म्हातारपणी मुलांच्या आणि सुनांच्या भांडणातच आणि दबावाखाली आयुष्य का घालवायच..?
हर्षदा पिंपळे
“जिंद़गी रंगमंच की तरह होती हैं।नए किरदार आते रहते हैं और रिश्ते बनते,बिगडते रहते हैं।”
वरील ओळी कुणाच्या काही कल्पना नाही. परंतु जे लिहलय ते कधी कधी आपल्या आयुष्याला तंतोतंत लागू होतं.आयुष्यात आपली नाळ जन्मतःच कुणाशी ना कुणाशी जोडली जाते. असंख्य नात्यांशी आपण जोडले जातो.वयाच्या एकेका टप्प्यावर आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये प्रवेश करत राहतो.
बाळापासून अगदी खापरपंजोबा/खापरपंजी पर्यंतचा आपला प्रवास कसा होतो कळतच नाही. या प्रवासामध्ये कित्येक वेगवेगळ्या भूमिका आपल्याला अनुभवायला मिळतात.बालपणाची तर गोष्टच निराळी असते.पण जसं जसं तरूणपण आणि म्हातारपण जवळ येऊ लागतं तसतशा गोष्टी क्षणार्धात बदलायला लागतात.
आईपण म्हणजे निव्वळ सुखावणारं फिलींग! आणि बाबांबद्दल तरी आणखी वेगळं काय बोलणार?सख्ख असो वा सावत्र parenting चा प्रवास हा वेगळाच असतो.दोघांनाही हवाहवासा असतो.पण कधी कधी वाटतं की हे सगळं एका मर्यादित काळापुरतच टिकून राहतं. कारण जेव्हा वार्धक्य जवळ येतं तेव्हा बऱ्याच ठिकाणी सगळं चित्रच बदलून जातं.मुलांची लग्न झालेली असतात. घरात सूना आलेल्या असतात.घरातील वातावरण पूर्णतः बदललेलं असतं.
मुलं आणि सूना किंवा पूर्ण परिवार जर चांगला असेल तर काही प्रश्नच उद्भवत नाही.पण जर यापैकी जर काही योग्य नसेल तर अनेक प्रश्न उपस्थित होतात.कधी सूना-मुलं चुकीची वागतात तर कधी सासु-सासरे चुकीचे वागतात.कुठे सासु-सासऱ्यांना सुनेचा धाक असतो तर कुठे मुलांसोबत-सूनांसोबत भांडणं चालू असतात. तर काही ठिकाणी मुलगा-सूनांमध्ये भांडणं चालू असतात. थोडक्यात मुलांच्या लग्नानंतर आई-वडिलांच म्हातारपण/आयुष्य अशा त्रासदायक वातावरणात सरून जातं.
हल्ली मनुष्य किती काळ जगेल याची काही शाश्वती देता येत नाही. तरीही मुलांच्या लग्नानंतर अशा वातावरणाला कित्येकजण जवळ का करतात तेच कळत नाही. एकदा सासू-सासऱ्याच्या भूमिकेत असलेल्यांनी स्वतःला हा प्रश्न नक्की विचारा की,”उरलेलं आयुष्य भरभरून आनंदाने जगून घ्यायच की सूनेच्या दबावाखाली, मुलांच्या-सूनांच्या भांडणातच हे आयुष्य घालवायच…?”हा प्रश्न स्वतःला विचारल्यावर उत्तरं सापडतीलही पण तुम्ही कदाचित ती मान्यच करणार नाहीत अशी शंकाही वाटते.
कारण तुम्ही थोडक्यात असा विचार करता की, आपला मुलगा -आपली सून म्हणून आपल्याला काळजी वाटणं साहजिक आहे.मुलाच्या नी सूनेच्या भांडणात पुढाकार नाही म्हंटलं तरी तो घेणं आवश्यक असतं.मुलगा चुकत असेल तर त्याला त्याच्या चुकांची जाणीव करून देणं गरजेचं असतं.सून आली तर तिचं ऐकावं तर लागणारच..शेवटी काय आपल्या मुलाला तिच आहे वगैरे.
