मनाच्या मागे वाहत जायचे की त्याला योग्य संस्कारांशी, कार्याशी वारंवार जोडुन द्यायचे?
संतोष राजदेव
जेव्हा मोबाईल क्रांती झाली नव्हती अशा नव्वदीच्या दशकातील शहरातले जुने दिवस आठवतात…त्यावेळी हातावरचे पोट असणारी माणसे राब राब राबायची.अंगमेहनत करावी लागल्याने सर्वांग थकायचे…मग आपसुकच तर्राटुन भुक लागायची…जेवता जेवता दिवसभरात घडलेले किस्से सांगत गिळलेला घास मग आणखीनच गोड लागायचा…मोबाईल तंत्रज्ञान वाढले नसल्याने माणसे माणसासंगे बोलायची खुप!..कधी एकदाचे बोलतो,सांगतो अशी आतुरता माणसांमाणसात असायची…कुटुंबातला कर्ता माणुस कामानिमित्ताने बाहेर जाऊन आल्याने त्याचे किस्से रात्री ऐकायला कानात आतुरता असायची…
अशाच एका हमालीचे काम करुन काबाडकष्ठ करणा-या आनंदाच्या कुटुंबातली ही गोष्ट….सकाळी पहाटे आनंदा लवकर उठला…रात्रभर गरीबीच्या अस्वस्थतेने छळल्याने त्याची पुरेशी झोपही नीट झाली नव्हती..तरीही मनाशी कसला तरी निश्चय करत प्रातःविधी सकाळी सहालाच गड्याने उरकला..”काहीही झालं तरी लेकराबाळांच्या चेह-यावर मी आज हसु आणणारच”,अशी अटगळ मनाशी बांधत गड्याने कारभारनीने दिलेला चहाचा घोट पाणी समजुन गपकन तोंडात घेतला,थोडीशी जीभ चरचरली..लागलीच त्याने पटापट पाणी प्यायले…थोडसे हायसं वाटले…जिभेला भाजलेल्या चटक्यापेक्षा गरीबीच्या चटक्यांना तो अधिक वैतागला होता…त्यामुळे जाग्यावर बसुन दुःख झाले तरी ते उगाळत बसणा-यातला तो नव्हताच मुळी..
कारभारनीलाही सगळं समजत असतानाही ती बिचारी जास्त बोलु शकत नव्हती..( आज जर अशी परिस्थिती असती तर आजच्या शिकलेलीने चांगलं समजावलं असतं..)..गडी खांद्यावर उपरणं टाकुन निश्चय करुन हमालीसाठी निघाला. ज्या आवेशात तो निघाला त्याच आवेशात त्याने दिसभर न थांबता कामे केली..दुपारचा प्रहर डोक्यावर आला ..पोटात काही नाही तरी तो राबतच होता…मालकाने न्याहरीसाठी दिलेले पैसेही त्याला खर्च करु वाटेनात..काही सहकारी आजची व्यवस्था मार्गी लागल्याने दुपारच्या वेळी आपापल्या घरी परतले..पण गड्याचे तसे काही नव्हते…
त्याचा निश्चयच काही वेगळा होता !..शेजारच्या टपरीवरनं दोन वडापाव त्याने काम करता करता असे काही हाणले की ते संपले कधी,ते समजलंच नाही…गडी नंतर दुस-या पाळीत आलेल्या कामगारांसमवेतही उभा राहिला..अंगात त्राण नसतानाही ..उन्हं डोक्यावर आल्याने भोवळ आली असतानाही गड्याने बरीचशी मेहनत करत आजच्या दिवशी तिप्पट कमाई केली…रात्र झाली ..रात्रीचे नऊ वाजले..घरची ओढ लागली…मग तो परतीकडे निघाला..पोरंबाळं खुश व्हावी म्हणुन घरी जाताना लेकरांना थोडं चांगलचुंगलं खायला घेतले..
उंबरठ्यावर आल्याआल्या पोरं ओरडली….”दादा आला …बाप्पा आला..”..कारभारनीचीही सारी कामे केव्हाची आटोपुन झाली होती..गडी आल्यावर तिच्या मनात आनंद झालेला असला तरी गरीबीपायी चेह-यावर खट्टू च होतं जरासं.. असो ,तोही आवरून जेवायला बसला…जेवताना पोरंबाळं विचारायची तेव्हा गड्याने हळुच कारभारणीच्या चेह-याकडे पाहत आज तिप्पट कमाई झाल्याचे सांगितले…कारभारनीच्या चेह-यावर हलकेसे स्मित आले,ती अनिमिष नेत्रांनी क्षणभर पाहत राहिली, ते पाहता क्षणी गड्याचाही आत्मविश्वास दुणावला,सुखावला..
त्या रात्री जेवता जेवता दिवसभराचे सगळे प्रसंगवर्णन सांगत सांगत सर्व कुटुंब खेळीमेळीने जेवले..गड्याने आणलेला आवडता खाऊही सगळ्यांनी आवडीने खाल्ला..त्यादिवशी झोपही निवांत लागली…आपण असेच उद्याही अजुन करुयात म्हणुन गड्याने मनाशी खुणगाठ बांधली होती.दुस-यादिवशी सुद्धा गडी पहाटे सहा वाजता कामावर हजर झाला…नशीबाने पहिल्या दोन तासातच एका मोठ्या मालकाची चार हमालीची कामे सहज भेटल्याने चार तासातच आदल्या दिवशीपेक्षाही पाचपट अधिक कमाई झाली..गडी खुप खुश होता..
