Skip to content

मानसिक समस्येत असताना आपल्या गरजा कमी-जास्त होत असतात.

मानसिक समस्येत असताना आपल्या गरजा कमी-जास्त होत असतात.


सुधा पाटील

(समुपदेशक)


मानवी आयुष्य हे पूर्णतः मानसिकतेवर अवलंबून असते.म्हणूनच माणसांच्या मानसिक आरोग्याला खूप महत्त्व दिलं जातं.तुम्ही तुमच्या जीवनात घडणाऱ्या घटनांचा तुमच्यावर कसा परिणाम करून घेता यावर तुमची मानसिकता अवलंबून असते.पण जेव्हा तुम्ही एखाद्या मानसिक समस्येत असता तेव्हा तुमच्या दैनंदिन शारीरिक आणि मानसिक गरजांवर परिणाम होत असतो.खूपदा भूक खूप लागते.किंवा अजिबात लागत नाही.

मानसिक तणाव असतो तेव्हा काही माणसं खूप खातात.हे त्यांना कळतंही नाही.आणि वजन वाढतं.स्थलपणा येतो.शारिरीक हालचाली हळूहळू मंदावत जातात.खूपजन उगाचंच गरजेपेक्षा जास्त झोपतात.त्याचा परिणाम त्यांच्या कामावर होत राहतो.त्यातूनच अनेक शारिरीक आजार जडतात.

काहीजन अशा परिस्थितीत जेवन टाळतात.दबावात राहतात.त्यामुळेही शारिरीक आजार होतात.माणूस खचत जातो.लैंगिक समस्यांवर देखील याचा परिणाम होतो.लैगिक भावना एकतर खूप बळावतात किंवा कमी होत जातात.या भावना प्रमाणापेक्षा जास्त ज्या व्यक्तीच्या बळावतात त्याच्या जोडीदाराला याचा त्रास होत राहतो.यातूनच दोघांमधील वाद बळावू शकतात.कधी कधी लैंगिक भावना खूपच बळावली तर त्या व्यक्तीकडून समाज अमान्य वर्तन घडू शकते.

एकंदरच काय तर मानसिक समस्या निर्माण झाल्या की माणसांच्या नैसर्गिक गरजा वाढतात किंवा कमी होतात.त्याचा परिणाम स्वत: वर आणि कुटुंबावर होत राहतो.यातूनच कौटुंबिक कलह वाढू शकतात.त्याचा पुन्हा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होत राहतो.

म्हणूनच मानसिक समस्येत तीन ते चार दिवस किंवा जास्तीत जास्त एक आठवडा राहिले तर चालू शकते.पण जर तुम्ही सतत तीच समस्या उगाळून मानसिक समस्येत राहिलात तर मात्र नकळतच नैराश्यात जाऊ शकता.म्हणूनच आपणास एखादी मानसिक समस्या निर्माण झाली तर जाणिवपूर्वक त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करा.

त्या समस्येवर वेळीच उपाय शोधा.कारण एक समस्या अनेक समस्या निर्माण करू शकते.म्हणूनच कितीही मानसिक समस्या असल्या तरीही त्यातून बाहेर पडता आलं पाहिजे.अशावेळी ती समस्या एखाद्या जवळच्या मित्रांना सांगा.मनात ठेऊन झुरु नका.तुमच्या दैनंदिन गरजांमध्ये जर फरक जाणवला तर त्याकडे वेळीच लक्ष द्या.

खूपदा आपण आपल्या स्वत:मधील बदलांकडे नकळतपणे दुर्लक्ष करतो.आणि मग समस्या वाढत जातात.म्हणूनच मानसिक समस्येत असताना आपल्या गरजांमध्ये बदल होताना दिसले तर वेळीच सावध व्हा.त्या समस्येतून कसं बाहेर पडता येईल याचा विचार करा.एक लक्षात ठेवा…. समस्या कोणतीही असो…आपण खंबीर झालो तरच त्या समस्येतून बाहेर पडू शकतो.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!