Skip to content

आपली बाजू समजेल इतपतच बोला बाकी समोरच्याने समजून घेतलं की नाही, हा त्यांचा प्रश्न!

आपली बाजू समजेल इतपतच बोला बाकी समोरच्याने समजून घेतलं की नाही, हा त्यांचा प्रश्न!


हर्षदा नं.पिंपळे


मी बोलत राहतो,बोलत राहतो
बोलतच राहतो…….
समोरचा समजून जाईल,
समोरचा समजून घेईल…
याच आशेवर मी तासनतास
माझी बाजू मांडत राहतो….
माझी बाजू समजली असेल
हेही मी निःशंकपणे गृहीतच धरतो…
पण शेवटी….
पण शेवटी माझी बाजू
समजली की नाही…?
राहून राहून मला
असाही एक प्रश्न पडतो…!!

पहा , असं होतं नं तुमच्याही बाबतीत…? अनेकदा आयुष्यात अशा काही गोष्टी घडतात,अशा काही घटना घडतात तेव्हा आपल्याला आपली बाजू समोरच्याकडे स्पष्टपणे मांडायची असते.पण ती कशी मांडायची हेच आपल्याला समजत नसतं.अनेकदा तर आपण तासनतास बोलूनही आपली बाजू समोरच्याला समजत नाही.आणि बाजू समजली तरी समोरचा समजून घेतोच असं नाही.

म्हणजे पहा आपण इतकं बोलूनही समोरच्या व्यक्तीला अनेकदा काहीच कळत नाही. किंवा कळूनही ती न कळल्यासारख करते.त्यामुळे आपण ओघामध्ये कितीतरी वेळ समजवण्याचा प्रयत्न करत असतो.असं नाही समजत तर तसं समजून पाहूयात. वगैरे वगैरे विचार आपण करत रहातो.पण समोरच्याला ते समजत नाही किंवा तो समजून घेण्याचा प्रयत्नही करत नाही.

आपण मात्र आपला वेळ खर्च करून आपली बाजू सांगण्याचा खूप प्रयत्न करत राहतो. त्यामुळे विचार करा.शक्यतो आपली बाजू समजेल इतकच बोला.तासनतास आपली ऊर्जा खर्च करून , वेळ खर्च करून जर समोरच्या व्यक्तीला काही समजून घेताच येत नसेल तर त्याला काय अर्थ आहे. आपलं बोलणं अशावेळी व्यर्थच वाटणार नं..?

एकीकडे आपण एका मर्यादेपलीकडे जाऊन सातत्याने आपलं म्हणणं सांगण्यासाठी धडपडतो. पण तसं पाहिलं तर त्याचा बऱ्याचवेळा काहीही उपयोग होत नाही.आपण बोलत रहातो, समोरचा ते ऐकत राहतो..पण त्यातून काहीच साध्य होत नाही. वेळ आणि ऊर्जा मात्र मोठ्या प्रमाणात खर्च होत रहाते.

आपण असा विचार करत राहतो की समोरच्याला समजत नाहीये तर आपण अजून वेगवेगळ्या प्रकारे समजावून पाहूयात. किंवा मग जोपर्यंत समजत नाहीये किंवा समजून घेता येत नाहीये तोपर्यंत आपण त्याला सांगत राहूया.कदाचित समजून घेता आलं तर घेतील वगैरे…. वगैरे. म्हणून आपण एखादी गोष्ट जीवाच्या आकांताने सांगत असतो.आपण बोलत राहतो,बोलत राहतो. समोरच्याला समजत नाही म्हणून आपण पुन्हा पुन्हा न थकता तेच सांगत राहतो.पण या सगळ्यामध्ये आपण आपल्या वेळेचा विचारच करत नाही. आपल्या एनर्जीकडे लक्षच देत नाही. बोलून बोलून आपण आपला किती वेळ घालवला आहे हेही आपल्या सहजासहजी लक्षात येत नाही.

पहा, विचार करा…समोरच्याशी बोलताना त्यातच गुंतून जाऊ नका.किती बोलायच नी किती नाही ह्याचा विचार करा.बोलताना किती वेळ बोलतोय याचं भान ठेवायला विसरू नका.समोरच्याला समजेल अशा एका विशिष्ट मर्यादेपर्यंत जाऊन जरूर बोला.पण नंतर मर्यादेपलीकडे जाऊन स्वतःचाच अमूल्य असा वेळ वाया घालवू नका.कारण अनेकदा समोरच्याला समजल की नाही हा त्यांचाच प्रश्न असतो.ते समजून घेतायेत की नाही हे खरतरं त्यांनाच माहीत असतं.आपण उगाचच त्यांच्याभोवती कितीतरी वेळ घुटमळत राहतो.

इतकच नाही तर अशावेळी आपण हेही विसरतो की प्रत्येकाची समजून घेण्याची कुवत/क्षमता ही वेगवेगळी असते. प्रत्येकजण अगदी सगळ्याच गोष्टी easily समजून घेऊच शकतो असं नाही.त्यामुळे नेहमीच समोरचा समजून घेईल या आशेवर सातत्याने बोलत बसू नका.

एका मर्यादेपर्यंत हेही समजून घ्या की समजून घेणं आणि न घेणं हा सर्वस्वी समोरच्या व्यक्तीचा प्रश्न आहे. समोरच्याला आता नाही नंतर समजेल असं समजून सारख सारखं बोलत रहाणं योग्य नाही हेही समजून घ्या. आणि जेवढं शक्य होईल तितकच बोला.समोरच्या व्यक्तीला समजेल नाही समजेल या गोष्टींचा जास्त विचार करत बसू नका.तुम्ही केवळ सांगायचा प्रयत्न करा, समजेल अशी बाजू मांडायचा प्रयत्न करा.बाकी तळाशी जाऊन समोरच्याने समजून घेतलं की नाही याचा विचार करत बसू नका.

पुढे अनेक गोष्टी थांबलेल्या असतात थोडा त्याचाही विचार करा.थोडं त्याचही भान ठेवायला विसरू नका.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!