Skip to content

“मी खूप भोगलंय असं वारंवार बोलणं म्हणजे आणखी खूप सार्‍या दुःखांना आमंत्रित करणे होय.”

“मी खूप भोगलंय असं वारंवार बोलणं म्हणजे आणखी खूप सार्‍या दुःखांना आमंत्रित करणे होय.”


मधुश्री देशपांडे गानू


” एक धागा सुखाचा
शंभर धागे दुःखाचे
जरतारी हे वस्त्र माणसा
तुझिया आयुष्याचे…”

सुप्रसिद्ध कवी श्री. ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेलं हे अप्रतिम गीत. सुखाचा एक धागा आणि दुःखाचे शंभर धागे असे तुझ्याच आयुष्याचे वस्त्र तूच विणतो आहेस. म्हणजेच सुख आणि दुःखाचे हे वस्त्र, हे धागे आपल्याच हातात असतात. कोणत्या धाग्यांनी आपलं आयुष्य विणायचं, हे सर्वस्वी आपल्याच हातात असतं. पण नेमकं हेच माणसाला समजत नाही. शेवटी सुख आणि दुःख हे मानण्यावर असतं. पण तुम्हीं आजूबाजूला बघितलंत तर तुम्हांला सहज अशी सतत तक्रारी करणारी, रडकी, दुःखी, निराश माणसे दिसतील. सतत तब्येतीच्या तक्रारी सांगणारी, सतत स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तींच्या तक्रारी सांगणारी, सतत आर्थिक तंगी असण्याचं सांगणारी अशी अनेक माणसं तुम्हांला भेटतात. मी किती भोगलंय, किती सहन केलंय अशी रटाळ टेप लावणारी माणसे तुम्हांला जास्त दिसतात.

मग दुःख नसतंच का आयुष्यात? ही माणसं काय खोटे बोलतात का? तर तसं नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला सुख, दुःख हे भोगावं लागतंच. त्यातूनच पार पडून आयुष्य जगायचं असतं. 24 तास कोणीही आनंदी, छान-छान राहू शकत नाही. आणि 24 तास तुम्हीं सकारात्मकही असू शकत नाही. अचानकपणे येणार्‍या दुःखद घटनांना तोंड द्यावं लागतं. प्रिय व्यक्तीचा अचानक मृत्यू आपण वर्षानुवर्षे पचवू शकत नाही. नैसर्गिक आपत्ती मुळे तर अनेक संसार उद्ध्वस्त होतात. दुःख हा शब्दही तोकडा आहे इथे..

पण तरीही माणसाची जीजिवीषु वृत्ती त्याला जगायला, तग धरायला भाग पाडते. अतीव दुःखद क्षणांनंतरही तो सावरतो, धडपडतो, पुन्हा उभा राहतो. भूतकाळात घडलेल्या अनेक दुःखद घटना, प्रसंग त्याचा पिच्छा सोडत नाहीत. कारण तो सतत मी खूप भोगलंय हेच बोलत राहतो. भूतकाळातच रमतो.

भूतकाळात आलेले वाईट अनुभव सर्वार्थाने मागे टाकून पुढे जाण्यातच खरं शहाणपण आहे. अगदी साधं उदाहरण घ्या. तरुणपणातच नवरा मृत्यू पावल्याने संसाराचा गाडा हाकण्याची जबाबदारी संपूर्णपणे एकट्या स्त्रीवर येऊन पडते. पदरी मुलं असतात. अगदी समर्थपणे संसार करते. सासू-सासर्‍यांची सेवा, घरातली, बाहेरची कामं चोखपणे बजावते. मुलांचे शिक्षण, नोकरी, लग्न, त्यांना मार्गी लावून देते. पण हीच स्त्री मुलांना, सुनांना सतत मी खूप भोगलंय, मी खूप सहन केलंय हे ऐकवते. हे मान्य आहेच. पण सातत्याने हे बोलून काय मिळतं?? सतत घरातलं वातावरण उदास, दुःखी, निराश ठेवण्यात कसलं समाधान असतं?? सतत स्वतःकडे लक्ष वेधून घेण्याचा केविलवाणा अट्टाहास?? कशासाठी?? आत्ता या क्षणी जो आनंद तुझ्या कुटुंबात आहे तो किती महत्त्वाचा आहे, हे अशा स्त्रियांच्या लक्षातच येत नाही. दुसऱ्याचा आनंद नासवतात अशा स्त्रिया. असे पुरूषही असतातच.

“Law Of Attraction” हे तर आता सगळ्यांनाच माहीत आहे. आपण सगळेच जीव एकाच ऊर्जेने बनले आहोत. तुम्हीं जी ऊर्जा ब्रह्मांडाला द्याल तीच उर्जा तुमच्याकडे परत येते, हे तर मान्य आहेच. दुःख, चिंता, ताण सगळ्यांनाच आहेत हो! “जगी सर्व सुखी असा कोण आहे?” पण आपल्या दुःखाचे भांडवल न करता सुखाचे चार क्षण वेचून, जपून ठेवावेत. या आनंददायी आठवणी जपाव्यात. सकारात्मक वास्तववादी दृष्टिकोन असावा.