काय पटतय नं…?
रोज रोज तीच कटकट, तीच भांडणं, सततची होणारी चिडचिड नी घुसमट यामध्येच उरलेले दिवस जगायचे का..?त्रास नाही होत का जीवाला…?रोज भांडणं करायला नी रोज भांडणं सोडवायला वैताग येत नाही का..? तेच तेच तेच…..सगळं आयुष्य त्यातच वाया घालवणं मनाला तरी कितपत पटतं…?त्यापेक्षा सोडून देऊयात ह्या सगळ्या कुरापती आणि जगूयात नं सुखा-समाधानाने…? आपलं तरूणपण गेलं….आपण वार्धक्याच्या दिशेला निघालोय हे लक्षात ठेवा.अगदी parenting ची फेझ् जशी छान एन्जॉय केली असेल अगदी तसच आता हे म्हातारपण एन्जॉय करायचय हे लक्षात घेऊन जगण्याचे नवे फंडे ठरवा.
संसार आला की भांड्याला भांड लागणारच हे विसरू नका.जेव्हा गरज असेल तेव्हाच मध्यस्थी करा.आणि सूनेच्या/मुलाच्या दबावाखाली येऊन आयुष्य जगू नका.कुणाच्यातरी दबावाखाली येऊन आयुष्य जगणं म्हणजे जगणं नसतं.म्हणून अशावेळी दुर्लक्ष करून चांगल्या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करा.नातवंड असतील तर मनसोक्त त्यांच्याबरोबर लहान होऊन खेळायला काय हरकत आहे..? एखाद्या मंदिरात जाऊन प्रसन्न होऊन या.जुन्या मित्रमैत्रिणींना भेटा.त्या त्या काळातल्या आठवणींना उजाळा देऊन पहा,आयुष्य खरच सुंदर आहे याची जाणीव नक्कीच होईल.
जे जे आवडतं ते ते करायला स्वतःलाच भाग पाडा.या वयात पुस्तकं वाचावीशी वाटत असतील तर नक्की वाचा.रोज येणारं वर्तमानपत्र वाचा.या वयातही भटकंती करायला लाजू नका.भटकंतीला कोणतही वय नसतं माझ्या मित्रांनो.हातात काठी असेल तरी चालेल तुम्ही भटकंती चालू ठेवा. वेगवेगळ्या उत्सवात आनंदाने सहभागी व्हा.
आजूबाजूला अनेक चांगल्या गोष्टी घडत असतात त्याकडे लक्ष द्या.अशा कटकटीच्या वातावरणात मनाच संतुलन केव्हा बिघडेल काही सांगता येत नाही. मनाच संतुलन बिघडलं की आपण पूर्णतः खचतो.त्याने शरिराचीही हेळसांड होते.गोष्टी बिघडत जातात. उरलेलं आयुष्य एकमेकांची उणीधुणी काढण्यातच जातं.त्यामुळे मुलांनाही मुलांचा संसार करूद्या.आणि सून-मुलानेही आईवडीलांना सुखाने जगू द्यावं हीच माफक अपेक्षा. शेवटी सामंजस्याने घेतलं की सगळं कसं सुरळीत होतं.
पहा,विचार करा…आयुष्याची प्रत्येक फेझ् सुंदर असते.मग ते तरूणपण असो वा म्हातारपण.त्यामुळे तरूणपण सरलं म्हणून पुढचं आयुष्य कोणत्याही त्रासदायक गोष्टींमध्ये घालवू नका. म्हातारपणातले सुंदर क्षण अनुभवायला शिका.म्हातारपण सुद्धा किती सुंदर असतं हे तुमच्या अनुभवावरून इतरांना नक्की कळू द्या.
काय मग…करणार नं एन्जॉय हे म्हातारपण….?
मानसिक समस्येतून बाहेर पडण्यासाठी ‘आपलं मानसशास्त्र’ ची मदत घ्या.

Khupch sunder
खूप सुंदर व अगदी बरोबर आहे
अगदी योग्य विचार आहेत
Very Very nice article 👍
100/ real
Khupuch Chan
खुप छान 👌