Skip to content

घराचा कोपरांकोपरा शोधला, पण कुणास ठाऊक आई-बाबा स्वतःची दुःखे कुठे लपवतात.

घराचा कोपरांकोपरा शोधला, पण कुणास ठाऊक आई-बाबा स्वतःची दुःखे कुठे लपवतात.


हर्षदा नंदकुमार पिंपळे


आईबाबांची दुःखं………अगदीच नाजूक आणि हळवा विषय..!

झाडांची पानं झडतात,
कुणाला कळतं का…?
उमलत्या फुलाच्या पाकळ्याही
गळून पडतात,
कुणाला कळतं का…?
कधीकधी डोळ्यातील अश्रुही
सुकून जातात,
कुणाला काही कळतं का….?

नाही नं……..? अगदी याच प्रमाणे आपले आईबाबा आणि त्यांची सगळी दुःखं…! कितीही शोधायचा प्रयत्न करा पण आईबाबा त्यांची दुःखं केव्हा नी कुठे लपवतात काहीच कळत नाही. अगदी शेवटपर्यंत आपण याबाबतीत अजाणते ते अजाणतेच राहतो.

खरचं काही कल्पना असेल का कुणाला याची…? कधी कधी वाटतं पिंजून काढावा घराचा एखादा तरी कोपरा! कदाचित आईबाबांनी त्यांची दुःखं तिथे लपवली असतील. टेबलाच्या मागे नाहीतर त्या शोकेसमध्ये….. किंवा अगदीच म्हंटल तर त्या छोट्याशा फुलदाणीमध्ये…..!

पण खरं सांगायच तर पिंजून काढला एखादा कोपरा तर फार फार साचलेली धूळ नी जळमटं आपल्याला सहज मिळतील.पण त्यांची दुःखं काही आपल्याला गवसणार नाहीत.

पहा नं…,आयुष्यात इतकी दुःखं असतात परंतु आपल्या पिल्लांना आईबाबा त्या दुःखाची कणभर चाहूलही लागू देत नाही. आईबाबा एखाद्या सूर्यासमानच भासतात. क्षणाक्षणांच दुःखं मनाच्या ओंजळीत घेऊन ते अगदी बिंधास्त वावरताना दिसतात. ईतकच नाही तर कधी निरोप देतानाही तो निरोप आईबाबा हसऱ्या ओंजळीनेच देतात.(जणू एखाद्या मावळतीचा सुखावणारा सूर्यास्तच..!) चेहऱ्यावर दुःखाचा कणभरही लवलेश ते दाखवत नाही. खरच कळत नाही ते इतकं उसणं हासू आणतात तरी कुठून …?

किती नी कोणकोणत्या प्रकारची दुःखं आईबाबांना सहन करावी लागत असतील माहीत नाही. त्यांची दुःखं काही कमी नाहीत परंतु याची जाणीव मात्र ते आपल्याला कधीच होऊ देत नाहीत. याउलट आपल्याही दुःखात ते अगदी सहजपणे मिसळून जातात. आपल्या चेहऱ्यावर हसू कसं उमटवता येईल याचा ते विचार करतात.

कधी मनात विचार येतो की ही आईबाबांची दुःखं आपल्यासोबत लपंडाव तर खेळत नाहीत नं….? इथे शोधलं तर तिथे, तिथे शोधलं तर इथे….! आणि ही दुःखं मागून येऊन धप्पाही देत नाहीत. वाटतं त्यांनी धप्पा तरी द्यायला हवा होता. कदाचित त्यामुळे आईबाबांच्या दुःखाला थोडं समजून घेता आलं असतं.

परिस्थिती कोणतीही असुद्या आईबाबा त्या परिस्थितिचा आपल्या मुलांवर कोणताही विपरीत असा परिणाम होऊ नये यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात. आपण जे दुःख सहन करतोय तेच आपल्या मुलांनी पुढे जाऊन सहन करत बसावं अशी त्यांची अजिबात इच्छा नसते.

मुलांच्या कोणत्याही सुखदुःखात ते स्वतःच्या दुःखाचा भार बाजूला ठेवून अगदी निःशंकपणे सहभागी होतात.नाहीतर आपण आपल्याच दुःखाचा किती काळ गोंधळ घालत बसतो.’माझं दुःखं मोठं – मोठं’ करत जगात इतरत्र पहायच आपण विसरूनच जातो. एक आपण आणि एक आपले आईबाबा….! किती विरुद्ध आहे नं….?