मग सकारात्मक विचार करणाऱ्यांना दुःख नसतं का?? दुःख तर प्रत्येकालाच असतं. पण दुःखाकडे पाहण्याचा दृष्टीकोन मात्र प्रत्येकाचा वेगळा असतो. सकारात्मक वास्तववादी विचारांनी, कृतीने तुम्हीं दुःखद प्रसंगातूनही लवकर बाहेर येता. भूतकाळात रमत नाही आणि भविष्यकाळाची फार चिंता ही करत नाही. आज आत्ताचा क्षण त्यांच्या साठी सर्वात महत्त्वाचा असतो.

आपण जे बोलतो, जो विचार करतो, जी कृती करतो त्याचप्रमाणे आपल्याला फळ मिळतं, असं “Law Of Attraction” सांगतो. मग सतत दुःखीकष्टी रडगाणी गाणाऱ्या माणसांना सतत नवीन दुःखाला सामोरे जावं लागतं. नीट निरीक्षण करा. सतत तब्येतीच्या तक्रारी सांगणारी माणसं कधीच स्वस्थ, आरोग्यपूर्ण नसतात. त्यांना सतत काहीतरी नवनवीन आजार होत असतात.

आपल्याकडे IQ ला खूप महत्त्व आहे. EQ आणि Happiness Quotient चा आपण नीट विचार तरी करतो का?? आता हे सगळं टाळायचं कसं?? या विचार चक्रातून बाहेर कसे यायचं??

१) सर्वात प्रथम स्वतःवर निरतिशय प्रेम करायला शिका. स्वतः मधले गुण ओळखा. स्वतःच्या छोट्याशा चांगल्या कृतीचं स्वतः कौतुक करा.
२) आनंदी क्षणांची रोजनिशी लिहा. स्वतःबद्दल पाच चांगली वाक्यं रोज लिहा.

३) सतत दुःखाचा पाढा वाचून नैराश्यग्रस्त असाल तर समुपदेशकांची मदत घ्या.
४) सतत मी खूप भोगलंय, सहन केलंय असं victim card खेळून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करू नका.

५) लोकांशी, मित्र मैत्रिणींशी, कुटुंबीयांशी तुमच्या आनंदाबद्दल भरभरून बोला. अगदी छोटासा आनंद असला तरीही.
६) प्रयत्नपूर्वक आपल्या नकारात्मक दुःखी भावनांवर बोलणे टाळा. त्याच प्रमाणे कोणाहीबद्दल वाईट बोलणे, नावं ठेवणे, गॉसिपिंग करणे तर टाळाच.

७) नकारात्मक व्यक्तींचा सहवास पूर्णपणे टाळा. कोणाकडूनही अवास्तव अपेक्षा ठेवू नका.
८) “Here And Now” हा सोपा मंत्र लक्षात ठेवा. आत्ता आणि इथे डोळ्यांसमर जे आहे तेच फक्त माझं आहे.

९) तुम्हांला नजीकच्या काळात स्वतःकडून असणाऱ्या वास्तववादी यशाबद्दल सातत्याने बोला किंवा लिहा.
१०) दिवसातून एकदा तरी खळखळून मोठ्याने हसा. याने मन आणि शरीर उल्हसित होते.

११) तुमच्या आवडीच्या छंदात मन रमवा. त्यातील छोटे यश सेलिब्रेट करा.
१२) सगळ्यात महत्त्वाचे किमान दहा मिनिटे “ध्यान” करा. तुमच्या मनातील विचारांची खळबळ शांत करण्याचा हा सोपा, सुंदर मार्ग आहे.
१३) विचारांचे सुनियोजन करा. व्यायाम, योगासन याने तुमचे शरीर आणि मन आरोग्यपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न करा.

अशा अनेक गोष्टींनी तुम्ही स्वतःच्या या दुःखी नकारात्मक मानसिकतेतून बाहेर येऊ शकता. लक्षात ठेवा, आपण जे बोलतो तेच आकर्षित होतं. दुःखं तर प्रत्येकाला असतातच. पण त्याची वाच्यता न होऊ देणे, जाहिरात न करणं हे खरं गरजेचं आहे. आनंदी क्षण वेचा. आनंदा बद्दल भरभरून बोला आणि आनंदालाच आकर्षित करा… बघा प्रयत्न करून….


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

5 thoughts on ““मी खूप भोगलंय असं वारंवार बोलणं म्हणजे आणखी खूप सार्‍या दुःखांना आमंत्रित करणे होय.””

  1. रेणुका ओक

    खूप सकारात्मक लेख आहे प्रत्यक्ष खरे कसे वागायला हवे यावर खूप उत्तम मार्गदर्शन

  2. लेख अत्यंत उत्तम आहे. अशाच प्रकारच्या भावना सतत माझ्या मनात येतात. मी त्या कोणत्याही व्यक्ती जवळ व्यक्त करीत नाही परंतु त्यांना विसरु शकत नाही

  3. छान आहे लेख..मस्त वाटले 😊धन्यवाद 🙏🏽

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!