Skip to content

‘बस्स झालं, मी त्याला आता सोडणार नाही’ हे संतापजनक विचार असे शांत करा.

‘बस्स झालं, मी त्याला आता सोडणार नाही’ हे संतापजनक विचार असे शांत करा.


काव्या धनंजय गगनग्रास

(समुपदेशक)


आपल्याला आपल्या आयुष्यात अनेक प्रकारची माणसं भेटत असतात. कधी त्यांच्याकडून आपल्याला चांगले अनुभव मिळतात तर कधी वाईट. सर्वांचे स्वभाव वेगवेगळे, विचार वेगळे त्यामुळे आपलं सर्वांशी जमेलच असं नाही. त्यामुळे वाद, मतभेद, भांडण ही होतातच. पण बऱ्याचदा ही भांडण टोकाला जातात. काही वेळा लगेच सुटतात तर अनेकदा तो संताप, राग मनात राहतो. त्यातून निर्माण होते ती सूडाची भावना.

माझ्यासोबत अस झाल ना मीपण आता सहन करणार नाही आणि त्या माणसाला सोडणार पण नाही असे विचार मनात येऊ लागतात.
या सूडाच्या आगीत मध्ये अनेकजण अश्या गोष्टी करतात ज्याचा आयुष्यभर पश्चाताप करावा लागतो. राग असतो त्या प्रसंगापुरता पण पडसाद पूर्ण आयुष्यावर उमटतात. कारण स्वतःवर नियंत्रण नसत, आवेगाने नको असलेले कृत्य हातून होते.

म्हणून अश्या संतापजनक विचारांना वेळीच शांत करण्याची गरज असते. ते कसं करावं? तर त्यासाठी काही प्रयत्न हे करावेच लागतात.
हे प्रयत्न म्हणजे सर्वात आधी आपल्या विचारांना योग्य वळण लावणे. म्हणजेच आपले विचार बदलणे. त्यासाठी स्वतःशी नीट संवाद हवा. अनेकदा होत अस वादामध्ये समोरची व्यक्ती जे काही बोलत असते ते आपण कायमच खर मानून बसतो. म्हणजेच काय तर ती जे काही बोलत आहे, वागत आहे ते आधीपासूनच आहे आणि आता बाहेर आला आहे.

आपण आपले विचार त्या प्रसंगापुरते मर्यादित न ठेवता त्याला आधीच्या आणि नंतरच्या म्हणजेच येणाऱ्या अनुभवाशी जोडतो. असं overgeneralization केल्याने त्रास वाढतो. तसच भांडण दोन्ही बाजूने झालेले असत आपण बोलणार तसच समोरची व्यक्ती बोलत असते. पण गरजेचं नाही रागात ती जे काही बोलते तेच खर असेल. आपण अनेकदा त्या आवेगात काहीही बोलतो आपल्या मनात नसलेले पण.

म्हणून त्याला त्या प्रसंगा पुरतच ठेवायचं आणि स्वतः ला आधी समजवायच की जरी तीच वागणं, बोलणं चुकीचं असेल वाईट असेल तरी त्यात बोललेले सर्वच खर असेल अस नाही. आपण त्या व्यक्तीला जर चांगलं ओळखत असू तर नक्कीच आपण हा विचार करू शकतो की अनेक प्रसंगात तो चांगला देखील वागलेला असू शकतो. ह्या एका प्रसंगावरन मी त्याच पूर्ण माणूस म्हणून मूल्यमापन करू शकत नाही.

आता अस होत की समोरचा माणूस खरच चुकीचा असू शकतो. त्याच वागणं राग येण्यासारखं असू शकत. पण तरीही त्यासाठी आपण सूड घेणं योग्य नाही. इथे आपण आपलच नुकसान करून घेतो. म्हणून जरी सामोरचा माणूस चुकीचा असला तरी आपण अस काही मनात आणायच्या अगोदर आपल्या या वागण्याचा आपल्या भविष्यावर काय परिणाम होईल याचा विचार करावा. आता त्याला काहीतरी करून आपल्याला कदाचित बर वाटेल. त्याला त्याच्या चुकीची शिक्षा मिळाली, आपण आपला बदला घेतला अस वाटून समाधान मिळेल.

पण पुढे काय? आपण जे काही करणार त्याच काहीतरी मोबदला आपल्याला मिळणारच. तो चुकत नाही. म्हणून कधीही विचार करताना दीर्घकालीन विचार करावा. माझे आताचे हे विचार, त्यातून येणार वागणं पुढे जाऊन काय निर्माण करेल असा जर विचार करा तर यातील चूक लक्षात येऊन आपला हा संताप, हे विचार कमी होतील.

सर्वात शेवटी समोरचा तस वागला म्हणून मी अस वागलो अस वाटून आपण काहीतरी करत असू तर या प्रसंगामध्ये माझ्यासारखे दहा लोक असते तर काय केलं असत हे विचारावं. यातून समजेल की हा प्रसंग नाही आपले विचार चुकतात आणि ते सुधारले तर नक्की आपला त्रास कमी होईल आणि हे विचार आपण वरचे प्रश्न विचारून बदलू शकतो. अश्या प्रकारे आपल्या विचारांना आरोग्यदायी केलं तर हे अनारोग्यादयी विचार शांत होतील.


तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!


“आयुष्य खूप सुंदर आहे, आणखीन सुंदर बनवूया”

2 thoughts on “‘बस्स झालं, मी त्याला आता सोडणार नाही’ हे संतापजनक विचार असे शांत करा.”

हा लेख आपल्याला कसा वाटला, जरूर कळवा.

error: कॉपी न करता थेट लिंक शेअर करा!