाही, त्याबद्दल ते नेहमी नकारात्मक मत व्यक्त करतात.

५) Do’s and Don’t’s विचारात घेऊन प्लॅन बनवा. तुम्हांला कशामुळे आनंद मिळतो हे ठरवणं महत्त्वाचं आहे. सुस्पष्ट उद्दिष्ट आणि वेळेची मर्यादा घालून घ्या.

६)जे ध्येय impossible आहे असं तुम्हांला वाटतं, त्यात अडचणी तर येणारच. सोपं काहीच नसतं. मूलभूत अडचणी जसं की पैसा, वेळ, भीती.. यांची मानसिक तयारी ठेवा. प्लॅन बी तयार ठेवा. विचारांचे सुनियोजन आणि लवचिक दृष्टिकोन व धोरण इथे गरजेचं आहे.

७) तुमचा वेळ हीच तुमची संपत्ती आहे असं समजा. त्यामुळे सातत्य, अथक प्रयत्न गरजेचे आहेत. वेळापत्रक बनवा आणि ते कटाक्षाने पाळा.
८) तुमची रोजची प्रगती लिहून ठेवा. रोजचा सराव, प्रगती, छोटे यश हे लिहून काढा.

९) स्वतःला सतत प्रेरणा देत रहा. स्वतःला मानसिकरित्या सशक्त बनवण्यासाठी प्रयत्नशील राहा. छोट्या यशाकरता स्वतःलाच बक्षीस द्या. उदा. एखादं चॉकलेट. आणि काही चूक झाली तर स्वतःला शिक्षा द्या. उदा. दिवसभर टीव्ही न पाहणे.

१०) आपले ध्येय कठीण आहे याची जाणीव असू द्या. व्यावहारिक आणि वास्तविक पातळीवर मनाप्रमाणे घडेलच असे नाही. अपयश येणार याचे भान असायला हवे. त्याची मानसिक तयारी हवी.

११) तुमचे ध्येय, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वरील सर्व प्रयत्न मनापासून करा. पण हा जो प्रवास आहे, त्यातील प्रत्येक क्षण enjoy करा. आत्ताचा क्षण पूर्णत्वाने जगा.
१२) पुन्हा पुन्हा प्रयत्न करा. यश मिळाले नाही तरी प्रयत्न सोडू नका. ध्येयापासून विचलित होऊ नका. “प्रयत्नांती परमेश्वर.”

तुम्हीं तुमच्या सुखी, आनंदी, यशस्वी जीवनासाठी ठरवलेले ध्येय, उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी संपूर्णपणे जिवापाड प्रयत्न करा. केवळ लोक म्हणतात तुला हे जमणार नाही म्हणून तर अजिबात करू नका. तर स्वतःची पात्रता, योग्यता, मानसिक, शारीरिक, आर्थिक क्षमता ओळखून ध्येय ठरवा. छोट्या छोट्या उद्दिष्टांनी मुख्य ध्येयापर्यंत पोहोचा. फक्त स्वतःवर पूर्ण विश्वास ठेवून, स्वतःवर लक्ष केंद्रित करून प्रयत्न करा. मग यश फक्त आणि फक्त तुमचेच आहे. आणि हे तुमच्या आनंदाचे आणि समाधानाचे कारण असेल.. लोकांच्या नाही…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on ““जे तुम्हांला जमणार नाही असं लोकांना वाटतं, ते कसं साध्य करायचं??””

  1. धन्यवाद खूप प्रेरणादायी लेख नक्कीच सकारात्मक फरक पडेल प्रयत्नांती परमेश्वर

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!