माणूस अचानक बोलेनासा झाला की त्याचे डोळे नेहमीपेक्षा जास्त बोलायला सुरुवात करतात.
हर्षदा पिंपळे
का कळेना…
का मिटलेत तिने असे अलगद डोळे
कोणाला काही न सांगता,
अस्वस्थ करतायेत ते तिचे डोळे
माझ्या डोळ्यांना,
बांधही फुटत नाहीये
या माझ्या अश्रूंना,
बघून ते मिटलेले डोळे जीव लागलाय माझा
तळमळायला,
सारा रस्ताच लागलाय आता अगदी सुनासुना वाटायला…
माझी ती वेडी हाक जात असेल का ऐकू त्या मिटलेल्या डोळ्यांना…
कुणीतरी सांगा त्या मिटलेल्या डोळ्यांना माझ्यासाठी उघडायला…
ज्या डोळ्यांनी मला प्रेम, आपुलकी, काळजी आदर, अन् कणखरता सारं काही शिकवलं,
त्या डोळ्यांनी असं अचानक त्यांच कवाडं कस बंद केलं…
का कळेना…?
अस का केलं त्या मिटलेल्या डोळयांनी
त्या डोळ्यांमुळे एकेकाळी कणखर असलेलं मन
आज मात्र हेलावून गेलं…….
खरतरं या कवितेत त्या लेकराची आई कायमची सोडून गेलेली आहे. आईचे मिटलेले डोळे पाहून त्याच्या ओठांवर असे काहीसे शब्द उमटलेले आहेत.
मित्रांनो, डोळे खूप काही बोलतात हे आपण ऐकलच असेल.अनुभवलही असेल.पहा,हे मिटलेले डोळेही बरच काही बोलून जातात हे या कवितेवरून लक्षात आलच असेल.
आता केवळ प्रेमात पडल्यावरच डोळे बोलतात असं काही नसतं.इतर वेळीही डोळे अनेकदा बोलतात.इतर संवादाच्या माध्यमांपैकीच डोळेसुद्धा एक संवादाच,व्यक्त होण्याच माध्यम आहे.कुणाचे डोळे टपोरे,कुणाचे नाजूक निळे,काळे…तर कुणाचे पाणेरी.एखाद्याच्या डोळ्यांवरूनही आपण त्या त्या व्यक्तीला लक्षात ठेवतो.
“तिचे डोळे खूप बोलके आहेत हं…”
“काय डोळे आहेत यार…किती मोहक,किती स्पष्ट”
“डोळे बरच काही सांगून जातात.”
“तो तसा खूप शांत आहे पण त्याचे ते टपोरे डोळे मनाला अशांत करून जातात. त्याचे डोळे न बोलताच सगळं काही सांगून जातात.”
अशाप्रकारचे डोळ्यांशी संबंधित संवाद तुम्ही सर्वांनी नक्कीच ऐकले असतील.तर खरच डोळे बोलतात का…? कधी आणि किती आणि काय बोलतात हे आपण पाहूयात……
असं म्हणतात,जेव्हा माणूस अचानक बोलेनासा होतो तेव्हा तर त्याचे डोळे नेहमीपेक्षा जास्त बोलायाला सुरुवात करतात.पहा आता..डोळे इतर वेळीही बोलतात परंतु जेव्हा माणूस अचानकपणे बोलायच थांबतो त्यावेळी मात्र त्याचे डोळे अधिक बोलके वाटू लागतात.खूप बडबड करणारा माणूस कधीतरी अचानक शांत होतो,कमी बोलायला लागतो तेव्हा त्याचे डोळे बरच काही बोलत असतात.तो काहीतरी नक्कीच लपवतोय हे त्याच्या डोळ्यातील भाव सहजपणे सांगून जातात.आता डोळे बोलतात हे केवळ डोळे वाचणाऱ्यालाच कळू शकतं.आणि एखाद्याचे डोळे वाचणे म्हणजे काही साधी सरळ गोष्ट मुळीच नाही.डोळे वाचण्यासाठी आधी समोरच्या व्यक्तीच्या मनाचा ठाव घेणं आवश्यक असतं.त्याशिवाय त्या व्यक्तीचे डोळे वाचणं अशक्यच..!
आपल्या आयुष्याची गुंतवणूकच इतकी गुंतलेली आहे की कधी कधी काय होतं हेही आपल्याला कळत नाही.प्रत्येक गोष्टीत काही ना काही up and downs हे येतच असतात. आणि त्यामुळेच आपल्या मनावर त्याचा अगदी नैसर्गिकरित्या परिणाम होत असतो.कधी कधी अशा गोष्टी घडतात ज्याचं माणसाला खूप दुःख होतं.तो बाहेरून रडून रडून थकून जातो.तरीही तो आतुन रडणं काही थांबवत नाही.चार जणांकडे दुःख शेअर करूनही कमी होत नाही हे त्या माणसाच्या डोळ्यांवरून आपल्या लक्षात येतं.
अशावेळी माणूस व्यक्त होणं अनेकदा टाळतो.पण त्याचे डोळे…..डोळे मात्र आपल्याच मनात नवी कोडी घालून जातात. समोरची व्यक्ती पूर्णतः तुटली आहे, कोसळली आहे याचा अंदाज आपल्याला येतो.डोळ्याला अंतर्मनाचा आरसा म्हणून संबोधले जातं.त्यामुळे कदाचित अंतर्मनातील दडलेल्या भावनाही आपसूकच डोळ्यांमध्ये तरळत राहतात.
हताश नजरेने जमिनीकडे किंवा आकाशाकडे पाहणारी एखादी व्यक्ती तुम्ही निश्चितच पाहिली असेल.ती व्यक्ती त्यावेळी फार काही बोलतच नाही. आपण कितीही खोदून खोदून विचारायचा प्रयत्न केला तरीही ती व्यक्ती गप्पच राहते.बोलणं टाळून नजरेला नजर देणही टाळते.कारण त्या व्यक्तीलाही माहीत असतं आपण नाही बोललो तरी आपले डोळे खूप काही बोलू शकतात.
हो,डोळे बरच काही सांगून जातात …
न सांगितलेल,मनात साचलेलं,मनात दडलेल,आतुन तुटलेलं……बरच काही…!
तुमचेही लेख प्रकाशित व्हावेसे वाटत असल्यास majhe.lekh@gmail.com वर मेल करा!