खरचं या आईबाबांकडून बरच काही शिकण्यासारख आहे.आपल्या दुःखाचा कधी बाजार मांडायचा नसतो हे आईबाबा सहज शिकवून जातात.इतकच नव्हे तर आपण त्यांना चुकूनही क्षणभर का होईना खिन्न वगैरे दिसलो तर आपल्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेतल्याशिवाय ते स्वस्थही बसत नाहीत. “काय आहे…. ? काय झालं आहे…? आपण त्यावर नक्की काहीतरी मार्ग काढूयात, तु टेन्शन घेऊ नको….”

पाठीवर हात ठेवून असे बोल बोलून आपलं दुःखं त्यांच्या ओंजळीत घेणारे हे आईबाबा खरच खूप म्हणजे खूप “ग्रेट “आहेत.कारण दुसऱ्याच दुःखं पदोपदी स्वतःच्या ओंजळीत घेणं म्हणजे एखादा हास्यविनोद मुळीच नाही. त्यासाठी धैर्य असावं लागतं. आणि हे असं धैर्य केवळ आईबाबांकडेच असावं असं वाटतं.

पण राहून राहून एक गोष्ट सतावत राहतेच……ती म्हणजे आईबाबांच दुःखं….! अनेक प्रश्न मनात रेंगाळत राहतात. आईबाबा त्यांची दुःखं एकमेकांशी तरी शेअर करत असतील नं….? की एकमेकांना कोणताही छोटासाही त्रास नको म्हणून ते दुःखं शेअरच करत नसतील…? आणि मग आईबाबा त्यांच दुःखं नेमकं कुठे ठेवत असतील…?

कुणाशीही शेअर करताना दिसत नाही मग ते दुःखं त्यांच्या मनात साचत असेल का…? हे साचलेल दुःखं त्यांना आतून अक्षरशः पोखरून तर काढत नसेल नं….?? बापरे….! काही विचारूच नका.प्रश्नांची लंबी लिस्ट क्षणाक्षणाला वाढतच जाते.पण उत्तरं मात्र काहीही केल्या मिळत नाहीत.

उत्तरं मिळणं तसं कठीणच आहे पण तरीही असं वाटतं की आपल्या सुखात आपले आईबाबा त्यांच सुख पहातात. आपला छोटा आनंद हा त्यांच्यासाठी खूप मोठा असतो.आणि आपल्या मुलांच कोणतही दुःखं हलकं झालं की त्यांच्या मनातील साचलेला सगळा दुःखाचा किनाराही सहज हलका होत असावा.त्यांची दुःखही हलकी होत असावी. कदाचित……!.

पण ही दुःखं कळाली असती तर खूप छान वाटलं असतं.आपल्या आईबाबांच्या मनाची घालमेल जवळून समजून घेता आली असती.

प्रिय आईबाबांना एक विनंती आहे….

शक्य असल्यास तुमचं दुःखं आमच्याशी शेअर करा.आम्हाला आवडेल तुमचं दुःखं , तुमच्या व्यथा जाणून घ्यायला. मनातील असं थेट जाणून घ्यायला आम्ही इतके मोठे अजून झालोच नाही. त्यामुळे प्लीझ किमान एकदा तरी तुमचं दुःखं आम्हाला शांतपणे जाणून घेऊद्या.

मनात साचलेल सगळं एखाद्या व्यक्तीला आतून पोखरून काढतं इतकं समजू शकतो.तितके समजदार झालो आहोत आता.तुम्ही आम्हाला नेहमी सांगता , मुलांनो तुमच्या सुखात आमचं सुख आहे वगैरे….. अगदी तसच आईबाबा तुमच्या सुखात आमच सुख आहे.आणि तुमच्या दुःखातही आम्हाला मिसळून जायचय.

पण तुम्ही नेहमी हसत असतात. तुमचं दुःखं कधीच जाणवू देत नाहीत. त्या फुललेल्या फुलामागे एक कोमेजलेली कळी नक्कीच असते.

मनापासून रिक्वेस्ट करतोय आम्ही….प्लीझ एकदा आम्हालाही कळुद्या नेमकं दुःखं काय असतं…? खऱ्या दुःखाची चव काय असते ते…? आम्ही घराचा कोपरांकोपरा शोधला पण तुमची दुःखं कुठेच नाही दिसली.एकदा फक्त एकदाच तुमची दुःखं आमच्या ओंजळीत देऊन पहा….एक दिवस तुमचे आईबाबा होण्याची संधी आम्हाला द्या…. आमच्यातील एक मुल होऊन सगळं शेअर करून पहा……केवळ आमच्या हट्टासाठी……!

तुमची न सापडलेली दुःखं आम्हाला सापडतील……कदाचित..!


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

1 thought on “घराचा कोपरांकोपरा शोधला, पण कुणास ठाऊक आई-बाबा स्वतःची दुःखे कुठे लपवतात.”

  1. खुप छान.
    डोळे टचकन पाण्याने भरून आले.

    Miss u बाबा😭

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!