पाहिल्या पाळीतच बक्कळ पैसा हाताशी आल्याने गडी दुपारी बारा वाजताच घरी हजर झाला..कुंटुबही अवाक झालं..नेहमी रात्री काम करुन येणारे वडील दुपारी बारा वाजताच घरी आल्याने पोरांनाही बरे वाटले…दुपारचे जेवण करायला सगळे बसले खरे …पण आदल्यादिवशीची जी मज्जा जेवताना आली होती..ती मात्र काही येत नव्हती..कारण आज संघर्ष कमी झाला होता..कमाई आदल्या दिवशीपेक्षा जास्त चांगली झाली हे सांगुनही ती मज्जा काही येईना…म्हणुन मनोमन विचार करत त्याने खोटी पण काल्पनिक एक कथाच तयार केली व ती ऐकवली..
तो इतरांना खोट्टं म्हणाला…”आज किती जणांना जे जमले नाही,केवळ मी एकट्याने केले, म्हणुन कमाई जास्त झाली,…मालकाला व त्याच्या लहान पोराला संकटातुन मी एकट्याने वाचविले….मालक फक्त माझ्या एकट्यावरच खुश आहेत,…”हे ऐकुन सगळ्यांना हायसं वाटले..पोरंबाळं आणि ‘ती मनापासून ‘ सुखावली आणि मग आमोद प्रमोद करत सगळे जेवले….
दुस-या दिवशी गड्याने मेहनत कमी करुन जास्त फायदा होऊनही जगणं अळणी लागत होते…अख्खा दिवस मेहनत-संघर्ष करुन केलेली कमाई कमी असली तरी पत्नीचे प्रेम मिळते…आणि कमी मेहनत करुन जास्त कमाई असली तर तिचे प्रेम मिळत नाही..पत्नी अनिमिष नेत्रांनी पाहत नाही…मग सर्व काही असताना जीवन अळणी वाटायला लागते.अशावेळी जो खोटा काल्पनिक संघर्षप्रसंग जीवनात आनंद भरण्यासाठी जीवन सुसह्य व प्रफुल्लित होण्यासाठी खोट्याचाही आधार घेतला जातो.एखादे नाटक चित्रपट,वा एखादी कादंबरी….काल्पनिक जरी असली तरी जीवन सुसह्य व उल्हासित होण्यासाठी ते गरजेचे आहे.यात मग कधीकधी खरे – खोटेपणाचा,अतिशयोक्तीचा आधारही घेतला जातो.खरंतर चरित्र प्रत्यक्ष जगणं वेगळं आणि त्या जगलेल्या चरित्रावर चित्रपट ,कादंबरी,वेब सिरीज व नाटकं काढुन खिसा भरणं वेगळं….अर्थात अंगमेहनत ही दोन्ही ठिकाणी होतेच..
आजच्या काळात तत्वनिष्ठा ठेऊन प्रत्यक्ष जगणं आणि चित्रपटात वा एखाद्या नाटकात मोबदल्यासाठी तशी भुमिका तात्पुरती निभावणं
ह्यात फरक हा असणारच.चित्रपटातल्या वा नाटकातल्या हिरोला लोक खरा हिरो समजायला लागतात.मोठी गंमत तर तेव्हा होते,जेव्हा चित्रपटात बिदागी घेऊन काम करणारा स्वतःलाच “मीच तो काय खरा हिरो..बाकी सगळे झिरो”अस्सं समजायला लागतो
भगवे वस्त्र घातले की जो तो प्रणाम करतो.मग भगवेवस्त्रधारी देखील स्वतःला सर्वज्ञ समजु लागतो..लोक भगवाधारी समजुन नमस्कार करतात, ही ताकद असते त्या भगव्याची,त्या भगव्यामागे श्रमलेल्या महापुरुषांची..हे त्याला कळेपर्यंत त्या नटाचे अर्धे आयुष्य खर्ची गेलेले असते.. संतासारखा एखादा अभंग स्फुरणं व तसं जगणं हे तर दूरच पण नुसता संतासारखा अभिनय करुनही गब्बर झालेले कमी नाहीत आजच्या जगात…
तेच गणित गडकोटांबाबत….कैक ऐतिहासिक चित्रपट निघाले ,कित्येक यशस्वीही झाले पण गडकोटांच्या डागडुजीच्या धोरणाविषयीचं काय झालं?…स्वतःच्या जीवनात,आचरणात एखादा विचारगड तत्वनिष्ठपणे ज्यांना सांभाळता आला नाही ,अशी काही माणसे जेव्हा चित्रपटात, नाटकात अभिनय करुन वा कादंब-या काढुन असा काही आव आणतात की, जणु काही हेच सर्वज्ञ – सर्वेसर्वा आहेत….अर्थात कुणी चांगले चित्रपट,नाटकं,कांदब-या,वेब सिरीज काढत असतील,मग भले त्या काल्पनिक का असेना..ह्याला विरोध कुठेच नाही वा नसावाही.. पण त्याची मर्यादा प्रत्येकाला समजायला हवी.मनाच्या मागे वाहत जायचे का, मनाला संयमित, प्रगमनशील व भावनामय करुन योग्य संस्कारांशी,कार्याशी वारंवार जोडुन द्यायचे?..याचा निर्णय हा ज्याचा त्याने करायचा आहे..कारण इथे सृष्टीतला प्रत्येकजण वेगवेगळा आहे.
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!

छान विवेचन
खुप छान….