Skip to content

“मध्यमवर्गीय माणसाला चौकटीबाहेरचे कोणतीही कामे करताना खर्चाचा विचार हा येतोच.”

“मध्यमवर्गीय माणसाला चौकटीबाहेरचे कोणतीही कामे करताना खर्चाचा विचार हा येतोच.”


मधुश्री देशपांडे गानू


“अंथरूण पाहून पाय पसरावे.”

अशी लोकप्रिय मराठी म्हण आहे. म्हणजेच आपल्या वकुबानुसार, ऐपतीनुसार वागावे. आज स्पर्धात्मक युगात एका मध्यमवर्गीय कुटुंबात कितीही पैसा मिळवला तरी तो कमीच पडतो. हल्ली साधारण प्रत्येक लहान कुटुंबातही किमान दोन व्यक्ती तरी मिळवत्या असतात. तरीही खर्चाचा अतिरिक्त ताण हा येतोच. मग एकच कमावती व्यक्ती असेल तर खर्चाचा ताळमेळ बसवताना तर तारांबळ उडते.

प्रत्येकानेच आपल्या मिळकती नुसारच खर्च करायला हवा. हवेत इमले बांधणं काही खरं नाही. वास्तववादी विचार, निर्णय आणि कृती नक्कीच असायला हवी. “कारण सगळी सोंगं आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही.” स्वतःची प्रगती करायचा, मिळकत वाढवण्याचा प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकानेच करायला हवा. पण कोणाच्यातरी राहणीमानाची तुलना करून परवडत नसताना अवाजवी खर्च करू नये.

प्रत्येकालाच आपले आयुष्य, राहणीमान उत्तम दर्जाचं हवं असं वाटणं अगदी स्वाभाविक आहे. त्यात गैर काहीच नाही. पण ऐपतीबाहेर जाऊन केवळ दिखाऊपणा करणे किंवा स्टेटस साठी अकारण खरंच गरज नसताना पैसे खर्च करणे अत्यंत चूक आहे. अशा कोणाशी तरी तुलना करून केलेल्या खर्चाला “ऋण काढून सण साजरा” करण्याचं स्वरूप येतं. आणि कर्ज फेडताना तोंडाला फेस येतो.

दुर्दैवाने आज प्रत्येक व्यक्तीची किंमत ही त्याने कमावलेल्या पैशांवर ठरते, त्याच्या गुणांवर नाही. माझी आई आणि सासूबाई नेहमी सांगतात की खिशात पैसे असतील तरच बाजारात जावे. आज सहज नाही म्हणणं आणि नाही ऐकणं हे दोन्ही अत्यंत दुर्मिळ झाले आहे. मुलांचे अवास्तव, अवाजवी खर्च परवडत नसतानाही पालक पुरवतात. कारण पैसा कमावणं हेच आयुष्याचे ध्येय झाल्याने त्यांना मुलांना वेळ देता येत नाही. मग स्वतःचा गिल्ट कमी करण्यासाठी मुलांचे कोणतेही हट्ट पुरवले जातात. त्यामुळे मुलांना नाही ऐकण्याची सवयच उरली नाहीये.

सतत कोणाशी तरी स्पर्धा, मत्सर, ईर्षा यामुळे त्या व्यक्तीच्या आयुष्याची खर्चाची फुटपट्टीही आपण स्वतःला लावून पाहतो. आज अनेक मॉल्स खरेदीसाठी सहज उपलब्ध असताना नको असलेल्या पण आकर्षक मांडून ठेवलेल्या वस्तू खरेदी केल्या जातात.

आपली सामाजिक जडणघडण ही अशी आहे, लग्न आणि अनेक असे समारंभ यामध्ये केवळ दिखाऊपणा साठी अवाढव्य खर्च केला जातो. भेटवस्तू दिल्या घेतल्या जातात. हा अतिरिक्त खर्च  सगळ्यांना परवडणारा नसतो. पण नाती निभवण्यासाठी, लोक काय म्हणतील? यासाठी अक्षरशः कर्ज काढून हे सगळं निभावलं जातं. म्हणूनच आपल्याकडे लग्नात मुलीचे आई-वडील कर्जाच्या ओझ्याखाली दबून गेलेले दिसतात. मग अत्यंत काबाडकष्ट करणारे शेतकरी  शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, वीज बिलाचे मोठे आकडे, घरातील खर्च, मुलींची लग्न, सावकाराचे कर्ज या सगळ्यांमुळे आत्महत्या करायला उद्युक्त होतात. हे भयानक वास्तव आहे.

मध्यमवर्गीय नोकरदार किंवा छोटे व्यावसायिक यांची महिन्याची मिळकत ही ठराविक, अपुरी, आजच्या महागाईच्या भस्मासुराला  पुरणारी नसते. अशावेळी काही नियम, सवयी स्वतःला आणि कुटुंबातील सदस्यांना लावल्या तर योग्य ठिकाणी योग्य रक्कम आपण खर्च करू शकतो. आज घरातून बाहेर पडलं की पहिला पैसा लागतो. तेव्हा अत्यंत शिस्तीने, विचारांती योग्य निर्णय घेणे खूप गरजेचे आहे.

सर्वात प्रथम रोजचा कुटुंबातील प्रत्येक सदस्याने केलेला खर्च लिहून काढणे. यामुळे नक्की नेमका कुठे खर्च होतो? तो योग्य आहे की अयोग्य? हे समजतं. संपूर्ण महिन्याचा जमाखर्च लक्षात येतो. मिळकतीतील ठराविक किती रक्कम शिल्लक राखून ठेवायची आहे ही कळतं. दर महिन्याचे गरजेचे म्हणजे किराणा, बिलं, शालेय कॉलेज फी इत्यादी होणारी एकूण रक्कम समजते. मनोरंजन, सहल, हॉटेलिंग यासाठी नेमकी किती रक्कम आपण खर्च करू शकतो हे लक्षात येतं.

मॉल्समध्ये खरेदीला जाताना आवश्यक वस्तूंची यादी करून न्यावी म्हणजे अवास्तव खर्च होणार नाही. ही शिस्त घरातील प्रत्येक सदस्याने लावून घेणे आज काळाची गरज आहे. म्हणजे गरजेचा आणि अतिरिक्त खर्चाचा ताळमेळ आपल्या ऐपतीनुसार लावता येईल. दवाखाना, औषधोपचारांसाठी ठराविक रक्कम बाजूला ठेवावी. सामाजिक नातेसंबंध जपणे ही महत्त्वाचं असल्याने हे चौकटीबाहेरचे खर्चही आपल्या ऐपतीनुसार पेलावेत.

या काही सोप्या उपायांनी मध्यमवर्गीय माणूस गरजेचे आणि चौकटीबाहेरचे खर्च करताना संपूर्ण विचारांती योग्य निर्णय घेऊ शकेल. आणि आपले आयुष्य आहे त्या परिस्थितीतही आनंदाने, समाधानाने जगू शकेल असं मला वाटतं…


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!